ETV Bharat / state

मूल होत नसल्यानं सासरच्या मंडळींकडून छळ: कोल्हापुरातील विवाहितेनं संपवलं जीवन

कोल्हापूर जिल्ह्यातून एक गंभीर घटना समोर आली आहे. एका विहितेनं सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Symbolic image
प्रतिकात्मक छायाचित्र (ETV Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 11, 2026 at 1:20 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

कोल्हापूर : लग्नानंतर माहेरहून पैसे आणण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी विवाहित महिलांचा छळ होत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. बऱ्याचदा अशा घटनांमध्ये विवाहिता आपली जीवनयात्रा संपवतात. अशाच प्रकारची एक घटना कोल्हापुरात उघडकीस आली आहे. 'मूल होत नसल्यानं नवऱ्याचं दुसरं लग्न लावून देतो', या सासरच्या धमक्यांना कंटाळून एका विवाहितेनं आत्महत्या केली आहे. या प्रकरणी पती, सासूसह सासरच्या चौघांना अटक करण्यात आली आहे. शिरोळ तालुक्यातील चिपरी गावात ही घटना घडली आहे.


सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल : कोमल उर्फ कीर्ती किशोर आवळे (वय 27, रा. चिपरी) या विहितेनं गुरुवारी (8 जानेवारी) रात्री आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी सांगली येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र शुक्रवारी (9 जानेवारी) मध्यरात्रीनंतर त्यांचा मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेची नोंद जयसिंगपूर पोलीस ठाण्यात झाली असून, पती किशोर पट्टू आवळे, सासू शोभा पट्टू आवळे, दीर अतुल प्रशांत उर्फ पट्टू आवळे आणि जाऊ कोमल अतुल आवळे (सर्व रा. चिपरी) या चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 106(बी) आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारीच पोलिसांनी सर्व आरोपींना बेड्या ठोकल्या असून, त्यांना न्यायालयानं सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.



मूल नसल्याबद्दल सतत अपमान आणि धमक्या : तक्रारदार कुमार आदगोंडा कांबळे (रा. आळते, ता. हातकणले) यांच्या तक्रारीनुसार, कोमल यांचा विवाह किशोर पट्टू आवळे याच्याशी झाला होता. मात्र, त्यांना मूल होत नसल्याबद्दल सतत मानसिक आणि शारीरिक छळाला सामोरं जावं लागत होतं. "तुला बाळ होत नाही, किशोरचं दुसरं लग्न करतो," अशा अपशब्दांनी विवाहितेला वारंवार त्रास दिला जात होता. पती, सासू, दीर आणि जाऊ हे सर्वजण मिळून तिचा छळ करत असल्याचं फिर्यादीत नमूद आहे. जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळाची सखोल पाहणी करून पुरावे जप्त केले आहेत. सोबतच फिर्यादीचे जबाबदेखील नोंदवले आहेत.

दरम्यान, कोमल यांनी टोकाचं पाऊल उचलताच शेजाऱ्यांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केलं. मात्र, कोमल यांचं शरीर 90 टक्के भाजलं होतं. अशा स्थितीत डॉक्टरांनी अथक प्रयत्न करूनही त्यांचा जीव वाचला नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला आणि संशयित सासरच्या मंडळींना अटक केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युनुस इनामदार करीत आहेत.

पोलिसांनी काय सांगितलं? : जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी सांगितलं की,"सासरच्यांनी छळ केल्याचे पुरेसे पुरावे मिळाले आहेत. सर्व आरोपींना शुक्रवारी मध्यरात्रीनंतर अटक करण्यात आली आहे. न्यायालयात हजर केलं असता त्यांना सोमवार (12 जानेवारी) पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे."



टीप - आत्महत्या हा उपाय नाही : जर तुमच्या मनात आत्महत्येचे विचार येत असतील, किंवा तुम्हाला एखाद्या मित्राची काळजी वाटत असेल, किंवा तुम्हाला भावनिक आधाराची गरज असेल, तर तुमचे ऐकण्यासाठी नेहमीच कोणीतरी आहे. स्नेहा फाउंडेशन - 04424640050 (24x7 उपलब्ध) किंवा आयकॉल, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस हेल्पलाइन 9152987821 वर कॉल करा (सोमवार ते शनिवार सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत उपलब्ध).

हेही वाचा