ETV Bharat / state

Mumbai Rain Updates : महाड तालुक्यातील कुर्ले घाटात कोसळली दरड; सावधगिरी बाळगूनच प्रवास करण्याचे प्रशासनाचे आवाहन

Mumbai rains today live updates
मुंबईतील विविध भागात मुसळधार पाऊस (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : July 6, 2026 at 7:37 AM IST

|

Updated : July 6, 2026 at 6:41 PM IST

Choose ETV Bharat

मुंबई - भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगराला सोमवारी मुसळधार पावसाचा तसेच सोसाट्याचे वारे वाहतील असा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा व महाविद्यालयांना सोमवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, शासकीय व खासगी कार्यालये नियमितपणे सुरू राहतील. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असेदेखील आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सोमवार दिनांक 6 जुलै 2026 रोजी होणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या सर्व परीक्षा मुसळधार पावसाचा (Orange Alert) तसेच सोसाट्याचे वारे वाहतील असा इशारा आणि स्थितीच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आल्या आहेत, असे मुंबई विद्यापीठाच्या वतीने कळवण्यात आले आहे.

LIVE FEED

6:35 PM, 6 Jul 2026 (IST)

महाड तालुक्यातील कुर्ले घाटात कोसळली दरड; सावधगिरी बाळगूनच प्रवास करण्याचे प्रशासनाचे आवाहन

महाड तालुक्यातील कुर्ले घाटात मोठी दरड कोसळली आहे. दरडीसोबत मातीचा मोठा ढिगारा आणि झाड रस्त्यावर आल्यानं महाडविन्हेरे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. परिसरात अजूनही पाऊस सुरू असल्यानं वाहन चालकांनी सावधगिरी बाळगूनच प्रवास करावा, असे प्रशासनानं आवाहन केलं आहे.

rain live updates
महाड तालुक्यातील कुर्ले घाटात कोसळली दरड (Source- ETV Bharat Reporter)

6:26 PM, 6 Jul 2026 (IST)

पुणे शहर तसेच जिल्ह्यात 20 ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना; पाच जणांचा मृत्यू

पुणे शहर तसेच जिल्ह्यात मागील 48 तासात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात 20 ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण 20 जण जखमी झाले आहेत. उद्यापासून पालखी सोहळा सुरू होत असून हवामान विभागानं घाटमाथ्यावर रेड अलर्ट दिला आहे. वारकऱ्यांनी पुण्यापासून वारीत सहभागी व्हावे, असे आवाहन पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केलं आहे.

5:04 PM, 6 Jul 2026 (IST)

पुणे जिल्ह्यात जवळपास 65 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद; खेड तालुक्यात एक दुचाकीस्वार वाहून गेला

पुणे - जिल्ह्यात जवळपास 65 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. तर काही दुर्गम आणि घाट क्षेत्रांत गेल्या 48 तासांत तब्बल 200 मिमीपेक्षा जास्त मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. मावळ तालुक्यातील पाटण गावात आज पहाटे एका घरावर डोंगराची मोठी दरड कोसळली. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 3 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. एनडीआरएफच्या टीमनं तात्काळ घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केलं आहे. एका व्यक्तीचा मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आला आहे. तसेच खेड तालुक्यात अतिवृष्टीदरम्यान पुराच्या पाण्यात एक दुचाकीस्वार वाहून गेल्याची घटना घडली आहे. शोध पथकाला त्याचा मृतदेह शोधण्यात यश आलं आहे. तसेच लोणावळा आणि मावळ परिसरातील पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी विविध यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली.

4:37 PM, 6 Jul 2026 (IST)

रोहा शहरात होडीद्वारे नागरिकांची सुटका

रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रोहा शहरातील अनेक सखल भागांमध्ये रविवारपासून पुराचे पाणी शिरलं आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून विशेषतः रेल्वे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर रेस्क्यू पथक तातडीनं मदतीसाठी दाखल झालं आहे. रोहा शहर ते रेल्वे स्थानक आणि रेल्वे स्थानक ते रोहा शहर असा होडीद्वारे प्रवाशांची सुरक्षित वाहतूक केली जात आहे. पाण्याचा वेढा पडलेल्या नागरिकांनाही आवश्यक ती मदत करण्यात येत असून परिस्थितीवर प्रशासन आणि रेस्क्यू पथकाचं सातत्यानं लक्ष आहे.

3:42 PM, 6 Jul 2026 (IST)

इंद्रायणी नदीला आलेल्या पुरानंतर एकूण 408 भाविकांची सुरक्षित सुटका

आळंदी- इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे आळंदी शहरातील विविध ठिकाणी अडकलेल्या भाविकांची आळंदी नगरपरिषद, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, पोलीस प्रशासन, अग्निशमन दल, तसेच (एनडीआरएफ) आणि संबंधित विभागांच्या समन्वयातून सुरक्षित सुटका करण्यात आली. बचाव पथकांनी ज्ञानेश्वरी मंदिर परिसरातून 220, इंद्रायणी नगरी येथून 100, ठाकूरबुवा मंडप येथून 60 आणि गोपाळपुरा येथून 28 अशा एकूण 408 भाविकांची सुरक्षित सुटका केली. तसेच विविध ठिकाणी वैयक्तिकरित्या अडकलेल्या भाविकांनाही सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. याशिवाय, बचाव पथकांनी पूरग्रस्त भागातील 150 गायींचीही सुरक्षित सुटका करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविलं आहे. प्रशासनामार्फत बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सातत्याने सुरू असून परिस्थितीवर संबंधित विभागांकडून सतत लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिक आणि भाविकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, तसेच आवश्यक असल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

3:40 PM, 6 Jul 2026 (IST)

इंद्रायणी नदीला महापूर : इंद्रायणी नदीने ओलांडली धोक्याची पातळी

इंद्रायणी नदीला महापूर आला असून इंद्रायणी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर महाद्वार पायऱ्यांनादेखील पाणी लागले आहे. नदीकाठचे अनेक दुकाने पाण्यात बुडाली आहेत. दोन दिवसांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. *पूरपरिस्थितीत अडकलेल्या भाविकांची सुरक्षित सुटका; प्रशासनाचे बचावकार्य युद्धपातळीवर सुरू*

3:26 PM, 6 Jul 2026 (IST)

'नाशिकसह त्र्यंबकेश्वर भागात उद्या ढगफुटी होण्याची शक्यता'-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उद्या नाशिकला अलर्ट देण्यात आला आहे. low pressure belt त्या भागात तयार होत आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर भागात यामुळे ढगफुटी संभाव्य आहे. 300 मिमि पाऊस या भागात होण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून तयारी केली जात आहे. शाळांना सुट्टी देणं किंवा इतर तयारी केली जात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

3:12 PM, 6 Jul 2026 (IST)

मुंबईतील पावसाळी दुर्घटनांवरून मनसे आक्रमक अमित साटम यांच्या छायाचित्राला जोडे मारो आंदोलन

मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे झाडे कोसळणे, घरांच्या भिंती आणि चाळ कोसळण्याच्या घटनांमध्ये झालेल्या मानवी जीवितहानीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आज राज्य सरकार आणि प्रशासनाविरोधात आक्रमक आंदोलन छेडले. दादरसह मुंबईतील विविध भागांत मनसे कार्यकर्त्यांनी भाजप आमदार अमित साटम यांच्या छायाचित्राला प्रतीकात्मक 'जोडे मारो' आंदोलन करत सरकारच्या निष्काळजी कारभाराचा निषेध व्यक्त केला. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली

1:24 PM, 6 Jul 2026 (IST)

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र झाल्यानं मुंबईसह पुण्यातील घाटमाथ्यावर मोठे ढग-हवामान विभाग

जून महिन्यात पावसाच्या विश्रांतीनंतर जुलै महिन्याच्या पहिल्या दिवसापासून पुण्यासह राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यातील अनेक ठिकाणी दरड कोसळण्याची घटना घडली आहे. तर अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने शाळेंना सुट्टी देण्यात आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबईसह पुण्यातील अनेक भागात पुढचे 48 तास महत्त्वाचे आहेत, असे हवामान विभागाचे प्रमुख डॉ. एस. डी. सानप यांनी सांगितलं आहे.

12:55 PM, 6 Jul 2026 (IST)

नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, सर्व यंत्रणा सज्ज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत. नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे. अत्यावश्यक काम असल्याशिवाय प्रवास करू नये. तसेच प्रशासनाने जारी केलेल्या सूचना आणि सतर्कतेच्या निर्देशांचे पालन करावे.

12:15 PM, 6 Jul 2026 (IST)

इंद्रायणी नदीला पूर, आळंदीत प्रवेश करणारे पूल पाण्याखाली, वारकरी ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणीच सुरक्षित थांबावे

आषाढी वारी २०२६ - श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा

सर्व वारकरी, भाविक व नागरिकांना नम्र आवाहन करण्यात येते की, इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणे सुरक्षित नाही.

ज्या वारकरी व भाविकांनी आळंदीच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे, त्यांनी ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणीच सुरक्षित थांबावे व आळंदीमध्ये येण्याचा प्रयत्न करू नये.

कृपया प्रशासन, पोलीस यंत्रणा व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच नदीपात्र, घाट परिसर व बंद करण्यात आलेल्या पुलांकडे जाणे टाळावे.

आपल्या सुरक्षिततेसाठी प्रशासन आवश्यक ती सर्व उपाययोजना करत आहे. सर्वांनी संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे, ही नम्र विनंती.

12:11 PM, 6 Jul 2026 (IST)

प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य - CMO

मुंबई-पुणे मार्गावरील रेल्वे प्रवासाबाबत अपडेट

मुंबई-पुणे परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आणि घाट विभागात झालेल्या दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत रेल्वे प्रशासनाने काही गाड्या रद्द, काहींचे मार्ग बदल, तर काही गाड्यांचे प्रारंभ व समाप्ती स्थान बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

11:57 AM, 6 Jul 2026 (IST)

मुंबई-गोवा महामार्गावरील पुराच्या पाण्यात कार बुडाली

रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई-गोवा महामार्गालाही बसला आहे. वाकण आणि सुकेळी खिंड परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने आज सकाळपासून महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. दरम्यान, याच साचलेल्या पुराच्या पाण्यात एक चारचाकी कार बुडाल्याची घटना समोर आली आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील पुराच्या पाण्यात कार बुडाली (ETV Bharat Reporter)

11:37 AM, 6 Jul 2026 (IST)

पुणे मुंबईदरम्यानची एसटी वाहतूक बंद, रेल्वे सेवाही ठप्प

पुणे मुंबईदरम्यानची एसटी वाहतूक बंद, रेल्वे सेवाही ठप्प

पुणे-मुंबई मार्गावर दरड कोसळल्यामुळे, पुढील आदेश येईपर्यंत पुणे-मुंबई दरम्यानची सर्व एसटी बस वाहतूक बंद करण्यात आली आहे.

सकाळी पुण्याहून मुंबईसाठी निघालेल्या ४ एसटी बसेस 'उर्से टोल नाका' परिसरात अडकल्या होत्या, त्यांना सुरक्षितपणे पुन्हा पुण्यात माघारी बोलावण्यात आले आहे. कृपया प्रवाशांनी सहकार्य करावे आणि रस्ता मोकळा होईपर्यंत प्रवासाचे नियोजन करू नये.

- कमलेश धनराळे, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी पुणे विभाग

11:36 AM, 6 Jul 2026 (IST)

मुंबईतील खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रोम होम'च्या सूचना, सरकारी कर्मचाऱ्यांना हाफ डे

मुंबईतील खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रोम होम'च्या सूचना, सरकारी कर्मचाऱ्यांना हाफ डे

भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगर क्षेत्रासाठी अतिवृष्टीचा इशारा (Red Alert) जारी केला असून ताशी ८० ते ९० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविली आहे.

या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (State Disaster Management Authority)यांनी मुंबईतील सर्व खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याचे (Work From Home) निर्देशित केले आहे.

तसेच, शासकीय/ निमशासकीय (अत्यावश्यक सेवा वगळून) कर्मचाऱ्यांना दुपारनंतर अर्धा दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

11:13 AM, 6 Jul 2026 (IST)

मुंबई-गोवा महामार्गावरील पुराच्या पाण्यात कार बुडाली, जीवितहानी टळली

मुंबई-गोवा महामार्गावरील पुराच्या पाण्यात कार बुडाली, जीवितहानी टळली

रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई-गोवा महामार्गालाही बसला आहे. वाकण आणि सुकेळी खिंड परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने आज सकाळपासून महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. दरम्यान, याच साचलेल्या पुराच्या पाण्यात एक चारचाकी कार बुडाल्याची घटना समोर आली आहे.

सुदैवाने कारमधील सर्व प्रवासी वेळीच बाहेर पडण्यात यशस्वी झाल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, कार पूर्णपणे पुराच्या पाण्यात अडकली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सततच्या पावसामुळे महामार्गावरील अनेक ठिकाणी पाणी साचले असून वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. प्रशासनाकडून नागरिकांना विनाकारण प्रवास टाळण्याचे आणि पूरग्रस्त भागातून वाहन नेण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील पुराच्या पाण्यात कार बुडाली (ETV Bharat Reporter)

11:11 AM, 6 Jul 2026 (IST)

लोणावळा : वेदांत अकॅडमी परिसरात पीएमआरडीएच्या पीडीआरएफचे पथक दाखल

लोणावळा : वेदांत अकॅडमी परिसरात पीएमआरडीएच्या पीडीआरएफचे पथक दाखल

लोणावळा येथील हुडको कॉलनीतील वेदांत अकॅडमी परिसरात पीएमआरडीएच्या पीडीआरएफ (PDRF) पथकाने घटनास्थळी दाखल होत पाहणी व आवश्यक मदतकार्य सुरू केले आहे.

परिस्थितीचा आढावा घेत संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाने जारी केलेल्या अधिकृत सूचनांचे पालन करावे.

11:09 AM, 6 Jul 2026 (IST)

रुळाजवळील दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु

मुंबई विभागात मंकी हिल येथे घाट सेक्शनमध्ये दरड कोसळल्यामुळे पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या 16 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर 06 गाड्यांचा मार्ग वळवला आहे तर काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट म्हणजेच अलीकडील स्थानकांवर थांबवण्यात आल्या आहेत. रुळाजवळील दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

ETV Bharat Reporter
रेल्वे रुळाजवळील दरड हटवण्याचे काम सुरु (pune rain)

10:54 AM, 6 Jul 2026 (IST)

रायगडमध्ये मुसळधार पाऊस, जिल्ह्याची सरासरी 220.56 मिमी

रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून गेल्या २४ तासांत अनेक तालुक्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे. ६ जुलै रोजी सकाळी साडे दहा वाजेपर्यंत जिल्ह्यात एकूण ३३०८.४० मिमी पावसाची नोंद झाली असून जिल्ह्याची सरासरी २२०.५६ मिमी इतकी आहे. सर्वाधिक पाऊस कर्जत तालुक्यात २९७ मिमी, त्यापाठोपाठ सुधागडमध्ये २९२ मिमी, खालापूरमध्ये २९० मिमी आणि म्हसळ्यात २८८ मिमी इतका झाला आहे. महाड आणि पोलादपूर या दोन्ही तालुक्यांत प्रत्येकी २६५ मिमी, पेणमध्ये २६५ मिमी, पनवेलमध्ये २२५.४० मिमी, श्रीवर्धनमध्ये २२८ मिमी, उरणमध्ये २१९ मिमी, तळामध्ये २०९ मिमी, रोहामध्ये १९६ मिमी, माणगावमध्ये १९३ मिमी, मुरूडमध्ये १७५ मिमी तर अलिबागमध्ये सर्वाधिक कमी म्हणजेच १२८ मिमी ईतकी पावसाची नोंद झाली आहे.

या मुसळधार पावसामुळे अनेक नद्या, ओढे दुथडी भरून वाहत असून सखल भागात पाणी साचण्याच्या घटना घडत आहेत. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये तसेच नदी-नाले आणि धबधब्यांच्या परिसरात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

10:52 AM, 6 Jul 2026 (IST)

पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी महत्त्वाचे आपत्ती व्यवस्थापन संपर्क क्रमांक

पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी महत्त्वाचे आपत्ती व्यवस्थापन संपर्क क्रमांक

सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी खालील आपत्ती व्यवस्थापन हेल्पलाईन क्रमांक जवळ ठेवावेत.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालय – जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष

- लँडलाईन : ०२०-२६१२३३७१

- टोल फ्री हेल्पलाईन : १०७७

- मोबाईल : ९३७०९ ६००६१

पुणे महानगरपालिका (PMC)

- ०२०-२५५०१२५९

- ०२०-२५५०६८००

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC)

- ०२०-६७३३११११

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) – पुणे महानगर आपत्ती प्रतिसाद दल (PDRF)

- ९५४५२ ८२९३०

10:50 AM, 6 Jul 2026 (IST)

मावळ तालुक्यात पाटण गावात दरड कोसळल्याची घटना, बचावकार्य सुरू

मावळ तालुक्यात पाटण गावात दरड कोसळल्याची घटना, बचावकार्य सुरू

मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (6 जुलै) पहाटे एका घरावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित घरातील संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी (DDMO), पुणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच मावळचे तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) च्या पुणे येथील ५व्या बटालियनची मदत मागविण्यात आली आहे. त्यानुसार निरीक्षक रविंदर यांच्या नेतृत्वाखाली आणि सहाय्यक कमांडंट चंद्रकेतू शर्मा यांच्या देखरेखीखाली ३० सदस्यांचे (१ अधिकारी, २ वरिष्ठ अधिकारी व २७ जवान) पथक आवश्यक आपत्ती व्यवस्थापन साहित्यांसह सकाळी ५.५० वाजता घटनास्थळाकडे रवाना झाले.

सध्या बचावकार्य सुरू असून, अधिकृतरीत्या कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद झालेली नाही.

10:21 AM, 6 Jul 2026 (IST)

पावसामुळे रद्द झालेल्या ट्रेन्सची नावे, ट्रेन नंबर

पावसामुळे रद्द झालेल्या ट्रेन्सची नावे, ट्रेन नंबर -

22105 / 22106: CSMT – पुणे – CSMT इंद्रायणी एक्सप्रेस (Indrayani Express)

​12169 / 12170: पुणे – सोलापूर – पुणे इंटरसिटी एक्सप्रेस (Intercity Express)

​12127 / 12128: CSMT – पुणे – CSMT इंटरसिटी एक्सप्रेस (Intercity Express)

​11007 / 11008: CSMT – पुणे – CSMT डेक्कन एक्सप्रेस (Deccan Express)

​12123 / 12124: CSMT – पुणे – CSMT डेक्कन क्वीन एक्सप्रेस (Deccan Queen Express)

​12125 / 12126: CSMT – पुणे – CSMT प्रगती एक्सप्रेस (Pragati Express)

​11009 / 11010: CSMT – पुणे – CSMT सिंहगड एक्सप्रेस (Sinhagad Express) (इमेजमध्ये फक्त ११MDEw नंबर आहे)

​11011: CSMT – धुळे धुळे एक्सप्रेस (Dhule Express)

​11012 (DHI – CSMT) JCO 06.07.2026: धुळे – मुंबई धुळे एक्सप्रेस (Dhule Express)

​11009 (CSMT – PUNE) JCO 06.07.2026: मुंबई – पुणे सिंहगड एक्सप्रेस (Sinhagad Express)

कुठल्या गाड्यांचे मार्ग बदलले (Diverted)

​11049 (ADI – KOP) JCO 05.07.2026: अहमदाबाद – कोल्हापूर अहमदाबाद एक्सप्रेस (या गाड्याचा मार्ग बदलून कल्याण – इगतपुरी – मनमाड – दौंड कॉर्ड लाईन – पुणे असा करण्यात आला आहे).

​22944 (INDB – DD) JCO 05.07.2026: इंदूर – दौंड दौंड एक्सप्रेस (मार्ग बदलून: कल्याण – इगतपुरी – मनमाड – दौंड).

​12297 (ADI – PUNE) JCO 05.07.2026: अहमदाबाद – पुणे दुरंतो एक्सप्रेस (मार्ग बदलून: कल्याण – इगतपुरी – मनमाड – दौंड कॉर्ड लाईन – पुणे).

​22144 (BIDR – CSMT) JCO 05.07.2026: बिदर – मुंबई बिदर एक्सप्रेस (मार्ग बदलून: दौंड – मनमाड – इगतपुरी – कल्याण).

​17614 (NED – PNVL) JCO 05.07.2026: नांदेड – पनवेल नांदेड एक्सप्रेस (मार्ग बदलून: दौंड – मनमाड – इगतपुरी – कल्याण).

10:07 AM, 6 Jul 2026 (IST)

मुंबई महानगरपालिकेचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन

मुंबई महानगरपालिकेचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन

बृहन्मुंबई महानगरपालिका

महत्त्वाची जनहित सूचना

भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगर क्षेत्रासाठी अतिवृष्टीचा इशारा (Red Alert) जारी केला असून ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे. झाडे, जीर्ण इमारती, होर्डिंग्ज, विद्युत खांब तसेच इतर धोकादायक ठिकाणांपासून सुरक्षित अंतर राखावे. झाडांखाली वाहने उभी (Park) करण्याचे टाळावे. समुद्रकिनारी तसेच पाणथळ भागात जाणे टाळावे.

नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात येणाऱ्या सूचना व इशाऱ्यांचे पालन करावे. प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचना व मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावे.

तसेच, आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 1916 या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन करण्‍यात येत आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेसह विविध यंत्रणांचे सुमारे १५ हजार अधिकारी व कर्मचारी आपापल्या कार्यक्षेत्रात (ऑन ग्राउंड) अहोरात्र कार्यरत आहेत. वरिष्ठ अधिकारीदेखील प्रत्येक घडामोडीवर सातत्याने बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजनांचे समन्वयन करीत आहेत.

9:30 AM, 6 Jul 2026 (IST)

मुंबई विद्यापीठाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या

सोमवार दिनांक 6 जुलै 2026 रोजी होणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या सर्व परीक्षा मुसळधार पावसाचा (Orange Alert) तसेच सोसाट्याचे वारे वाहतील असा इशारा आणि स्थितीच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आल्या आहेत, असे मुंबई विद्यापीठाच्या वतीने कळवण्यात आले आहे.

मुंबईत मुसळधार पाऊस (null)

9:07 AM, 6 Jul 2026 (IST)

पाली- खोपोली मार्गावर अंबा नदीचे पुराचे पाणी शिरल्यामुळे वाहतूक बंद

सोमवार दिनांक 6 जुलै 2026 रोजी होणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या सर्व परीक्षा मुसळधार पावसाचा (Orange Alert) तसेच सोसाट्याचे वारे वाहतील असा इशारा आणि स्थितीच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आल्या आहेत, असे मुंबई विद्यापीठाच्या वतीने कळवण्यात आले आहे.पाली- खोपोली मार्गावर अंबा नदीचे पुराचे पाणी शिरल्यामुळे वाहतूक बंद

श्रीक्षेत्र बल्लाळेश्वर परिसरात पुराच्या पाण्याचा फटका

संपूर्ण पाली शहर अंबा नदीच्या पुराच्या पाण्याखाली

पाली शहर, एसटी बस स्थानक, भाजी मार्केट, या परिसरांना अंबा नदीच्या पुराच्या पाण्याचा विळखा

8:51 AM, 6 Jul 2026 (IST)

मुंबई-पुणे रेल्वे सेवा ठप्प

मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील Tunnel No. 40 (BB EMD) येथे दरड कोसळली आहे. दरड हटविण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू असून, मार्ग पूर्ववत करण्यासाठी यंत्रणा कार्यरत आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून, काही गाड्या रद्द तसेच काही रेल्वे वळविण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी प्रवासापूर्वी आपल्या गाडीची स्थिती तपासूनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

8:51 AM, 6 Jul 2026 (IST)

अतिवृष्टीमुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतुकीला फटका

रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मोठा परिणाम मुंबई–पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतुकीवर झाला आहे. एक्सप्रेस वेवरील मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगदा क्रमांक २ च्या बाहेर पहाटे दरड कोसळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून कनेक्टिंग लिंक मार्गावरील वाहतूक तातडीने बंद करण्यात आली. त्यामुळे पहाटेपासून या मार्गावरील सर्व वाहने मुख्य एक्सप्रेस वेवरून वळवण्यात आली आहेत. संबंधित यंत्रणेकडून दरड हटविण्याचे आणि परिसर सुरक्षित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, वाहनचालकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

8:12 AM, 6 Jul 2026 (IST)

पुणे-मुंबई कनेक्टिंग लिंक रोडवरील एक्झिटजवळ दरड कोसळली, शक्य असल्यास प्रवास टाळण्याचा सल्ला

पुणे-मुंबई कनेक्टिंग लिंक रोडवरील एक्झिटजवळ दरड कोसळली, शक्य असल्यास प्रवास टाळण्याचा सल्ला

8:04 AM, 6 Jul 2026 (IST)

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना आजसुट्टी

एमएसआरडीसीचे निवेदन

पुणे-मुंबई कनेक्टिंग लिंक रोडवरील पुणे ते मुंबई लेनवर, बोगदा क्रमांक 2 च्या बाहेर पडण्याच्या मार्गाजवळ (एक्झिटजवळ) अतिवृष्टीमुळे दरड कोसळली आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव, पहाटे 4 वाजल्यापासून वाहतूक वळवण्यात आली आहे.

महामार्ग वाहतूक पोलिसांच्या (हायवे ट्रॅफिक पोलीस) समन्वयाने परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहोत.

प्रवाशांना शक्य असल्यास प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

पुणे - भारतीय हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट जारी करून काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार, तर तुरळक ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर तसेच पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व शाळांना सोमवार, दि. 6 जुलै 2026 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.

आदेशानुसार, संभाव्य अतिवृष्टी व नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) क्षेत्रातील सर्व अंगणवाड्या तसेच सर्व माध्यमांच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना दि. 6 जुलै रोजी सुट्टी राहील. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

तथापि, सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी नेहमीप्रमाणे कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या सूचनेनुसार आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित कामकाजासाठी सज्ज राहावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे, नदी-नाले, धबधबे आणि पाण्याचा वेग असलेल्या ठिकाणी जाणे टाळण्याचे तसेच प्रशासन व भारतीय हवामान विभागाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.

7:53 AM, 6 Jul 2026 (IST)

रायगडमध्ये पुर परिस्थिती

रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसानंतर पूरस्थिती कायम आहे. सावित्री, कुंडलिका, अंबा आणि पाताळगंगा नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. महाड, रोहा, नागोठणे, पेण आणि खोपोली येथे रात्रभर अनेक भाग पाण्याखाली होते. काही ठिकाणी पाणी ओसरू लागले असले, तरी महाडमधील बाजारपेठ, दस्तुरी नाका, गंधारी पूल आणि दादली पूल परिसरासह अनेक रस्ते अद्याप जलमय असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Last Updated : July 6, 2026 at 6:41 PM IST