कोल्हापूर जिल्ह्यात दमदार पाऊस, गडहिंग्लज-चंदगड दरम्यानचा पर्यायी पूल खचला; करूळ घाटात दरड कोसळली
कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळं 5 बंधारे पाण्याखाली गेले असून पंचगंगेची पातळी 15 फुटांवर पोहोचली आहे. गडहिंग्लज-चंदगड मार्गावरील पर्यायी पूल खचल्यानं वाहतूक अन्य मार्गानं वळवली आहे.

Published : July 3, 2026 at 2:39 PM IST
|Updated : July 3, 2026 at 3:46 PM IST
कोल्हापूर : मागील अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं जिल्ह्यात दमदार हजेरी लावली आहे. मागील दोन दिवसापासून धरण क्षेत्रासह जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळं कोल्हापूर जिल्ह्यातील चार बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी 15 फुटांवर पोहोचली असून पंचगंगा नदीवरील शिंगणापूर बंधारा पाण्याखाली गेला आहे. गडहिंग्लज तालुक्यातही कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळं हिरण्यकेशी नदीवरील गडहिंग्लज-चंदगड मार्गावर असणारा पर्यायी पूल खचला आहे. यामुळं या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गानं वळवली आहे.
जिल्ह्यातील पाच बंधारे पाण्याखाली : कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर बसणाऱ्या संततधार पावसामुळं कोरड्या पडलेल्या नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळं जिल्ह्यातील पंचगंगा, दूधगंगा, हिरण्यकेशी, कासारी आणि भोगावती नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. पंचगंगा नदीवरील शिंगणापूर बंधारा पाण्याखाली गेला असून जिल्ह्यातील एकूण 5 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. शिंगणापूर बंधाऱ्यावरून शुक्रवारी (दि.3) सकाळपासून धोकादायक वाहतूक सुरू होती. मात्र करवीर पोलिसांनी या ठिकाणी बॅरिकेट्स लावून धोकादायक वाहतूक बंद केली आहे. भारतीय हवामान विभागानं शुक्रवारी कोल्हापूर जिल्ह्याला आॉरेंज अलर्ट दिल्यामुळं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष सज्ज ठेवण्यात आला आहे.
गडहिंग्लज-चंदगड मार्गावर असणारा पर्यायी पूल खचला : "जिल्ह्यात संततधार पावसाची रिपरिप कायम असून गडहिंग्लज तालुक्यातील हिरण्यकेशी नदीच्या पाणी पातळीतही वाढ होत आहे. गडहिंग्लज-चंदगड दरम्यान नवीन पुलाचं काम सुरू आहे. यामुळं पर्यायी पुलाची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र हिरण्यकेशी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळं हा पूल खचला आहे. यामुळं या मार्गावरील वाहतूक आजरा-गजरगाव मार्गे वळवण्यात आली आहे," अशी माहिती जिल्हाआपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी दिली.

कोल्हापुरातल्या करूळ घाटात दरड कोसळली : कोल्हापुरातून गगनबावडा मार्गे कोकणात जाणाऱ्या करूळ घाटात घाटमाथ्यावर होणाऱ्या मुसळधार पावसानं दरड कोसळली. यामुळं कोल्हापुरातून तळ कोकणात जाणारा करुळ घाट चारचाकी वाहनांसाठी बंद केला असून वाहतूक पर्यायी मार्गानं वळवली आहे. ही दरड हटवण्याचं काम सुरू असून हा मार्ग पुढील काही तास अवजड वाहनांसाठी बंद केला आहे.
हेही वाचा :

