ETV Bharat / state

दादर अपघात : चालकाच्या प्रसंगावधानामुळे टळला मोठा अनर्थ; अन्यथा 10 ते 12 जणांचा जीव गेला असता, प्रत्यक्षदर्शीनं सांगितला थरार

मुंबईत आज 'बेस्ट'द्वारे चालवल्या जाणाऱ्या एका इलेक्ट्रिक बसनं अनेक वाहनांना धडक दिली. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर अन्य तीन जखमी झाले.

BEST bus accident Dadar
दादरमध्ये बेस्ट बसचा अपघात (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : June 8, 2026 at 2:28 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आज (8 जून) सोमवारी सकाळी 'बेस्ट' (BEST) द्वारे चालवल्या जाणाऱ्या एका इलेक्ट्रिक बसचा भीषण अपघात झाला. दादरमधील प्लाझा सिनेमागृहाजवळ ही इलेक्ट्रिक बस अनियंत्रित झाली आणि तिनं अनेक वाहनं तसंच पादचाऱ्यांना धडक दिली. या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत तीन ते चार जण जखमी झाले असून, चारहून अधिक वाहनांचं नुकसान झालं आहे.

'अपघाताची सखोल चौकशी केली जाणार' : या अपघाताबाबत माध्यमांशी बोलताना, महानगरपालिकेच्या बेस्ट समितीच्या अध्यक्षा तृष्णा विश्वासराव म्हणाल्या की, सदर अपघाताची सखोल चौकशी केली जाणार आहे. बस कंपनीचे मालक, बेस्ट महासंचालक यांच्यासोबत महत्त्वाची बैठक घेऊन अपघात नक्की कसा झाला आणि यावर काय नियोजन करता येईल? यावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल. याचबरोबर मृतांच्या नातेवाईकांना मदत देखील केली जाणार आहे.

अपघातातील मृतांची नावं : या अपघातात मियाज अहमद (वय 28) यांचा मृत्यू झाला आहे.

अपघातातील जखमींची नावं :

  • अमित म्हात्रे (वय 41, पादचारी)
  • वृषभ गुप्ता (वय 22)
  • महेश डोईफोडे (वय 50, बेस्ट बस इन्स्पेक्टर)
  • विकास पदारे (वय 42, बस चालक)
  • राजेंद्र पेलेकर (वय 57, बस कंडक्टर)
  • आणि सतीश वाघमारे (वय 48, बेस्ट बस इन्स्पेक्टर) यांचा समावेश आहे. यापैकी वृषभ गुप्ता हे गंभीर जखमी झाले आहेत.

बस चालकावर गुन्हा दाखल : या प्रकरणी बस चालक विकास पदारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 281, 125, 125(A), 125(B), 106 तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम 184 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दरम्यान, या अपघाताची सखोल चौकशी करण्यासाठी बेस्ट प्रशासनानं चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली असून समितीकडून अपघाताच्या कारणांचा तपास केला जाणार आहे.

'... तर 10 ते 12 जण चिरडले असते' : बस चालकानं प्रसंगावधान दाखवलं नसतं तर या अपघातात 10 ते 12 नागरिक चिरडले गेले असते, असं प्रत्यक्षदर्शी अजित चव्हाण यांनी सांगितलं. ते म्हणाले की, जर संबंधित चालकानं प्रसंगावधान दाखवून ब्रिज कन्स्ट्रक्शनच्या ठिकाणी बस धडकवली नसती तर या ठिकाणी 10 ते 12 जण मृत झाले असते. परिसर अतिशय वर्दळीचा होता. रस्त्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर नागरिक चालत होते. मात्र अपघात घडत आहे, हे लक्षात येताच नियंत्रण सुटल्यावर ड्रायव्हरनं लगेच बस नागरिक नाहीत अशा भागात नेण्याचा प्रयत्न केला मोठ्या प्रमाणावर जीवितहानी टळली."

पोलिसांनी काय सांगितलं? : मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सोमवारी (8 जून) सकाळी 9:30 वाजेच्या सुमारास 'बेस्ट'च्या एका इलेक्ट्रिक बसचं (मार्ग क्र. 463/31) नियंत्रण सुटल्यानं ती कोतवाल गार्डनजवळ 5 वाहनांवर मागून जाऊन आदळली. या अपघातात अ‍ॅक्टिव्हा स्कूटर, इलेक्ट्रिक बाईक, टॅक्सी, बलेनो कार आणि एका इलेक्ट्रिक कारचा समावेश होता. या अपघातात अ‍ॅक्टिव्हा चालक, इलेक्ट्रिक बाइकस्वार आणि बसचा वाहक (कंडक्टर) जखमी झाले. जखमींना उपचारासाठी तातडीनं सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतलं असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बसची JCB ला धडक : प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, बसचालकाचं अचानक वाहनावरील नियंत्रण सुटलं. त्यानंतर बसनं रस्त्यावरील पादचारी, दुचाकी आणि काही चारचाकी वाहनांना धडक दिली. नियंत्रण सुटलेली ही बस अखेरीस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या JCB मशीनवर आदळून थांबली. या अपघातामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला.

हेही वाचा