'वतन'च्या जमिनीचा हजारो कोटींचा कथित घोटाळा? पार्थ पवार यांच्या कंपनीवर गंभीर आरोप; आमची जागा परत द्या, मूळ मालकांची मागणी
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या कंपनीवर पुण्यातील १८०४ कोटींची जमीन फक्त ३०० कोटींना विकत घेतल्याचा आरोप करण्यात आलाय.

Published : November 6, 2025 at 6:31 PM IST
|Updated : November 6, 2025 at 6:41 PM IST
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) डायरेक्टर असलेल्या अमीडीया होल्डिंग्स एलएलपी या कंपनीकडून पुण्यातील मुंढवा येथे असलेल्या 'वतन'ची जमिनीचा बाजारभाव तब्बल १८०४ कोटी रुपये असताना, ही जमीन केवळ ३०० कोटी रुपयात विकत घेतल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. याप्रकरणी मूळ मालक समोर आले असून आम्हाला आमची जागा परत देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केलीय.
केवळ ३०० कोटी रुपयांना खरेदी केली जमीन : पुण्यातील मुंढवा येथे असलेल्या एका 40 एकर जमिनीचे बाजारमूल्य हे सुमारे १८०० कोटी रुपये असून ही जमीन 'अमिडिया' कंपनीने केवळ ३०० कोटी रुपयांना खरेदी केल्याचा आरोप होत आहे. या जमिनीचे जवळपास ३०० मालक असून ती आमची जमीन आम्हाला मिळावी अशी मागणी कपिल गायकवाड यांनी केली.
जमिनीसाठी तीन पिढ्यांपासून लढा सुरू : यावर या जमिनीचे मालक कपिल गायकवाड म्हणाले, "ही जमीन इनाम वर्ग 6 आणि वतनाची जमीन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आगोदर पासूनची कागदपत्रे आमच्याकडे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, ब्रिटिश तसंच सर्वांच्या काळापासून ही जमीन आमच्या नावावर आहे. १९५५ ते १९६० साली सरकारकडं ही जागा गेली आणि त्यांनी २ एकरमध्ये प्रोजेक्ट केला. बाकीची जागा अशीच असून यासाठी आमची लढाई सुरू आहे. आता ही जागा बेकायदेशीररित्या विकली गेली असून आमची फसवणूक झाली आहे. आम्ही मूळ मालक असून तीन पिढ्यांपासून या जमिनीसाठी आम्ही लढा देत आहोत. आमची जागा आम्हाला देण्यात यावी."
अजित पवार यांच्या राजीनामाची मागणी : याप्रकरणी विरोधकांकडून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. त्यांच्या राजीनामाची मागणी देखील केली जात आहे. या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी देखील प्रतिक्रिया देत जोरदार टीका केली आहे. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून, चौकशीचे आदेश दिल्याचं नागपुरात आज पत्रकारांना सांगितलंय.
हेही वाचा -
- पवई 30 हजार कोटींचं कथित टीडीएस घोटाळा प्रकरण : एसीबीचा क्लोजर रिपोर्ट न्यायालयानं स्वीकारला, हिरानंदानींना दिलासा
- शेतमालाचे पैसे थकले तर शेती कशी टिकणार?, 3 कोटींचा घोटाळा करणाऱ्याला अटकपूर्व जामीन देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
- 100 Crore Scam In UP : निवृत्त अभियंत्यांकडून 100 कोटींचा घोटाळा, स्वेच्छानिवृत्तीनंतरही घेतले पगारांसह भत्ते

