ETV Bharat / state

कोल्हापूर हादरलं! 15 तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढत अत्याचार; आक्षेपार्ह व्हिडिओ अन् ब्लॅकमेलिंग, गावकऱ्यांचा तीव्र संताप

तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवल्याचा धक्कादायक प्रकार हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली परिसरात घडला. या घटनेमुळं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Kolhapur Crime News
अटक केलेला संशयित आरोपी शाहिद समीर सनदे (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : April 28, 2026 at 7:08 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

कोल्हापूर : नाशिक आणि अमरावतीचे प्रकरण ताजे असतानाच कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली परिसरात तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेल केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. शाहिद समीर सनदे या 22 वर्षीय संशयित तरुणाला पोलिसांनी अटक केलीय. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी दिली.

गावकऱ्यांनी गाव बंद ठेवून काढली रॅली : या घटनेमुळं जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त होत असून, आणखी काही तरुणींची फसवणूक झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या सगळ्या प्रकरणावर जोरदार निषेध व्यक्त करत गावकऱ्यांनी गाव बंद ठेवून गावातून रॅली देखील काढली होती. मात्र, पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ही रॅली रोखली. यानंतर दोन दिवसांनी परवानगी घेऊन गावात मूक मोर्चा काढणार असल्याचं ग्रामस्थांनी स्पष्ट केलं.

माहिती देताना सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड (ETV Bharat Reporter)




प्रेमाचे जाळे, मग फसवणूक : प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, संशयिताने सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणींशी संपर्क साधून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर प्रेमसंबंधांचे आमिष दाखवत तो त्यांना भेटण्यासाठी लॉजवर घेऊन जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तिथं अत्याचार करून त्यांचे व्हिडिओ तयार करण्यात आले आणि नंतर ते व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन मानसिक छळ केल्याचंही समोर आलं आहे. हा प्रकार केवळ एका पीडितेपुरता मर्यादित नसून, सुमारे 10 ते 15 तरुणींचे आक्षेपार्ह व्हिडिओ त्यांच्याकडं असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



पोलीस तपासाचा वेग : पीडित तरुणीने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर कारवाईला वेग आला. त्यानंतर संशयिताला ताब्यात घेऊन हातकणंगले पोलिसांकडं सोपविण्यात आले आणि गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपासाचा केंद्रबिंदू हा डिजिटल पुरावे, मोबाईलमधील डेटा आणि संशयिताच्या संपर्कातील व्यक्ती यांच्यावर ठेवला आहे.


फरार संशयिताचा शोध सुरु : "याप्रकरणी हातकणंगले पोलिसात गुन्हा दाखल आहे. संशयित शाहिदला पेठवडगाव न्यायालयामध्ये सोमवारी हजर केलं असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. शाहिदबरोबर व्हिडिओ तयार करणारा त्याचा मित्र शाहरुख देसाई फरार आहे. त्याचाही शोध सुरू आहे," असं सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी सांगितलं.



गावात संतापाची लाट : या घटनेच्या निषेधार्थ पुलाची शिरोली गाव बंद ठेवण्यात आले. विविध संघटनांनी रॅली काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून ती रोखली. आंदोलकांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. स्थानिक पातळीवर या प्रकरणाला केवळ वैयक्तिक गुन्हा न मानता गंभीर सामाजिक गुन्हा म्हणून पाहिले जात असून, अधिक व्यापक तपासाची मागणीही होत आहे.



संशयितांवर कडक कारवाई करा : गावातून काढण्यात आलेल्या निषेध रॅलीवेळी भाजपा आमदार अमल महाडिक तसेच शिवसेनेचे (उबाठा) उपनेते संजय पवार हे देखील उपस्थित होते. भाजपा आमदार अमल महाडिक यांनी या प्रकरणी SIT दाखल करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं करणार असल्याची माहिती दिली. तर या घटनेनंतर शिवसेनेने (उबाठा) पुलाची शिरोली येथील पोलिसांना निवेदन देऊन संशयितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.


वडिलांनी मागितल्याचा व्हिडिओ : या घटनेतील मुख्य संशयित शाहिद सनदेच्या वडिलांनी शिरोली पुलाची गावकऱ्यांची माफी मागितल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. पोलिसांच्या मते, तपासातून या प्रकरणाची व्याप्ती अधिक स्पष्ट होऊ शकते. पीडितांची संख्या वाढण्याची शक्यता असल्यानं अन्य तरुणींनीही पुढे येऊन तक्रार द्यावी, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे. या प्रकरणामुळं सध्या कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, जलद आणि कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा -

  1. मुस्लिम सत्यशोधक मंडळाचा 'लव्ह जिहाद' कायद्याला विरोध; काय म्हणाले डॉ. शमशुद्दीन तांबोळी?
  2. माजलगावात लव्ह जिहाद! आधी मैत्री केली अन् संधी मिळताच अल्पवयीन मुलीवर केला अतिप्रसंग
  3. महाराष्ट्रात 'लव्ह जिहाद' विरोधी कायदा अस्तित्वात येणार? संजय शिरसाट म्हणाले, "येणाऱ्या अधिवेशनात..."