ETV Bharat / state

मुंबई, ठाण्यासारखंच नाशिकमध्ये 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांची घरपट्टी माफ करू ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई आणि ठाण्यासारखंच नाशिकमध्ये 500 चौरस फुटांच्या घरांची घरपट्टी माफ करू असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं. ते नाशिक इथं झालेल्या सभेत बोलत होते.

DCM Eknath Shinde Rally In Nashik
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 11, 2026 at 11:04 AM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

नाशिक : "महापालिकेची सत्ता आमच्याकडं द्या, आम्ही मुंबई, ठाणे महापालिकाप्रमाणं 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांची घरपट्टी माफ करू," असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिककरांना दिलं. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन सेना या पक्षांच्या महापालिकेतील निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार सुनील तटकरे यांची हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर भव्य सभा पार पडली. त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

DCM Eknath Shinde Rally In Nashik
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला झालेली गर्दी (ETV Bharat Reporter)

उमेदवारांच्या पाठीशी महिला त्यांचा मतपेटीत नंबर पहिला : "ज्या उमेदवारांच्या पाठीशी महिला त्यांचा मतपेटीत नंबर पहिला हे गणित विधानसभेच्या निवडणुकीपासून दृढ झालं आहे. नगर परिषदेच्या निवडणुकीत देखील हीच स्थिती पाहण्यास मिळाली. तीन वर्षात 450 कोटी नाशिकच्या विकासासाठी दिले. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मोठा निधी दिला आहे. कुंभमेळा देखील ऐतिहासिक होईल. साधू संताना, भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणार आहोत. सर्व नाशिककरांची इच्छा तपोवन वाचवा अशी असून, पर्यावरणाचा समतोल साधूनच कुंभमेळा होणार आहे. तसेच गोदावरी नदीच्या परिसरात पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करणार आहोत. नाशिकमध्ये धार्मिक आणि पर्यटनस्थळांचा देखील विकास आम्ही करणार आहोत. पुनर्विकासात 9 मीटर उंचीच्या रस्त्यावर इमारतींची उंची 30 मीटरपर्यंत करण्याचे प्रयत्न करणार आहोत. नवीन नाशिक भागातील सिडकोची घरं फ्री होल्ड करण्याचा निर्णय घेऊ. पार्क फेज 2 साठी निधी देण्याचं काम करू. मुंबई नाका, द्वारका चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यावर काम करणार आहोत," असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारांना केलं.

काय म्हटले एकनाथ शिंदे : "लाडक्या बहिणीला आणि भावांना मी भेटायला आलो आहे. ही विजयाची सभा आहे, एवढी गर्दी आहे. विधानसभा आणि नगरपालिकेमध्ये त्याची प्रचिती आली आहे. कुंभमेळ्यावर टीका करणाऱ्यांचा काल कुंभमेळा भरला होता. विरोधकांनी काही करा, नाशिक महानगरपालिकेवर भगवा फडकेलं. नाशिककरांनी ठरवलं आहे, परिवर्तन घडणार. काही लोकांना विकास करण्यात इंटरेस्ट नाहीये, तिजोरीवर इंटरेस्ट आहे. मुंबईतही तेच होत आहे. कोणी खोडा घातला, तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. कुंभमेळ्यासाठी हजारो कोटी दिले. नाशिकचा कुंभमेळा ऐतिहासिक होईल, यासाठी आपण सगळे प्रयत्न करणार आहोत. यासाठी नवीन रस्ते, घाट, आरोग्य, परिवहन सुविधा करण्यात येत आहेत. तपोवन वाचलं पाहिजे, पर्यावरणाचा समतोल राखून कुंभमेळा पार पडेल. नाशिकच्या पर्यटनाला नववैभव मिळून देऊ," असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा :

  1. 'कोल्हापुरात माती लावूनच यावं लागतं'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काँग्रेसवर प्रहार, म्हणाले "ज्यांच्या मागं महिला...'
  2. मुंबईत महायुतीचाच महापौर होणार; एकनाथ शिंदे यांना विश्वास, पुण्यात विरोधकांना कात्रजचा घाट दाखवणार
  3. मंत्री गणेश नाईक यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप, शिंदे म्हणाले 'चोराच्या उलट्या बोंबा'