ETV Bharat / state

कोल्हापूरच्या चुटकीवाल्या भोंदूबाबाला ठाण्यात अटक; पोलिसांना देत होता चकवा

कोल्हापुरात चुटकी वाजून भूतबाधा उतरवणाऱ्या चुटकीवाला (Chutkiwala Baba) भोंदूबाबा सनी भोसलेला (Sunny Bhosale) करवीर पोलिसांनी आज ठाण्यात अटक केली आहे.

Kolhapur Chutkiwala Baba
भोंदूबाबाला ठाण्यात अटक (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : November 23, 2025 at 3:23 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

कोल्हापूर : जिल्ह्यातून एक संताप आणणारी माहिती समोर आली आहे. विवाहानंतर पती-पत्नीतील वाद, कौटुंबिक गृहकलह आणि समस्यांनी पिचलेल्यांना हेरून चुटकी वाजवत समस्या दूर करण्याची भोंदूगिरी करणाऱ्या कोल्हापुरातील चुटकीवाल्या बाबाला करवीर पोलिसांनी ठाण्यात अटक केली. 'सनी भोसले' असं या भोंदूबाबाचं नाव असून, गेल्या काही दिवसांपूर्वी त्याचे प्रताप बाहेर आल्यानंतर तो कोल्हापुरातून पसार झाला होता. साताऱ्यातील वाई, मुंबई, ठाणे अशा भागात वावरत असताना करवीर पोलिसांनी त्याला अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली. न्यायालयाने भोसलेला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, पोलिसांनी अधिकचा तपास सुरू केला आहे, आता त्याचे अनेक कारनामे बाहेर येण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया देताना पोलीस निरीक्षक किशोर शिंदे (ETV Bharat Reporter)


काय आहे प्रकरण? : कोल्हापुरातील फुलेवाडी रिंग रोड परिसरातील क्रांतिसिंह नाना पाटील नगरात चार खोल्यांच्या घरात दरबार भरवणाऱ्या आणि चुटकी वाजवत नागरिकांच्या समस्या दूर करण्याची भोंदूगिरी करत सनी भोसलेने गेल्या अनेक वर्षांपासून बस्तान बसवले होते. कोल्हापूर जिल्ह्यासह जवळील कर्नाटक राज्यातूनही लोक त्याच्याकडे यायचे. अमावस्या, पौर्णिमेला या ठिकाणी मोठी गर्दी झालेली असायची, भगव्या कपड्यातील समोरच्याला धडकी भरवणारे त्याचे हास्य, विशेषता महिलांशी करत असलेला संवाद, संमोहित करण्याची कला बाबांनी आत्मसात केली होती. अनेक उच्चभ्रू महिलाही त्याच्या संपर्कात होत्या. मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि कोल्हापूर पोलिसांच्या पथकाने तक्रारी आल्यानंतर त्याच्यावर लक्ष ठेवलं होतं. यातूनच दोन दिवसांपूर्वी दरबार भरणाऱ्या ठिकाणावर छापा टाकून पोलिसांनी त्या ठिकाणाचे करणी उतरवण्याचे साहित्य जप्त केले होते. यानंतर भोंदूबाबाने कोल्हापुरातून पळ काढला होता. साताऱ्यातील वाई मार्गे सनी भोसले ठाणे जिल्ह्यात असल्याची माहिती करवीर पोलिसांच्या पथकाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सनी भोसलेला शनिवारी मध्यरात्री बेड्या ठोकल्या, त्याला आज न्यायालयासमोर उभं केलं असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.‌



फसवणूक झालेल्यांना पोलिसांचं आवाहन : घरातील वाद, कुटुंबातील समस्या घेऊन येणाऱ्यांना भोंदू बाबा फसवायचा, यामध्ये जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील अनेकांची फसवणूक झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. ज्या लोकांची फसवणूक झाली आहे त्यांनी सनी भोसले विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करावी, असं आवाहन करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी केलं आहे. तर भोसलेने शिताफीने मोबाईलची सिम कार्ड अनेक महिलांच्या नावावर घेतली असून, त्याचाही तपास करवीर पोलीस करीत आहेत. मात्र समाजातील अशा प्रवृत्तीला थारा न देता जनतेने सावध राहावं, असं आवाहनही कोल्हापूर पोलिसांच्या वतीनं करण्यात आलं आहे.

टीप- ('ईटीव्ही भारत' कोणत्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही.)

हेही वाचा -

  1. साताऱ्यातील मृत महिलेची मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न फसला, जळगावच्या भोंदूबाबाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
  2. “तू माझ्यासोबत संबंध ठेवले नाहीस तर...; भोंदूबाबाकडून महिलेवर तब्बल दहा वर्षे लैंगिक अत्याचार
  3. Nashik Fake Baba : भोंदूबाबा महिला अत्याचार प्रकरण, चौकशीची माहिती घेण्यासाठी चित्रा वाघ यांची येवल्यात भेट