नातवाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्यानं केतन अग्रवालच्या आजोबांचं निधन
केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा मानसिक धक्का सहन न झाल्यानं त्याचे आजोबा देविचंद अग्रवाल यांचं पुण्यात निधन झालं. आठवड्यापूर्वीच त्यांनी न्यायासाठी कँडल मार्चचं नेतृत्व केलं होतं.

Published : July 5, 2026 at 2:28 PM IST
पुणे : लोहगडावर झालेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणामुळं आधीच दुःखाच्या छायेत असलेल्या अग्रवाल कुटुंबावर पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे. दिवंगत केतन अग्रवालचे आजोबा देविचंद अग्रवाल यांचं पुण्यात निधन झालं आहे. नातवाच्या मृत्यूचा मोठा मानसिक धक्का बसल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. केतन अग्रवाल हत्याप्रकरणानंतर देविचंद अग्रवाल यांनी कुटुंबाला धीर देत न्यायासाठी लढण्याची भूमिका घेतली होती. अवघ्या आठवडाभरापूर्वीच त्यांनी केतनला न्याय मिळावा या मागणीसाठी आयोजित करण्यात आलेल्या कँडल मार्चमध्ये स्वतः सहभागी होत नेतृत्व केलं होतं. वयोमान असूनही नातवासाठी न्याय मिळवण्याची त्यांची तळमळ नागरिकांनाही भावूक करून गेली होती.
आरोपींना कठोर शिक्षा मिळण्याची केली होती मागणी : कँडल मार्चदरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना अनेक गंभीर आरोप केले होते. सिया गोयलच्या कुटुंबीयांनी लग्नासाठी दबाव टाकल्याचा आरोप त्यांनी केला होता. तसंच या संपूर्ण प्रकरणातील प्रत्येक संबंधित व्यक्तीची सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषी आढळणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई व्हावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली होती. केतनच्या मृत्यूमागील सत्य पूर्णपणे समोर यावे आणि आरोपींना कायद्यानुसार कठोर शिक्षा मिळावी, अशी त्यांची सातत्याने भूमिका होती.
केतनच्या कुटुंबावर पुन्हा दुखाचा डोंगर कोसळला : केतनच्या मृत्यूनंतर संपूर्ण कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला होता. अशा परिस्थितीत देविचंद अग्रवाल हे कुटुंबासाठी आधारस्तंभ होते. मात्र, नातवाच्या निधनाचं दुःख आणि त्यानंतर सुरू झालेल्या न्यायलढ्याचा ताण यामुळं त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाल्याचं सांगितलं जात आहे. देविचंद अग्रवाल यांच्या निधनामुळं अग्रवाल कुटुंबावर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका बाजूला केतनच्या हत्येचा तपास सुरू असताना, दुसऱ्या बाजूला कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या निधनानं वातावरण अधिकच शोकाकुल झालं आहे.
आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी मागणी : केतन अग्रवाल हत्याप्रकरणाचा तपास सुरू असून, या प्रकरणातील सत्य समोर आणण्यासाठी आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी कुटुंबीयांसह नागरिकांकडून सातत्यानं केली जात आहे. देविचंद अग्रवाल यांनी व्यक्त केलेली हीच इच्छा आता त्यांच्या निधनानंतरही कुटुंबीय आणि न्यायाची मागणी करणाऱ्यांसाठी एक मोठी जबाबदारी बनली आहे.
हेही वाचा :

