ETV Bharat / state

शाहू मिल पुनरुज्जीवित करण्याचा कोल्हापूरकरांचा निर्धार; खासदार शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक

सर्वपक्षीय शाहू मिल पुनरुज्जीवन समितीनं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या कार्यालयात खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत मिल सुरू करण्याची मागणी केली.

खासदार शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक
खासदार शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : March 2, 2026 at 4:49 PM IST

|

Updated : March 2, 2026 at 5:47 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

कोल्हापूर - राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रेरणेनं स्थापन झालेली ऐतिहासिक शाहू मिल पुन्हा सुरू व्हावी, या मागणीसाठी सर्वपक्षीय शाहू मिल पुनरुज्जीवन समिती, समस्त मातंग समाज आणि शाहू मिल कामगार संघटनेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या कार्यालयात खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही मागणी जोरदारपणे मांडण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्री आणि वस्त्रोद्योग विभागाकडे तत्काळ पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं आहे. या बैठकीनं शाहू मिलच्या पुनरुज्जीवनाच्या लढ्याला नवी प्रेरणा मिळाली आहे.

रविवारी सर्वपक्षीय शाहू मिल पुनरुज्जीवन समितीनं खासदार शाहू महाराजांची भेट घेऊन त्यांना या लढ्याचं नेतृत्व करण्याची विनंती केली होती. प्रजासत्ताक सेवा संस्थेचे दिलीप देसाई यांनी यावेळी शाहू मिलच्या 27 एकर जागेवर लँड माफियांचा डोळा असल्याचा आरोप करत कोल्हापुरातील बहुतांश हेरिटेज जमिनी हडप करण्याचा डाव असल्याचं या भेटीवेळी सांगितलं होतं. संभाजी जगदाळे यांनी संपूर्ण 27 एकर जागा मिलसाठीच वापरावी, अशी सूचना केली होती. खासदार शाहू महाराजांनी या शिष्टमंडळाला जिल्हाधिकारी यांच्याशी बैठक घेऊन पुढील दिशा ठरविण्याचं आश्वासन दिलं होतं, ज्याप्रमाणे सोमवारी बैठक पार पडली.

शाहू मिल पुनरुज्जीवित करण्याचा कोल्हापूरकरांचा निर्धार (ETV Bharat)



शाहू मिलची ऐतिहासिक पार्श्वभूमी - जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत शाहू मिल पुन्हा सुरू करण्यासाठी अनेक मुद्दे उपस्थित झाले. विजय देवणे यांनी 27 एकर जागा आहे, बांधकाम तयार आहे, असं सांगत वस्त्रोद्योग मंत्रालयाकडे मागणी करण्याची विनंती केली. ऍडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी सांगितलं, की 1967 मध्ये शाहू मिल वस्त्रोद्योग विभागाकडे हस्तांतरित झाली आणि 2003 मध्ये बंद पडली. यातील 27 पैकी 17 एकर हेरिटेजमध्ये येते, त्यामुळे शाहूंचा विचार हेरिटेजमध्ये घेऊन मिल सुरू करावी, अशी मागणी केली. दिलीप देसाई यांनी प्रॉपर्टी कार्डवर कोणत्याही संस्थेचा बोजा नसल्याचं नमूद केलं. अशोक भंडारी यांनी मागील 40 वर्षांपासूनचा पाठपुरावा सांगत, बहुजनांच्या हाताला काम मिळावं, म्हणून ही मिल उभी राहिली होती, असं सांगितलं आणि मिल सुरू झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांची हत्तीवरून मिरवणूक काढू, असं आश्वासन दिलं. शिवाजी कवाळे यांनी शाहू मिल सुरू होणं म्हणजे इतिहासाचं नवं पान उलगडणं आणि शाहू महाराजांचं जिवंत स्मारक व्हावं, अशी मागणी केली.


जिल्हाधिकाऱ्यांचं आश्वासन आणि पुढील दिशा - जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करत सध्या या जागेवर न्यायालयात केसेस सुरू असल्याचं सांगितलं. ही वस्त्रोद्योग विभागाची जागा असल्यानं पालकमंत्री यांच्यासोबत लवकरच बैठक घेऊन विभागाकडे पाठपुरावा करू, असं ठाम आश्वासन दिलं. खासदार शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीनं आंदोलनाला अधिकृत आधार मिळाला आहे. शाहू मिलचा कामासाठीचा भोंगा पुन्हा ऐकू येणार असं समर्थकांचा ठाम विश्वास आहे, कारण कोल्हापुरात कापड व्यवसायातील नामवंत कंपन्या उपलब्ध आहेत.



शाहू मिलचं ऐतिहासिक महत्त्व आणि सध्याची गरज - राजर्षी शाहू महाराजांनी स्वातंत्र्यपूर्व काळात कोल्हापुरात स्थापन केलेली ही मिल बहुजन समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी प्रेरणास्थान ठरली होती. गेल्या काही वर्षांत स्मारकाच्या नावाखाली जागेवर अतिक्रमणे होण्याच्या चर्चा सुरू असल्या तरी पुनरुज्जीवन समितीनं मिल सुरू करण्यावरच भर दिला आहे. या आंदोलनाला खासदार शाहू महाराजांचा पाठिंबा मिळाल्यानं स्थानिक तरुणांना रोजगार आणि कोल्हापुराच्या औद्योगिक इतिहासाला नवसंजीवनी मिळेल, असं अपेक्षित आहे.

हेही वाचा...

  1. राजर्षी छत्रपती शाहू महाराज जन्मभूमीवर ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय; कोल्हापूर ठरणार इतिहास पर्यटनाचं राष्ट्रीय केंद्र
  2. Shahu mill: शाहू मिल पुन्हा सुरू! गणेशोत्सवात प्रत्येकाने पाहावा असा देखावा; पाहा व्हिडिओ
Last Updated : March 2, 2026 at 5:47 PM IST