ETV Bharat / state

कोल्हापुरात महायुतीचं जमलं, भाजपा मोठा भाऊ, तर शिवसेना, राष्ट्रवादीच्या वाट्याला किती जागा? जाणून घ्या

कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीमधील जागावाटपाचा तिढा सुटला आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाला 37, शिवसेनेला 30 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 15 जागा देण्यात आल्या आहेत.

Kolhapur KMC election Mahayuti
कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : December 30, 2025 at 12:43 PM IST

|

Updated : December 30, 2025 at 1:05 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

कोल्हापूर : महापालिकेच्या निवडणुका गेल्या 10 वर्षांत न झाल्यामुळे इच्छुकांची संख्या वाढली होती. अशा स्थितीत कार्यकर्त्यांची समजूत काढताना नेत्यांचा मोठा कस लागत होता. काही ठिकाणी निष्ठावंत कार्यकर्त्यांना वगळून केवळ 'निवडून येण्याची क्षमता' हा एकमेव निकष ठेऊन महापालिकेतील 81 जागांसाठी महायुतीत मंगळवारी (29 डिसेंबर) एकमत झालं.

महायुतीतील भारतीय जनता पक्षाला 37, शिवसेनेला 30 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 15 जागा देण्यात आल्या आहेत. याबाबत राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक आणि आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत एकत्र येऊन महायुतीवर शिक्कामोर्तब झाल्याची घोषणा केली.

काँग्रेसच्या टॅगलाईनची खिल्ली : संपूर्ण जिल्ह्याच्या नजरा ज्याकडे लागल्या होत्या, त्या महायुतीची उमेदवार यादी प्रदेश कार्यालयाकडे पाठवण्यात आली आहे. वरिष्ठांची मान्यता मिळाल्यानंतर ही यादी मंगळवारी (30 डिसेंबर) जाहीर होणार असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं.

यावेळी काँग्रेस आघाडीकडून कोल्हापूर महानगरपालिकेसाठी जाहीर केलेल्या 'कोल्हापूर कस्सं... तुम्ही म्हणशीला तस्स' या टॅगलाईनची महायुतीकडून खिल्ली उडवण्यात आली आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर संदर्भात टीका करत सांगितलं की, 'कोल्हापूर कसं तर पाण्याची वाट झालेली आहे तसं, आयटी पार्क रखडलेलं आहे तसं, रस्त्यांची वाट लागलेली आहे तसं,' असं प्रत्येक वेळी टॅगलाईन लावून आमदार सतेज पाटील यांच्या माध्यमातून नागरिकांना फसवण्याचं काम झालं आहे. सोबतच, खासदार महाडिक यांनी प्रश्न उपस्थित करत विचारलं की, ज्यांच्याकडे राज्यात आणि केंद्रात सत्ता नाही, ते विकास कसा करतील?

कृष्णराज 'छावा', झेप घेणारच : यावेळी कृष्णराज महाडिक यांना ऐनवेळी माघार घ्यावी लागली, याबाबत त्यांनी स्पष्ट केलं आणि सांगितलं की, पक्षाचा आदेश सर्वांना मान्य करावा लागेल. प्रदेश पातळीवर लोकप्रतिनिधींच्या घरातील व्यक्तींना उमेदवारी द्यायची नाही असा निर्णय झाला आहे, आणि याचं पालन आम्ही केलं. कृष्णराज हा छावा आहे आणि तो झेप घेणारच, असंही धनंजय महाडिक यांनी म्हटलं.

या पत्रकार परिषदेला राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, माजी आमदार जयश्री जाधव, जयंत पाटील, सत्यजित कदम, आदिल फरास, महेश जाधव, विजय जाधव यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते

उमेदवारी न मिळाल्याने आत्मदहन करण्याचा इशारा : उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांना अनेक धक्के सहन करावे लागले. भाजपाच्या सरचिटणीस धनश्री तोडकर यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. मात्र, अखेरच्या क्षणी त्यांचं नाव मागं पडलं. यानंतर तोडकर यांनी भाजपा कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा थेट इशाराच दिला आहे, यामुळे नाराज असलेल्या इच्छुकांची समजूत काढताना नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. शिवसेनेचे माजी परिवहन सभापती राहुल चव्हाण यांनाही तिकीट न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली आता ते अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

हेही वाचा

Last Updated : December 30, 2025 at 1:05 PM IST