आत्मदहनाचा इशारा देणाऱ्या धनश्री तोडकर यांच्यासह 205 जणांची माघार, कोल्हापुरात आता 81 जागांसाठी 546 उमेदवार रिंगणात
कोल्हापुरात शुक्रवारी तब्बल 205 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. आता महापालिकेच्या 81 जागांसाठी 546 उमेदवार रिंगणात आहेत.

Published : January 3, 2026 at 7:50 AM IST
|Updated : January 3, 2026 at 8:01 AM IST
कोल्हापूर : सहकार पंढरी अशी ओळख असलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा शुक्रवारी (2 जानेवारी) शेवटचा दिवस होता. अशा स्थितीत दुपारी 3 वाजेपर्यंत शहरात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. आत्मदहनाचा इशारा दिलेल्या भाजपाच्या महिला पदाधिकारी धनश्री तोडकर यांच्यासह काही दिग्गजांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.
81 जागांसाठी 546 उमेदवार रिंगणात : आता 81 जागांसाठी महायुती, महाविकास आघाडी तसेच, अपक्ष असे एकूण 546 उमेदवार निवडणूक रिंगणात आपलं नशीब आजमावणार आहेत. दरम्यान, आज शनिवारी (3 जानेवारी) महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी इचलकरंजीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो होणार असून, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण कोल्हापुरात सभा घेणार आहेत. त्यामुळे कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिका निवडणुकीला आता चांगलाच रंग चढणार आहे.
खरं तर, शुक्रवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असल्यानं राजकीय हालचालींना मोठा वेग आला होता. सकाळपासूनच उमेदवार, पक्षनेते आणि कार्यकर्त्यांची निवडणूक कार्यालयांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली. दुपारी 3 वाजण्याच्या काही क्षण आधी अर्ज माघारीसाठी धावपळ करत येणारे उमेदवारही दिसून आले.
कोल्हापूर शहरातील शहाजी महाविद्यालय, राजारामपुरी येथील व्ही. टी. पाटील सभागृह, राजोपाध्ये नगर, मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम तसेच दुधाळी मैदान येथील निवडणूक कार्यालयांमध्ये सकाळपासूनच उमेदवारांची मोठी धांदल उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं.
नेत्यांनी काढली इच्छुकांची समजूत : कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, काँग्रेस आमदार सतेज पाटील, भाजपा खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, अमल महाडिक यांच्याकडून अपक्ष आणि इच्छुकांची मनधरणी करण्याचं काम सुरू होतं. दुपारी 3 वाजेपर्यंत माघार घेण्याची मुदत असल्यानं सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचा इच्छुकांची समजूत काढताना अक्षरश: कस लागला.
205 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले : बुधवारी अर्जांच्या छाननीनंतर 799 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. यापैकी गुरुवारी अर्ज माघार घेण्याच्या पहिल्या दिवशी 48 उमेदवारांनी, तर शुक्रवारी अंतिम दिवशी 205 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. अर्ज माघारीच्या प्रक्रियेनंतर आता 20 प्रभागांतील 81 जागांसाठी 546 उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याचं स्पष्ट झालं आहे.
मातब्बर उमेदवारांनी माघार घेतली : या निवडणुकीत अनेक मातब्बर उमेदवारांनी माघार घेतली आहे. यामध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुजीत चव्हाण यांचे पुत्र प्रसाद चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे गणेश शिंदे, काँग्रेसचे नंदकुमार सूर्यवंशी, शिवसेनेचे निलेश हंकारे, महेश पाटील, मृदुला पुरेकर, इंद्रजीत सलगर, राहुल चव्हाण, हसीना फरास, तेजस्विनी पार्टे, जहिदा खान, धनश्री तोडकर, स्वप्निल नाईकनवरे, संभाजी देवणे, किरण नकाते, प्रकाश गवंडी, शिवानंद बनछोडे, स्वाती मेथे, अजित ठाणेकर, पुष्कराज क्षीरसागर, वासुदेव महेश आणि विशाल दिंडोर्ले यांचा समावेश आहे. तसेच, महाविकास आघाडीतील काही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज मागं घेत आघाडीतील अधिकृत उमेदवारांना पाठिंबा दिला आहे.
आत्मदहनाचा इशारा देणाऱ्या धनश्री तोडकर यांचीही माघार : दरम्यान, महायुतीतील भारतीय जनता पक्षाच्या सरचिटणीस धनश्री तोडकर यांना उमेदवारी न मिळाल्यानं त्यांनी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्या प्रभाग क्रमांक 12 (क) मधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होत्या. मात्र, ऐनवेळी त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यानंतर तोडकर अस्वस्थ झाल्या होत्या.
अर्ज माघारीचा अखेरचा दिवस असल्यानं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संघटनात्मक बांधणीत त्यांना जबाबदारी देण्याचं आश्वासन दिल्याची प्रतिक्रिया धनश्री तोडकर यांनी दिली. तसेच, वरिष्ठांच्या आदेशानुसारच आपण या निवडणुकीतून माघार घेत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
निवडणूक चुरशीची होण्याची अपेक्षा : शुक्रवारी तब्बल 205 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्यानंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. आता आज शनिवारी अपक्ष उमेदवारांना चिन्हांचं वाटप होणार असून, त्यानंतर कोल्हापूर महापालिकेसाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात प्रामुख्यानं चुरशीची लढत होणार आहे.
हेही वाचा

