ETV Bharat / state

जिद्दीमुळे रुग्णालयातून दिली बारावीची परीक्षा, रुग्णालयातील बेडवर सोडवला जीवशास्त्राचा पेपर

कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील सरूड कॉलेजमधील बारावीच्या विद्यार्थिनीनं शारीरिक व्याधींवर जिद्दीनं मात करत रुग्णालयातूनच महत्त्वाचा जीवशास्त्र विषयाचा पेपर दिला.

रूपाली शिसाळ
रूपाली शिसाळ (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : February 26, 2026 at 9:56 PM IST

|

Updated : February 26, 2026 at 10:13 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

कोल्हापूर - सध्या परीक्षांचा हंगाम असून विद्यार्थ्यांमध्ये तणावाचं वातावरण आहे. बऱ्याचदा या वातावरणात विद्यार्थ्यांची तब्येत देखील बिघडत असते. मात्र कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील सरूड कॉलेजमधील बारावीच्या विद्यार्थिनीनं शारीरिक व्याधींवर जिद्दीनं मात करत रुग्णालयातूनच महत्त्वाचा जीवशास्त्र विषयाचा पेपर दिला आहे. बोर्डाच्या तत्काळ परवानगीनं तिचं शैक्षणिक नुकसान टळलं. तर शिक्षण विभागाच्या तत्परतेमुळं हे शक्य झालं असून, ती इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल - सध्या सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेदरम्यान सरूड कॉलेजमध्ये शिकणारी रूपाली शिसाळ ही विद्यार्थिनी अचानक आजारी पडली. ती डोणोली येथील एका शैक्षणिक संस्थेची विद्यार्थिनी असून तिचं परीक्षा केंद्र सरूड येथे होतं. प्रकृती खालावल्यानं तिला तत्काळ शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. बुधवारचा जीवशास्त्राचा पेपर असल्यानं तिचं शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, तिचे वडील नामदेव शिसाळ यांनी तत्काळ केंद्र संचालक के. एन. पाटील यांच्याशी संपर्क साधला आणि परिस्थितीची माहिती दिली.

माहिती देताना शाहूवाडीचे गटशिक्षणाधिकारी डॉ. विश्वास सुतार (ETV Bharat)



नातेवाइकांच्या प्रयत्नांमुळे कॉलेज प्रशासन मदतीला धावून आलं. केंद्र संचालकांनी शाहूवाडीचे गटशिक्षणाधिकारी विश्वास सुतार यांच्याशी चर्चा केली, तर सुतार यांनी बोर्डाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि सचिव सुभाष चौगुले यांच्याशी संपर्क साधून परवानगी मागितली. बोर्डानं तात्पुरती मंजुरी देत रुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरा आणि स्वतंत्र पर्यवेक्षक नेमण्याचे निर्देश दिले.

रुग्णालयातच तात्पुरते परीक्षा केंद्र - बोर्डाच्या सूचनेनुसार शिक्षण विभागानं जलदगतीनं यंत्रणा उभारली. बांबवडे रुग्णालयात तात्पुरतं परीक्षा केंद्र उभारण्यात आलं. केंद्र संचालक के. एन. पाटील आणि पर्यवेक्षक उदय पाटील यांनी रुग्णालयात उपस्थित राहून सुरक्षित वातावरण निर्माण केलं. प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका आणि सर्व साहित्य रुग्णालयात पोहोचवण्यात आलं. डॉक्टरांनीही पूर्ण सहकार्य देत रूपालीला पेपर लिहिण्यास परवानगी दिली. तिनं आजारी असतानाही संयमानं आणि एकाग्रतेनं पूर्ण पेपर सोडवला.


रूपालीचे वडील नामदेव शिसाळ म्हणाले, "माझी मुलगी आजारी असतानाही ती पेपर देऊ शकली. तिचं शैक्षणिक नुकसान टळलं आहे. त्यामुळे शाळा, रुग्णालय आणि शिक्षण विभागाच्या सहकार्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे." गटशिक्षणाधिकारी विश्वास सुतार यांनी सांगितलं, "केंद्र संचालकांनी माहिती दिल्यानंतर मी बोर्डाच्या अध्यक्षांशी बोललो. त्यांच्या सूचनेनुसार आम्ही सीसीटीव्ही आणि पर्यवेक्षकाची नेमणूक करून पेपर घेतला. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अशी तत्परता आवश्यक आहे."

बोर्डाच्या धोरणाची प्रशंसा - महाराष्ट्र राज्य बोर्डाने अशा आणीबाणीच्या प्रसंगी विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचे धोरण प्रभावी ठेवलं आहे. यापूर्वीही अशा प्रकारची परवानगी देऊन अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान टाळलं गेलं आहे. शाहूवाडी तालुक्यातील ही घटना विभागीय मंडळाच्या तत्परतेमुळं शक्य झाली असून, ती स्थानिक पातळीवर कौतुकास्पद बोलली जात आहे. तसंच रूपालीच्या जिद्दीमुळं वर्षभराच्या अभ्यासाचं फळ तिला मिळेल आणि ती गुणवंत विद्यार्थिनी म्हणून पुढे जाईल, अशी आशा आहे.

हेही वाचा...

  1. पायांनी दिली बारावी परीक्षा; जिद्दी विद्यार्थ्याच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी संस्थेकडून स्वीकारली
  2. शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; शाळेच्या टेरेसवर मंडप टाकून दहावीचे पेपर घेण्याची आली वेळ
Last Updated : February 26, 2026 at 10:13 PM IST