Bihar Election Results 2025

ETV Bharat / state

पट्टणकडोलीत भरतो पारंपरिक घोंगड्यांचा पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा बाजार; दोन ते अडीच कोटींची होते उलाढाल, काय आहेत घोंगडीचे आरोग्यवर्धक फायदे?

महाराष्ट्रात सर्वांत मोठा भरला जाणारा घोंगडी बाजार (Wool Blanket Market) पट्टणकोडोली येथील श्री विठ्ठल-बिरदेव यात्रेत भरला जातो.

Wool Blanket
धनगर बांधवांची घोंगडी (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : October 15, 2025 at 7:51 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

कोल्हापूर : पारंपरिक पद्धतीनं हातावर विणलेली, आरोग्यवर्धक, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा आशा तिन्हीही ऋतूत खासकरून धनगर बांधवांची ओळख असलेल्या घोंगड्यांचा पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा बाजार विठ्ठल-बिरदेवाचं देवस्थान असलेल्या कोल्हापुरातील पट्टणकडोली गावात भरतो. महाराष्ट्रासह कर्नाटक, तामिळनाडू राज्यातून 250 पेक्षा अधिक घोंगड्याचे व्यापारी दरवर्षी पट्टणकोडोलीच्या यात्रेनिमित्त गावात येतात. वेगवेगळ्या 25 प्रकारच्या पारंपरिक घोंगड्यांच्या होणाऱ्या विक्रीतून दहा दिवसांच्या काळात दोन ते अडीच कोटींची उलाढाल या व्यवसायातून होत असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. तर बदललेल्या जीवनशैलीमुळं पारंपारिक हस्तकलेची वीण आधुनिक तंत्रज्ञानानं उसवल्याची खंतही व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. जान आणि बाललोकर या घोंगड्यांना सर्वाधिक मागणी आहे, तर नवीपिढी या व्यवसायात यायला हवी अशी अपेक्षाही जाणकार व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

largest Wool Blanket Market
पट्टणकोडोलीतील घोंगडी (ETV Bharat Reporter)

20 प्रकारांची घोंगडी बाजारात उपलब्ध : महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू, गोवा राज्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या पट्टणकडोलीतील विठ्ठल बिरदेवाची यात्रा सुरू आहे. लाखो भाविक पट्टणकोडोलीत या यात्रेसाठी दाखल होतात. या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोंगड्यांचा बाजार इथं भरतो. मेंढ्यांच्या लोकरापासून बनणाऱ्या सुबक हस्तकलेचा उत्कृष्ट नमुना असलेली उबदार घोंगडी पट्टणकडोलीच्या बाजाराचं वैशिष्ट्य आहे. मोठ्या प्रमाणात सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि सीमाभागात असणाऱ्या धनगर बांधवांचं ऊन, वारा, पावसात संरक्षण करणाऱ्या आणि आरोग्यवर्धक असणाऱ्या या घोंगड्यांचा गेल्या एक शतकापासून बाजार पट्टणकोडोलीत भरतो. धनगरी, धावळी, कुदरगी, बल्लारी लोकापुरी यासह 15 ते 20 प्रकारची घोंगडी या बाजारात उपलब्ध असतात. पूर्वीप्रमाणे या व्यवसायानं ही कात टाकली असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत मशीनवर बनवलेली पानिपत घोंगड्यांनी पारंपारिक घोंगड्यांची जागा घेतली असल्याचं गेली 45 वर्ष घोंगडी विकण्यासाठी येणाऱ्या केशव सणगर या व्यापाऱ्यांनं सांगितलं.

largest Wool Blanket Market
हातावर घोंगडी विणताना व्यापारी (ETV Bharat Reporter)


धनगर बांधवांकडून कोल्हापूरसह सोलापूर, सांगली आणि कर्नाटकातील 'या 'गावात बनतात दर्जेदार घोंगडी.

  • कोल्हापूर - कागल, कापशी, मुरगुड, शेणगाव, पेटवडगाव मलकापूर मसुद माले.
  • सांगली जिल्हा - कोकरूड, देवराष्ट्रे
  • सोलापूर - बलवडी, चित्रदुर्ग
  • कर्नाटक - चित्रदुर्ग, संकेश्वर, अथणी, अक्कोळ
कोल्हापूर पट्टणकोडोली घोंगडी (ETV Bharat Reporter)


घोंगडीचे आरोग्यवर्धक फायदे : पाठदुखी, कंबरदुखी, वात, सांधेदुखीमध्ये यापासून आराम मिळतो. यामध्ये जेण (घोंगडीचाच एक जाड प्रकार) वापरणे जास्त योग्य ठरते. झोप येत नसणार्‍यांसाठी तर हे एक उत्तम औषध आहे. घोंगडीवर झोपल्यानं शांत झोप लागते. यासह उच्च रक्तदाब नियंत्रणात येण्यास मदत होते. तर कांजण्या, गोवर, तापातही घोंगडीचा वापर करतात. घोंगडीवर झोपल्याने लहान मुलांचा अस्थमा दूर होतो. हिवाळ्यात ऊब तर उन्हाळ्यात थंडावा मिळतो, घोंडीवर झोपल्यानं साप, विंचू, मुंगी, गोम, मधमाशा, ढेकूण जवळ येत नाहीत. अर्धांगवायूचा धोका टळतो आणि मधुमेह कमी होण्यास मदत होते, खासकरून जान आणि बाललोकर घोंगडी यामध्ये मोडतात. घोंगडीवर केलेली पूजा, ध्यान, साधना फलदायी ठरते. योगसाधना आणि अध्यात्मिक पारायण करण्यासाठी आणि डोहाळे कार्यक्रमातील देव पूजेसाठी घोंगडे वापरले जाते.

largest Wool Blanket Market
हातावर विणलेली घोंगडी (ETV Bharat Reporter)



नव्या पिढीनं घेतला सोशल मीडियाचा आधार : धनगर बांधवांकडून आलेल्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून घोंगडी बनवण्याची प्रक्रिया केली जाते. या व्यवसायातील सनगर बांधव घोंगडी विक्रीचा पारंपारिक व्यवसाय करतात. तर यातील नवी पिढी आता माहिती तंत्रज्ञानाचा आणि सोशल मीडियाचा वापर करून पारंपरिक व्यवसायाला ग्लोबल करण्यासाठी प्रयत्नशील आहे. कोल्हापुरातील पेठवडगावच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेल्या स्वप्निल आणि सागर सणगर यांनी वडिलोपार्जित व्यवसायाचं सोशल मीडियावर मार्केटिंग करण्यासाठी 'मामांची घोंगडी' नावानं पेज तयार केलं आहे.‌ मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या शहरातूनही घोंगड्यांना चांगली मागणी असल्याचं स्वप्निलनं सांगितलं. तसंच धनगर समाजातील तरुणांनी नोकरीच्या माग न लागता पारंपारिक व्यवसायासाठी आपल्या कल्पना राबवाव्यात, असं आवाहनही स्वप्निलनं केलं आहे.

पट्टणकडोली यात्रेचा अखेरचा दिवस कधी? : 60 टन भंडाऱ्याची उधळण, फरांडे बाबांची भाकणूक आणि भाविकांचं आकर्षण असलेल्या हेडाम नृत्यांनी गजबजलेल्या पट्टण कडोलीतील विठ्ठल-बिरदेव यात्रेची सांगता उद्या होणार आहे. यात्रा कमिटी आणि ग्रामपंचायत पट्टणकडोली यांच्याकडून लाखो भाविकांना चांगल्या सुविधा यात्रेदरम्यान देण्यात आल्या. बारा बलतदारांचा समावेश असलेली वैशिष्ट्यपूर्ण यात्रेची गुरूवारी (16 ऑक्टोबर) रोजी सांगता होणार आहे, मात्र घोंगड्यांचा बाजार दिवाळीपर्यंत सुरू राहणार आहे.

हेही वाचा -