'महाविकास आघाडी राज्यसभेसाठी आज उमेदवाराची निवड करणार' - विजय वडेट्टीवार
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपानं महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यापाठापोठ महाविकास आघाडी राज्यसभा जागेसाठी बुधवारी घोषणा करणार असल्याची माहिती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली.

Published : March 4, 2026 at 5:08 PM IST
नागपूर : राज्यसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील एकूण सात जागांसाठी येत्या 16 मार्चला निवडणूक होऊ घातली आहे. महायुतीमध्ये अनेकांची नावं चर्चेत आहेत. यात विदर्भातील हंसराज अहिर, नवनीत राणा, अशोक नेते, मायाताई इवनाते यांची नाव चर्चेत होती. त्यांची यादी आता जाहीर झाली आहे. मात्र, महाविकास आघाडीच्या वाट्याला येणाऱ्या एका जागेसाठी अद्यापही तीन पक्षांमध्ये एकमती झालेली नाही. "बुधवारी तीन पक्षांची मुंबईत बैठक होणार आहे. त्यात कुणाची वर्णी लागणार यावर निर्णय होण्याची शक्यता आहे," अशी माहिती काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
बुधवारी मविआचा उमेदवार निश्चित होणार : "आज महाविकास आघाडीमधील घटक पक्षांची बैठक होणार आहे. बैठकीत जो निर्णय घेतला जाईल त्याचा रिपोर्ट दिल्लीला देऊ. आज महाविकास आघाडीचा राज्यसभेचा उमेदवार निश्चित होईल. अद्याप कुठल्याही नावावर अंतिम निश्चिती झालेली नाही. आमची आग्रही मागणी आहे की, राज्यसभेची जागा काँग्रेसलाच मिळावी. काँग्रेस राष्ट्रीय पक्ष असल्यामुळंच आम्हाला राज्यसभा मिळावी. विधान परिषदेची जागा शिवसेनेला (उबाठा) मिळावी," अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली.
पक्षश्रेष्ठींकडून अद्याप सूचना नाही : "तीन पक्षाच्या आघाडीमध्ये जे काहीही ठरेल, ते अंतिम होईल. काँग्रेस हायकमांड अंतिम निर्णय घेईल. सुप्रिया सुळे काय म्हणत आहेत, उद्धव ठाकरे यांना भेटून काय बोलल्या? ते मला माहीत नाही. आम्हाला अजून दिल्लीवरून काँग्रेसच्या भूमिकेबद्दल कुठल्याही सूचना आलेल्या नाहीत," असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.
अडकलेल्या भारतीयांना परत आणावं : "दुबईत परिस्थिती फार काही वाईट नाही. मात्र, मोठ्या संख्येनं भारतीय तिथं अडकले आहेत. त्यांच्यामध्ये भीती आहे. त्यामुळं केंद्र सरकार आणि राज्य सरकारची ही जबाबदारी आहे की त्यांना लवकरात लवकर सुरक्षितरित्या भारतात परत आणावं. ते सर्व भारतीय आहेत. त्यात धार्मिक फाटे फोडण्याची गरज नाही. जे लोक अडकले आहेत, ते सर्व भारतीय असून त्यांना सुरक्षित आणणे भारत सरकारचं काम आहे," असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.
एसबीएल स्फोट प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करा : "नागपूरपासून दहा किलोमीटर अंतरावर 14 स्फोटक कारखाने आहेत. दरवर्षी तिथं दुर्घटना होत असतात. यात अनेकांचा मृत्यू होतो. 'पेसो' स्फोटक सुरक्षिततेसाठीचं संस्थेचं मुख्यालय नागपुरात आहे. मुख्यमंत्री नागपूरचे आहेत. मात्र, दरवर्षी इथं घटना घडतात. सरकारचं गांभीर्यानं याकडं लक्ष नाही. एसबीएल स्फोट प्रकरणातील मृत्यू संख्या वाढण्याची शक्यता आहे. आम्ही एसबीएल स्फोट प्रकरणी विधिमंडळात या मुद्द्यावर स्थगन प्रस्ताव दिले आहेत. आम्ही सरकारला या संदर्भात प्रश्न विचारू. मोठी मदत जाहीर केली म्हणजे पैशानं जीव खरेदी करता येत नाही. तिथल्या सुरक्षिततेच्या अनुषंगानं सरकार काय प्रयत्न करत आहे? असा आमचा प्रश्न आहे. या प्रकरणात सदोष मनुष्य वधाचा नाही तर खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली.
राज्यसभा निवडणुकीचे वेळापत्रक :
- 5 मार्च : उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत.
- 6 मार्च : अर्जांची छाननी.
- 9 मार्च : उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख.
- 16 मार्च : सकाळी 9 ते सायंकाळी 4 मतदान; सायंकाळी 5 नंतर मतमोजणी.
हेही वाचा :

