ETV Bharat / state

कृष्णा नदीच्या वाढत्या पाण्यामुळे नृसिंहवाडीत पहिला दक्षिण द्वार सोहळा संपन्न; दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

श्रीक्षेत्र नृसिंहवाडीत कृष्णा नदीच्या वाढलेल्या पाणीपातळीमुळे चालू मोसमातील पहिला दक्षिण द्वार सोहळा मंगळवारी पहाटेच्या सुमारास भक्तिमय वातावरणात पार पडला. त्यानंतर दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली.

Nrusinhwadi Dakshindwar Sohala
नृसिंहवाडीत पहिला दक्षिण द्वार सोहळा (Source- ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : July 7, 2026 at 11:51 AM IST

|

Updated : July 7, 2026 at 2:28 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

कोल्हापूर-कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांत झालेल्या दमदार पावसामुळे नदीची पातळी वाढली आहे. नृसिंहवाडीतील दत्त मंदिर परिसरात पूरस्थितीचे स्वरूप निर्माण झालं आहे. कृष्णा नदीच्या पाणीपातळीत झालेल्या झपाट्याने वाढीमुळे हा धार्मिक योग साधला गेला.

नदीनं यंदा पुन्हा पात्र सोडलं- गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर, सांगली आणि सातारा परिसरात पडत असलेल्या जोरदार पावसामुळे जिल्यातील सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. त्यातच कृष्णा नदीच्या पाणीपातळीतही वाढ होऊन नदीनं यंदा पुन्हा पात्र सोडलं आहे. सोमवारी संध्याकाळपासूनच नदीचे पाणी मंदिर परिसरात वाढू लागले होते. रात्रीभर पाण्याची पातळी लक्षणीयरीत्या वाढल्यानंतर दत्तभक्तांमध्ये दक्षिणद्वार सोहळ्याची आतुरता लागली होती. अखेर मंगळवारी पहाटेच्या सुमारास दक्षिण द्वार सोहळा संपन्न झाला. त्यानंतर पवित्र स्नानासाठी भाविकांची अक्षरशः झुंबड उडाली. वाढलेल्या पाणीपातळीमुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केलं आहे. योग्य ती सुरक्षिततेची काळजी घेण्यात आलेली आहे, अशी माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

नृसिंहवाडीत पहिला दक्षिण द्वार सोहळा संपन्न (Source- ETV Bharat Reporter)

पहाटेपासूनच मंदिर परिसरात दर्शनरांगा- दक्षिण द्वार सोहळ्याची माहिती पसरताच नृसिंहवाडीकडे सांगली, कोल्हापूर, शिरोळ, इचलकरंजी आणि आसपासच्या भागांतून भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले. विशेषतः महिलांची स्नानासाठी मोठी उपस्थिती दिसून आली. पहाटेपासूनच मंदिर परिसरात दर्शनरांगा लागल्या आहेत. ‘श्री गुरुदेव दत्त’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

Nrusinhwadi Dakshindwar Sohala
नृसिंहवाडीत पहिला दक्षिण द्वार सोहळा (Source- ETV Bharat Reporter)

मंदिर प्रशासनाकडून खबरदारी-भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देवस्थानतर्फे अतिरिक्त सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. श्रींची उत्सवमूर्ती दर्शनासाठी प.पू. श्री नारायण स्वामी मंदिरात ठेवण्यात आली आहे. फुलांच्या आकर्षक सजावटीमुळे मंदिर परिसर अधिक उठून दिसत आहे. वाढणारे नदीचे पाणी, भाविकांचे दर्शन आणि सुरक्षा या तिन्ही पातळ्यांवर मंदिर प्रशासनानं खबरदारी घेतल्याचंही समोर आलं आहे.



काय आहे दक्षिणद्वार सोहळ्याचे महत्त्व- "दत्त संप्रदायात दक्षिण द्वार सोहळ्याला विशेष धार्मिक महत्त्व आहे. कृष्णा नदीचे पाणी उत्तरेकडून येऊन श्रींच्या चरणकमलांवरून दक्षिण द्वारातून प्रवाहित होते. हा क्षण पवित्र मानला जातो. अशावेळी दक्षिणेद्वारातून बाहेर पडणाऱ्या पाण्यात स्नान करून दर्शन घेणे पुण्यदायी समजले जाते. यंदाचा पहिलाच दक्षिण द्वार सोहळा मंगळवारी पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी संपन्न झाला. त्यामुळे नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. मात्र. गर्दीच्या अनुषंगानं कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मंदिर प्रशासनाने योग्य ती सर्व खबरदारी घेतली आहे," अशी माहिती श्री दत्तदेव संस्थानचे अध्यक्ष प्रा. गुंडो पुजारी यांनी दिली आहे.

  • धार्मिक योग साधण्यासाठी हजारो भक्त नृसिंहवाडीत दाखल झाले आहेत. त्यामुळे नृसिंहवाडी परिसरात सकाळपासूनच यात्रेसारखे वातावरण निर्माण झालं आहे. श्रद्धा, उत्साह आणि भक्तिभाव यांचा संगम अनुभवायला मिळत आहे.

हेही वाचा-

Last Updated : July 7, 2026 at 2:28 PM IST