एल निनोचा वाढता धोका; कमी पाण्यात अधिक पीक उत्पादन हाच शेतकऱ्यांसाठी पर्याय
एल निनोमुळं विदर्भात कमी पाऊस, उष्णता आणि पावसातील खंड वाढण्याची शक्यता हवामान विभाग प्रमुख प्रा. अनिल बंड यांनी व्यक्त केली आहे.

Published : May 26, 2026 at 5:40 PM IST
अमरावती : जागतिक हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान झपाट्यानं वाढत आहे. एल निनोची स्थिती अधिक तीव्र होत असल्याचं स्पष्ट झालंय. मे महिन्यापासून एल निनोचा प्रभाव वाढू लागला असून जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये त्याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता हवामान तज्ञांनी व्यक्त केलीय.
ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये एल निनो उच्चतम पातळीवर पोहोचू शकतो, असा इशारा श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाचे हवामान विभाग प्रमुख प्रा. अनिल बंड यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिला. या कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांनी कमी पाण्यात अधिक पीक कसं घेता येईल, याचं नियोजन करावं, असा सल्लाही त्यांनी दिलाय.
पावसाचं असमान वितरण वाढणार : एल निनोच्या प्रभावामुळं यंदा मान्सूनचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. पावसाचं प्रमाण दर महिन्याला घटत जाण्याचा अंदाज आहे. काही भागांत अतिवृष्टी, तर काही भागांत दीर्घकाळ पावसाचा खंड पडण्याच्या घटना वाढू शकतात. परिणामी खरीप हंगामावर मोठा परिणाम होण्याची भीती प्रा. अनिल बंड यांनी व्यक्त केली आहे.
शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा : कमी पाऊस, वाढते तापमान आणि पावसातील अनियमितता यामुळं सोयाबीन, कापूस आणि तूर यासारख्या प्रमुख पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. पेरणीनंतर पाऊस थांबल्यास पिकांची वाढ खुंटणे, फुलगळ होणं आणि उत्पादन घटणं, अशा समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळं शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान वाढण्याची शक्यता अमरावती जिल्हा प्रशासनानंही व्यक्त केली आहे.
कमी पाण्यात अधिक पीक : संकटातून मार्ग काढण्यासाठी “कमी पाण्यात अधिक पीक” ही संकल्पना स्वीकारण्याची गरज असल्याचं प्रा. अनिल बंड यांनी सांगितलं. पाण्याचा प्रत्येक थेंब अचूक पद्धतीनं वापरणं, ठिबक व तुषार सिंचनाचा वापर करणं आणि पिकांच्या महत्त्वाच्या अवस्थेत सिंचन करणं आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पीक आणि पाण्याचे योग्य नियोजन केल्यास पाण्याचा अपव्यय 30 ते 60 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो. विहिरीतील पाणी संकटकाळासाठी राखून ठेवणं आणि उपलब्ध जलस्रोतांचे योग्य नियोजन करणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी योग्य नियोजन आखण्याची गरज आहे", असं देखील प्रा. अनिल बंड म्हणाले.
कमी पाण्यात येणाऱ्या पिकांना प्राधान्य : यंदाच्या हंगामात ज्वारी, बाजरी, तूर, तीळ, सूर्यफूल आणि भुईमूग यांसारख्या कमी पाण्यात येणाऱ्या पिकांकडं शेतकऱ्यांनी वळावे, असा सल्ला प्रा. बंड यांनी दिला. कमी कालावधीत येणाऱ्या आणि दुष्काळ सहन करणाऱ्या वाणांची निवड केल्यास नुकसान कमी होऊ शकतं, असं देखील प्रा. बंड म्हणाले.
जमिनीत ओलावा टिकवणे काळाची गरज : जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी मल्चिंग, शून्य मशागत आणि सेंद्रिय पदार्थांचा वापर करणं आवश्यक आहे. पालापाचोळा, भुस्कट आणि काडी-कचरा जमिनीवर पसरवून ठेवल्यास बाष्पीभवन कमी होतं. जमिनीतील पाणीसाठा टिकून राहतो, असंही प्रा. अनिल बंड यांनी सांगितलं.
पर्जन्यजल संकलनावर भर : शेततळी, चेक डॅम, पाझर तलाव तसेच प्लास्टिक अस्तर असलेले पाणीसाठे तयार करून पावसाचे पाणी साठवण्याचं आवाहनही प्रा. बंड यांनी केले. संकटकाळात हेच पाणी पिकांसाठी जीवनदायी ठरू शकतं, असं ते म्हणाले.
भोंदू हवामान तज्ज्ञांपासून सावध राहा : शेतकऱ्यांनी सोशल मीडियावरील अप्रमाणित हवामान अंदाजांवर विश्वास ठेवू नये. कोणत्याही भोंदू हवामान तज्ञांचा सल्ला ऐकू नये, असेही प्रा. अनिल बंड यांनी स्पष्ट केलंय. भारतीय हवामान विभाग आणि कृषी संशोधन संस्थांकडून जारी होणारे अधिकृत अंदाजाचे प्रमाण मानून हवामान आधारित शेती करावी, असं आवाहन त्यांनी केलं.
उष्णतेच्या लाटा आणि पशुधनालाही धोका : एल निनोमुळं उष्णतेच्या लाटांची तीव्रता वाढू शकते. वृद्ध, लहान मुले आणि बाहेर काम करणाऱ्या मजुरांच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच चाऱ्याची कमतरता आणि पाण्याची टंचाई यामुळं पशुधन धोक्यात येऊन दूध उत्पादन घटण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
निसर्गाशी जुळवून घेण्याची वेळ : सध्याची परिस्थिती ही अपुऱ्या पावसाशी लढण्याची नसून बदलत्या हवामानाशी हुशारीनं जुळवून घेण्याची आहे. निसर्गावर मात करण्याऐवजी निसर्गाशी मैत्री करण्याची गरज असल्याचं भावनिक आवाहनही प्रा. अनिल बंड यांनी केलंय.
महत्त्वाचे मुद्दे
- जूनपासून एल निनोचा प्रभाव वाढण्याची शक्यता
- ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये एल निनो उच्चतम पातळीवर जाण्याचा अंदाज
- विदर्भात कमी पाऊस आणि पावसातील खंड आणि असमान वितरणाचा धोका
- कमी पाण्यात अधिक पीक हीच शाश्वत शेतीची दिशा
- ठिबक सिंचन, मल्चिंग आणि पर्जन्यजल संकलनावर भर
- कमी पाण्यात येणाऱ्या पिकांकडे वळण्याचा सल्ला
- अधिकृत हवामान अंदाजावरच विश्वास ठेवण्याचं आवाहन
हेही वाचा -

