दिल्ली दरबारी घुमणार कोल्हापूरच्या लेकींचा आवाज; राष्ट्रीय युवा स्पर्धेत कोल्हापूरच्या अंबाबाईचा गोंधळ
कोल्हापूरच्या उषाराजे हायस्कूलच्या मुलींचा (Usha Raje High School) शाहिरी समूह दिल्लीतील राष्ट्रीय युवा महोत्सवासात, अंबाबाईचा गोंधळ सादर करून महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार आहेत.

Published : January 5, 2026 at 9:37 PM IST
कोल्हापूर : राजधानी दिल्लीत 10 जानेवारीपासून होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवात कोल्हापूरच्या लेकी अस्सल मराठमोळ्या वेशभूषेत लोककला सादर करणार आहेत. केंद्रीय युवक संचलनालयाकडून दरवर्षी राष्ट्रीय युवा स्पर्धा घेतल्या जातात. या स्पर्धेत देशातील तरुणाईला वेगवेगळ्या लोककला सादर करण्याची संधी मिळते. यंदा महाराष्ट्रातून कोल्हापूरच्या उषाराजे हायस्कूलच्या संघाला महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. गेली पाच वर्ष शाहिरी आणि संगीताचं प्रशिक्षण घेणारी युवती शाहीर श्रद्धा जाधव हिच्या नेतृत्वात दिल्ली दरबारी कोल्हापूरच्या लेकी विजयाचा झेंडा फडकवतील असा विश्वास श्रद्धा जाधवने व्यक्त केला.
राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली निवड : राज्याच्या क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय पुणेतर्फे निगडी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे राज्यस्तरीय युवा महोत्सव झाला. 16 ते 29 वयोगटात लोकगीत स्पर्धा प्रकारात उषाराजे हायस्कूलने विभागाचे प्रतिनिधित्व केले होते. मुंबई, नाशिक, लातूर, अमरावती, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि कोल्हापूर विभागातून लोकगीत स्पर्धेत प्रथम आलेले आठ संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सहभागी झाले. आठ संघामधील उषाराजे हायस्कूलच्या संघाने राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवून 10 ते 12 जानेवारी या कालावधीत दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. कोल्हापूरच्या या संघाने सादर केलेला अंबाबाईचा गोंधळ परीक्षक आणि प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली, आता ताराराणींच्या लेकींच्या शाहिरीचा आवाज दिल्ली दरबारी घुमणार आहे, यासाठी गेली वर्षभर रंगीत तालमी सुरू आहे. आमच्या संगीत आणि लोककलेमुळं आम्हाला महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली, आता विजेतेपद खेचून आणणारच असा निर्धार युती शाहीर श्रद्धा जाधव हिने बोलून दाखवला.

'हे' आहेत दिल्लीला जाणारे शाहिर : शाहीर श्रद्धा जाधवने डॉ. नायकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली आई अंबाबाईंचा गोंधळ लोकगीत स्पर्धेत सादर केला. जान्हवी कांबळे, पायल खोचीकर, लावण्या चव्हाण, कल्याणी चव्हाण, अनुष्का शिंदे, रुद्राक्षी हिरेमठ (सर्व दहावी) यांनी सहगायनाची उत्तम साथ दिली. गोंधळ गीताचे वादक रामदास देसाई (ढोलकी), श्रेयश जाधव, (संबळ), ओम तारे (हार्मोनियम) यांनी साथ दिली. राष्ट्रीय स्पर्धेसाठी हायस्कूलचा संघ सहा तारखेला दिल्लीसाठी रवाना होणार आहे. डॉ. पाटील यांच्याहस्ते शुभेच्छा दिल्या. सचिव प्राजक्त पाटील यांचे प्रोत्साहन लाभले. मुख्याध्यापिका एस. डी. चौधरी, उपमुख्याध्यापिका व्ही. डी. जमेनीस, पर्यवेक्षक एस. एल. पुजारी. तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचं मार्गदर्शन मिळालं.

शाहिरी समूहाला लोकभवन भेटीचं आमंत्रण : महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या उशा राजे हायस्कूलच्या समूहाला दिल्लीत राष्ट्रीय युवा महोत्सवात आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. यासाठी 8 जानेवारीला उषा राजे हायस्कूलचा संघ रवाना होणार आहे. तत्पूर्वी मुंबईत महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांनी या संघाला लोक भवन येथे भेटीचं आमंत्रण दिलं आहे. यामुळं समूहातील लोककलाकार युवा शाहीर आणि वादक भारावले असल्याची प्रतिक्रिया अनुष्का शिंदेनी व्यक्त केली.
हेही वाचा -
- वर्षाच्या पहिल्या दिवशी देवस्थानं फुल्ल, शिर्डी, कोल्हापूर, पंढरपूर, पुणेसह मुंबईतील मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी
- तोफेच्या सलामीनं करवीर निवासिनी अंबाबाईच्या नवरात्रोत्सवाला प्रारंभ, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी यंदा पहिल्यांदाच 'एआय'चा वापर
- सूर्यकिरणांनी उजळला करवीर निवासिनीचा गाभारा; मावळतीच्या किरणांनी देवीला घातला सुवर्णाभिषेक

