ETV Bharat / state

राजर्षी शाहू महाराजांचा इतिहास सांगणाऱ्या ऐतिहासिक संग्रहालयाचं लोकार्पण; बऱ्याच न पाहिलेल्या गोष्टी उलगडणार

कोल्हापूर येथील राजर्षी शाहू जन्मस्थळ असलेल्या लक्ष्मी विलास पॅलेस वस्तू संग्रहालयाचं उद्घाटन मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते शनिवारी होणार आहे.

Laxmi vilas palace Museum
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा प्रसंग (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : February 21, 2026 at 7:31 AM IST

|

Updated : February 21, 2026 at 8:25 AM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म झालेला 'लक्ष्मी विलास पॅलेस' आता ऐतिहासिक वस्तुनिष्ठ संग्रहालय म्हणून कोल्हापूरकरांच्या समोर उभं राहत आहे. तब्बल 18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर तयार झालेल्या या राजर्षी शाहू छत्रपती जन्मस्थळ संग्रहालयाचा भव्य लोकार्पण सोहळा शनिवारी सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते हा सोहळा पार पडणार आहे.

माध्यमांशी बोलताना इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत (ETV Bharat Reporter)

जन्मस्थळी उभारलेला वस्तुनिष्ठ इतिहास : लक्ष्मी विलास पॅलेस ही केवळ एक भव्य वास्तू नाही, तर राजर्षी शाहू महाराजांचं बालपण, शिक्षण आणि राज्यकारभाराच्या प्रारंभिक काळाचा साक्षीदार आहे. या संग्रहालयात त्यांच्या जीवनकार्यावर आधारित दुर्मीळ छायाचित्रं, वैयक्तिक वस्तू, दस्तऐवज, शिल्पकला आणि प्रसंगचित्रांचा समावेश आहे. कोल्हापूर संस्थानातील त्यांनी घेतलेल्या जसं की आरक्षणाची सुरुवात स्त्रीशिक्षणाचा प्रसार, खेळाडूंसाठी सन्माननीय धोरण आणि अस्पृश्यताविरोधी लढा क्रांतिकारी निर्णयांचे दस्तावेज इथे वस्तुनिष्ठ स्वरूपात पाहता येणार आहेत. विशेषतः लाल मातीच्या आखाड्यात त्यांनी शिवकालीन युद्धकला आणि कुस्तीचा सराव केलेल्या ठिकाणचं संवर्धन आणि डिजिटल प्रदर्शन कोल्हापूरकरांना इतिहासाच्या थेट स्पर्शाची अनुभूती देणार आहे.

Laxmi vilas palace Museum
संग्रहालयात ठेवलेल्या वस्तू (ETV Bharat Reporter)

"भव्य अशा या वस्तू संग्रहालयात लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनचरित्र आकर्षक पद्धतीनं आणि माहिती पूर्ण स्वरूपात कोल्हापूरकरांना जाणून घेता येणार आहे" - इंद्रजीत सावंत, इतिहास संशोधक

Laxmi vilas palace Museum
कोल्हापुरातील रेल्वे स्टेशनची प्रतिकृती (ETV Bharat Reporter)

शाहू महाराजांचा होलोग्राफिक शो आणि बरंच काही : या संग्रहालयात छत्रपती शाहू महाराजांबद्दल अनेक गोष्टी प्रतिकृतींच्या माध्यमातून समोर मांडण्यात आलेल्या आहेत. यामध्ये शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या विकासासाठी आणि रयतेच्या कल्याणासाठी केलेले कार्य कलात्मक गोष्टींमधून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रथमच शाहू महाराज स्वतः उपस्थितांशी संवाद साधत असल्याचा अनुभव या ठिकाणी घेता येणार आहे. त्यासाठी एका मिनी थिएटरमध्ये विशेष होलोग्रफिक शोची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे.

Laxmi vilas palace Museum
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा प्रसंग (ETV Bharat Reporter)

लोकोत्सवासारखा उत्सव आणि मान्यवरांची उपस्थिती : या वस्तूसंग्रहालयाचा लोकार्पण सोहळा लोकोत्सवात रूपांतरित करण्याचा निर्धार आयोजकांनी केला आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार उपस्थित राहणार आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पूर्वतयारी बैठकीत करवीचे तहसीलदार स्वप्निल पवार, अभिरक्षक उदय सुर्वे-अक्षय कुरणे, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत, अखिल भारतीय मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक यांनी सुयोग्य नियोजनासाठी सूचना दिल्या. जिल्ह्यातील शाहू प्रेमींना मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहनही करण्यात आले.

Laxmi vilas palace Museum
संग्रहालयात ठेवलेल्या वस्तू (ETV Bharat Reporter)

शाहू समता ज्योत रॅलीनं वाढणार उत्साह : समतेचा संदेश सर्वदूर पोहोचवण्यासाठी राजर्षी शाहू सलोखा मंच आणि अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्या वतीनं शनिवारी दुपारी 3 वाजता दसरा चौकातून 'शाहू समता ज्योत रॅली' काढली जाणार आहे. ही रॅली जन्मस्थळापर्यंत पोहोचेल आणि संग्रहालय लोकार्पणाला वेगळी चमक देईल. या संग्रहालयामुळं कोल्हापूरकरांना केवळ इतिहास पाहण्याचीच नव्हे, तर शाहू महाराजांच्या विचारांना जिवंत करून घेण्याची संधी मिळेल. हे संग्रहालय कोल्हापूरच्या सांस्कृतिक वारशाची नवी ओळख ठरेल.

हेही वाचा :

  1. गोव्यातील ऐतिहासिक महत्त्व असलेले मंगेशी मंदिर आणि शांतादुर्गा मंदिर; मंगेशकर कुटुंबीयांसोबत देखील आहे खास नातं!
  2. पाच वर्षांच्या लढ्याला यश, 'अंनिस'च्या पुढाकारानं जात पंचायत बरखास्त, आंतरजातीय विवाह केलेल्या महिलेला अखेर न्याय
  3. मुस्लीम आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान, लवकरच सुनावणीची शक्यता
Last Updated : February 21, 2026 at 8:25 AM IST