ETV Bharat / state

बिबट्यानं अंगणातून उचलून नेला 'काळजाचा तुकडा'; धाय मोकलून रडले आई वडील, नागरिक हादरले

आई वडिलासह चुलीजवळ शेकत बसलेल्या चिमुकल्याला बिबट्यानं उचलून नेल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना गोंदिया जिल्ह्यातील खडकी गावात घडली.

Leopard Kills 4 Years Child
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 9, 2026 at 4:30 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

गोंदिया : घराच्या अंगणात आई वडिलासह चुलीजवळ शेकत बसलेल्या चिमुकल्याला बिबट्यानं उचलून नेल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना तिरोडा तालुक्यातील खडकी (डोंगरगाव) इथं आज सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली. या हृदयद्रावक घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. बिबट्यानं चार वर्षांच्या चिमुकल्यावर हल्ला करून त्याला अंगणातून उचलून नेलं. या हल्ल्यात त्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. हियांश शिवशंकर रहांगडाले (वय 4) असं बिबट्यानं केलेल्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या चिमुकल्याचं नाव आहे.

अंगणात चुलीजवळ बसला होता चिमुकला : मिळालेल्या माहितीनुसार, हियांश हा आपल्या आई-वडिलांसोबत घराच्या अंगणात चुलीजवळ बसलेला होता. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या बिबट्यानं अचानक हल्ला चढवत चिमुकल्याला उचलून नेलं. पालकांनी आरडाओरड करत बिबट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र बिबट्यानं चिमुकल्याला घेऊन पळ काढला. पालकांनी पाठलाग केल्यानंतर काही अंतरावर चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर गावात प्रचंड संतापाची लाट उसळली असून संपूर्ण गावात दहशत निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, काही तास लोटून सुद्धा वन विभाग आणि पोलीस प्रशासन अद्याप घटनास्थळी दाखल झालेलं नव्हतं.

खडकी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार वाढला : खडकी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार वाढला असून याआधीही अनेकदा ग्रामस्थांनी वन विभागाकडं तक्रारी केल्या होत्या. मात्र, वेळेवर ठोस उपाययोजना न झाल्यानं आज एका निष्पाप जीवाला प्राण गमवावा लागल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे रहांगडाले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गाव शोकसागरात बुडालं आहे. प्रशासनानं तातडीनं बिबट्याचा बंदोबस्त करावा, पीडित कुटुंबाला तत्काळ मदत व नुकसान भरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा :

  1. वन्यप्राणी-मानवामधील संघर्ष शिगेला! हल्ला करणाऱ्या बिबट्यासह शेतकऱ्याचा विहिरीत पडल्यानंतर मृत्यू
  2. भीती बिबट्याची! प्रादेशिक दृष्टिकोनातून प्रश्न हाताळण्याची गरज; जाणून घ्या बिबट्याची खास माहिती
  3. पुणे जिल्ह्यात वर्षभर बिबट्याची दहशत आणि हल्ल्यांमध्ये वाढ; वाचा 2025 चा लेखाजोखा