ETV Bharat / state

पुणे : मुंढव्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी मोठी अपडेट, तिघांवर गुन्हा दाखल

मुंढव्यातील 40 एकर जमीन गैरव्यवहार प्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यानुसार तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Land Scam in Mundhwa Pune
मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : November 7, 2025 at 9:27 AM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

पुणे : शहरातील मुंढवा भागातील 40 एकर जमीनीच्या गैरव्यवहार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या व्यवहारात 6 कोटींचे मुद्रांक शुल्क न भरता शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी सह जिल्हा निबंधक संतोष हिंगाणे यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शीतल तेजवानी, अमेडिया कंपनीतील पार्थ पवार यांचे भागीदार दिग्विजय पाटील आणि सह दुय्यम निबंधक रवींद्र तारु या तिंघावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या जमीन व्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावरही आरोप करण्यात येत आहेत. मात्र, त्यांच्याविरुद्ध तक्रार देण्यात आलेली नाही.

संतोष हिंगाणे यांनी दिलेल्या फिर्यादिनुसार, या व्यवहारत जमीनचं खरेदी-विक्री दस्त करण्यासाठी सक्षम अधिकाऱ्याच्या परवानग्या घेणं आवश्यक होतं. तसेच, 5 कोटी 89 लाख 31 हजार रुपये मुद्रांक शुल्क भरणं आवश्यक असताना आरोपींनी मुद्रांक शुल्क भरलं नसल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे.

दोन अधिकारी निलंबित : दरम्यान, या जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणी गुरुवारी पुण्यातील दोन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांना निलंबित करण्यात आलं. मात्र, त्याचं प्रकरण वेगळं असल्याचं कळतंय. रवींद्र तारु यांच्यावर देखील निलंबनाची कारवाई करण्यात आली.

अजित पवार काय म्हणाले? : या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, "अजित पवार यांनी हे संपूर्ण प्रकरण मला माहीत नसून थेट अजित पवार म्हणून माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं गुरुवारी पत्रकारांशी बोलताना म्हटलं. मला गेली 35 वर्ष महाराष्ट्राची जनता ओळखते, मी नियमात न बसणाऱ्या कामांना कधीही पाठिंबा देत नाही," असा दावा अजित पवार यांनी यावेळी केला.

'चुकीच्या कामांना प्रोत्साहन देत नाही' : "मी नियमाच्या आणि कायद्याच्या चौकटीत काम करणारा कार्यकर्ता असून मुख्यमंत्र्यांनी याची संपूर्ण चौकशी करावी अशी मी त्यांना विनंती करतो. याप्रकरणाची चौकशी करून यातील सत्यता पडताळून पाहावी अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांना भेटून करणार आहे.

स्टॅम्प ड्यूटी, त्या जमिनीबाबत कागदपत्रे यांची मी शहानिशा करतो. कारण मीच अर्थमंत्री म्हणून काम करत असताना टॅक्सच्या बाबतीत सर्वांनी नियमाप्रमाणं वागलं पाहिजे हीच माझी अपेक्षा असणार ना? असा प्रश्न त्यांनीच उपस्थित केला. कोणीही नियमाच्या बाहेर जाऊन काम करता कामा नये. पण अजूनही मलाच या प्रकरणाची संपूर्ण माहिती नाही. पण मी आज या प्रकरणावर बोललो नसतो तर कुठे तरी पाणी मुरतंय असाच सगळ्यांचा भ्रम झाला असता म्हणून मी समोर येऊन बोलत आहे", असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

कोणत्याही अधिकाऱ्याला मी फोन केला नाही : "आज प्रत्येकाच्याच घरातील मुलं मोठी झाली की आपापला व्यवसाय करतात. पण मी त्या प्रकरणाबाबत कोणत्याही अधिकाऱ्याला फोन करून याबाबत मदत करा असं सांगितलं नाही. कारण मी कायद्यानं चालणार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालणार माणूस आहे. त्यामुळं या प्रकरणाची सर्व माहिती घेऊन मी वस्तुस्थिती जनतेसमोर मांडणार आहे", असं अजित पवार यांनी सांगितलं.

हेही वाचा

माझा 'या' प्रकरणाशी दुरान्वयानेही संबंध नाही; पार्थच्या जमीन खरेदी प्रकरणावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

'मुलाच्या नावानं जमीन हडपणाऱ्या अजित पवार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा'