कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कायम; पंचगंगा नदीची पाणीपातळी वाढली, 55 बंधारे पाण्याखाली
कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळं (kolhapur Rain) पूरस्थिती निर्माण झाली असून पंचगंगा नदी पात्राबाहेर पडली आहे, तसंच जिल्ह्यातील तब्बल 55 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

Published : July 6, 2026 at 5:31 PM IST
कोल्हापूर -जिल्ह्यात आजही मुसळधार पाऊस सुरू असून जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कोल्हापूरची जीवनदायनी असलेल्या पंचगंगा नदीची राजाराम बंधारा पाणीपातळी 33 फुटावर पोहोचली आहे. जिल्ह्यातील प्रमुख धरण असलेल्या राधानगरी धरणाचा पाणीसाठा 45 टक्क्यांवर पोहोचला असून सध्या 55 बंधारे पाण्याखाली आहेत, तर तीन राज्य मार्ग रस्त्यावर नदीचं पाणी आल्यामुळं बंद झाले आहेत.
जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडं आलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील बारा तालुक्याला पावसाचा फटका बसला आहे. गेल्या चार दिवसात झालेल्या पावसाने जिल्ह्यात 13 लाख 80 हजार रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आली आहे. आज जिल्ह्याला भारतीय हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, यामुळं सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
गगनबावडा तालुक्यातील पाऊसाची नोंद : जिल्ह्यात 52.34 मिमी तर गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पाऊसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात मागील 24 तासात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 101.3 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे, तर 24 तासात पडलेला एकूण पावसापैकी हातकणंगले 16 मिमी, शिरोळ 12.4 मिमी, पन्हाळा 59.6 मिमी, शाहुवाडी 87 मिमी, राधानगरी 65.7 मिमी, गगनबावडा 101.3 मिमी, करवीर 54.8 मिमी, कागल 43.3 मिमी, गडहिंग्लज 36.6 मिमी, भुदरगड 38.4 मिमी, आजरा 51.3 मिमी, चंदगड 61.7 मिमी, असा एकूण 52.34 मिमी पाऊस पडल्याची नोंद जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षात करण्यात आली आहे.
जिल्हापरिषदेच्या शाळेत पुराचं पाणी : पन्हाळा तालुक्यातील विद्या मंदिर म्हाळुंगे शाळेच्या शेजारील ओढ्याला आलेलं पुराचं पाणी आज थेट शाळेत शिरलं. काल रविवार असल्यानं शाळेला सुट्टी होती, मात्र आज शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थी शाळेत आले आहेत. मात्र विद्यार्थ्यांना वर्गखोल्यांमध्ये चिखलाचं साम्राज्य पाहायला मिळालं. शाळेच्या दोन वर्गखोल्यांमध्ये पाणी शिरल्यानं मुलांना दुसऱ्या वर्गखोल्यांमध्ये बसवण्यात आलं आहे.

जिल्ह्यातील 5 लघु पाटबंधारे प्रकल्प 100 टक्के भरले : कोल्हापूर जिल्ह्याचा घाटमाथा आणि धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं जिल्ह्यातील तीन लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून यात चंदगड तालुक्यातील घटप्रभा, गगनबावडा तालुक्यातील कोदे, वेसरफ, शाहूवाडी तालुक्यातील कासार्डे, कांडवन प्रकल्पांचा समावेश आहे. या लघुपाटबंधारे प्रकल्पांमधून नद्यांमध्ये विसर्ग सुरू केला असून नद्यांच्या काठांवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
NDRF च्या पथकाकडून प्रयाग चिखली संगमावर पाहणी : जिल्ह्यातील संभाव्य पुरस्थिती ओळखून एनडीआरएफच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. या पथकानं आज पंचगंगा नदीचं उगमस्थान असलेल्या प्रयाग चिखली संगमावर जाऊन पूरस्थितीची पाहणी करून आढावा घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांची संयुक्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संपकाळ यांनी दिली.
हेही वाचा -
- कोल्हापूरवर पुराचे संकट? 2026 मध्ये पहिल्यांदाच पंचगंगा नदी पात्राबाहेर; 39 बंधारे पाण्याखाली तर 7 रस्ते बंद
- कोल्हापुरात मुसळधार पावसाची धुंवाधार फलंदाजी, 20 बंधारे पाण्याखाली; पंचगंगा नदी 24 फुटांवर, पुढील 72 तास धोक्याचे
- कोल्हापूरात पूरस्थिती नियंत्रणात, नागरिकांनी घाबरू नये; पूर परिस्थितीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आवाहन

