कोल्हापूरच्या ध्रुवताऱ्यांची इस्रो वारी; शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता मिळवणाऱ्यांना विमान प्रवासाची संधी
शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावलेल्या कोल्हापूर महापालिकेच्या शाळांमधील 25 विद्यार्थ्यांना इस्रोची वारी करण्याची संधी मिळाली आहे.

Published : January 6, 2026 at 10:31 PM IST
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीअंतर्गत येणाऱ्या महापालिकेच्या शाळांमधील शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य आणि जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) येथे अभ्यास सहलीचं आयोजन करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधनाची माहिती घेता यावी, वैज्ञानिक क्षेत्रातील करिअरविषयी प्रेरणा मिळावी आणि विमान प्रवासाचा अनुभव घेता यावा हा या सहलीमागचा उद्देश आहे.
विद्यार्थी इस्रो अभ्यास सहलीसाठी रवाना : या सहलीत 13 मुले आणि 12 मुली अशा एकूण 25 गुणवंत विद्यार्थ्यांचा सहभाग असून, त्यांच्यासोबत दोन मार्गदर्शक शिक्षक-शिक्षिका, एक अधिकारी आणि एक महिला डॉक्टर यांचा समावेश आहे. त्यामुळं एकूण 29 जणांचे प्रतिनिधीमंडळ आज कोल्हापूर विमानतळावरून विमानाने इस्रो अभ्यास सहलीसाठी रवाना झाले. विद्यार्थ्यांना केएमटीच्या विशेष बसद्वारे महानगरपालिका मुख्य इमारत चौकातून विमानतळावर रवाना करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महापालिकेचा नाविन्यपूर्ण उपक्रम : महानगरपालिकेच्या प्रशासक तसेच निवडणूक निर्णय अधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्या प्रेरणेतून हा शैक्षणिक उपक्रम दरवर्षी राबवला जातो. या माध्यमातून शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यस्तरावर यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना देशातील वैज्ञानिक, तांत्रिक आणि संशोधन संस्थांना प्रत्यक्ष भेट देण्याची संधी मिळते. या उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी महानगरपालिकेच्या वार्षिक अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात येते.
राज्यातील एकमेव महापालिका : विद्यार्थ्यांसह पालकांचे अभिनंदन करताना प्रशासक मंजूलक्ष्मी यांनी सांगितलं की, “कोल्हापूर महानगरपालिका ही राज्यातील एकमेव महानगरपालिका आहे, जी गेली 3 वर्षे अशा प्रकारचा शैक्षणिक अभ्यास दौरा सातत्याने राबवत आहे. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाविषयी आकर्षण निर्माण करणे आणि संशोधन वृत्ती जोपासणे हेच या उपक्रमाचे मुख्य ध्येय आहे.” तर "इस्त्रो फक्त पुस्तकातच वाचलं होतं आता प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मला मिळत आहे, त्या संधीचं सोनं मी करेन", अशी प्रतिक्रिया सहलीला जात असलेल्या एका विद्यार्थ्याने दिली.
विद्यार्थ्यांना विमानप्रवासाची संधी : सहलीसाठी विमान प्रवास, इस्रो केंद्रातील निवास आणि भोजन व्यवस्था तसेच परतीच्या प्रवासाचे नियोजन शिक्षण विभागाने उत्तमरित्या केले आहे. या सहली दरम्यान कोल्हापुरातून या विद्यार्थ्यांना विमानाने नेल्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळत होता. इस्रो येथे विद्यार्थ्यांना रॉकेट प्रक्षेपण प्रणाली, उपग्रह निर्मिती प्रक्रिया आणि भारताच्या भविष्यातील अंतराळ मोहिमांविषयी प्रत्यक्ष माहिती देण्यात येणार आहे. दरम्यान या उपक्रमामुळं कोल्हापूर महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक कुतूहल आणि राष्ट्रीय अभिमान वृद्धिंगत होईल, असा विश्वास शिक्षण समितीने व्यक्त केला आहे.
हेही वाचा -

