ETV Bharat / state

'फलाट क्रमांक... म्हणताच थांबले नेटकरी; आवाजात जादू, शैलीत कमाल, कोल्हापूरच्या सर्वेशच्या मिमिक्रीने जिंकली नेटकऱ्यांची मनं

कोल्हापूरचा सर्वेश पाटील (Sarvesh Patil) हा सध्या त्याच्या अफलातून एसटी आणि रेल्वे अनाऊन्समेंटच्या नक्कलेमुळं सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Sarvesh Patil
एसटी अनाऊन्समेंट करताना सर्वेश पाटील (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 11, 2026 at 8:55 PM IST

|

Updated : May 11, 2026 at 11:01 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

ठाणे : एसटी स्थानक किंवा रेल्वे स्टेशनवर प्रवास करताना कानावर पडणाऱ्या घोषणा प्रत्येक प्रवाशासाठी महत्त्वाच्या असतात. “फलाणा ठिकाणी जाणारी गाडी फलाट क्रमांक...” असा आवाज ऐकताच प्रवाशांची धावपळ सुरू होते. या घोषणा संगणकाच्या मदतीनं तयार केल्या जात असल्या, तरी त्या आवाजामागची खास शैली अनेकांच्या लक्षात राहते. आता मात्र एका विद्यार्थ्यानं आपल्या भन्नाट आवाजाच्या जोरावर सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. कारण हा विद्यार्थी अगदी हुबेहुब एसटी स्थानक आणि रेल्वे स्टेशनवरील अनाऊन्समेंट करून दाखवतो.

प्रवाशांना सूचना देण्याची शैली : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वेश पाटील हा नववीत शिकणारा विद्यार्थी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. लहान वयातच आवाजावर असलेले जबरदस्त नियंत्रण, स्पष्ट उच्चार आणि स्टेशनवरील घोषणांची अचूक शैलीमुळं त्याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे सर्वेश केवळ आवाजाची नक्कल करत नाही, तर घोषणांमधील टोन, थांबे, शब्दफेक आणि प्रवाशांना सूचना देण्याची शैलीही हुबेहुब सादर करतो. त्यामुळं अनेकांना हा आवाज खरोखरच स्टेशनवरील अधिकृत अनाऊन्समेंट असल्याचा भास होतो.

सर्वेश पाटील (Sarvesh Patil) हा सध्या त्याच्या अफलातून एसटी आणि रेल्वे अनाऊन्समेंटच्या नक्कलेमुळं सोशल मीडियावर चर्चेत (ETV Bharat Reporter)


लहान वयात एवढी परफेक्ट मिमिक्री कशी शक्य? : मोबाईल आणि सोशल मीडियाच्या युगात अनेक तरुण विविध कला सादर करताना दिसतात. मात्र, सर्वेशने निवडलेली कला वेगळी आणि हटके असल्यानं नेटकऱ्यांकडून त्याचं विशेष कौतुक होत आहे. “इतक्या लहान वयात एवढी परफेक्ट मिमिक्री कशी शक्य आहे?” असा प्रश्न अनेकांना पडला आहे. काहींनी तर भविष्यात सर्वेशला रेडिओ, डबिंग किंवा अधिकृत अनाऊन्सर म्हणून मोठी संधी मिळू शकते, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

कोल्हापूरच्या कला विश्वातही सर्वेशची चर्चा सुरू : सर्वेशला लहानपणापासूनच विविध आवाजांची नक्कल करण्याची आवड होती. रेल्वे स्टेशन आणि एसटी स्थानकावरील घोषणा तो बारकाईने ऐकत असे. त्या घोषणांमधील चढ-उतार, आवाजातील गंभीरपणा आणि शब्दोच्चार यांचा तो सतत अभ्यास करत होता. त्यातूनच त्याने ही कला आत्मसात केली. आज त्याचे हे कौशल्य हजारो लोकांचे मनोरंजन करत आहे. सर्वेशच्या या अनोख्या टॅलेंटमुळं कोल्हापूरच्या कला विश्वातही त्याची चर्चा सुरू झाली आहे. अनेक जण त्याला पुढे व्यावसायिक प्रशिक्षण घेण्याचा सल्ला देत आहेत. योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास हा छोटा कलाकार भविष्यात मोठं नाव कमावू शकतो, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

“मला लहानपणापासून स्टेशनवरील अनाऊन्समेंट ऐकायला खूप आवडायचं. मी सतत त्या घोषणा ऐकून त्याची प्रॅक्टिस करत गेलो. लोकांना माझे व्हिडिओ आवडत आहेत, याचा खूप आनंद होतो. पुढे अजून चांगलं काम करायचं आहे.” - सर्वेश पाटील, विद्यार्थी



लहान पणापासून निरीक्षण महत्वाचे : कोणतेही कलागुण आत्मसात करण्यासाठी निरीक्षण आणि सातत्यपूर्ण सराव अत्यंत महत्त्वाचा असतो. सर्वेशच्या बाबतीतही त्यानं केलेलं बारकाईने निरीक्षण आणि मेहनत वाखाणण्याजोगी आहे. त्यामुळंच अनेकांना अवघड वाटणारी कला त्यानं सहज आत्मसात केली आहे.

हेही वाचा -

  1. उन्हाळी सुट्टीत मामाच्या गावाला जाणं पडणार महागात; तिकीटाच्या दरात मोठी वाढ
  2. लालपरीचा होणार कायापालट; 2035 पर्यंत एसटी ताफा पूर्णपणे इलेक्ट्रिक करण्याचा सरकारचा निर्धार!
  3. एसटी बस स्थानकं झाली डिजिटल! बसचा अचूक वेळ, स्थान, वेग आणि मार्ग फलाटावर दिसणार
Last Updated : May 11, 2026 at 11:01 PM IST