स्वयंपाकघरात बिबट्या! घरातल्यांची बसली पाचावर धारण; बिबट्या मात्र सुशेगात
बिबट्या हिंस्र शिकारी म्हणून नाही तर एका 'असाहाय्य जखमी' जिवाच्या रूपात आश्रयासाठी आला होता. सकाळच्या सुमारास दाभोली कोऱ्याची वाडी परिसरात ही थरारक घटना घडली.

Published : April 9, 2026 at 3:36 PM IST
सिंधुदुर्ग : सतत वाढती वृक्षतोड त्यातच कडाक्याचा उन्हाळा आणि पाण्यासाठी वणवण यामुळे व्याकूळ झालेले वन्यजीव आता मानवी वस्ती आसरा शोधू लागले असून, तसाच प्रकार वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली येथे घडला. विवेक जोशी यांच्या घरी चक्क 'बिबट्या' पाहुणा म्हणून अवतरला! तोही थेट स्वयंपाकघरात. बिबट्या घरात शिरल्याचे समजताच परिसरात मोठी खळबळ उडाली. मात्र, हा बिबट्या हिंस्र शिकारी म्हणून नाही तर एका 'असाहाय्य जखमी' जिवाच्या रूपात आश्रयासाठी आला होता. सकाळच्या सुमारास दाभोली कोऱ्याची वाडी परिसरात ही थरारक घटना घडली.
काटेरी कुंपणातून रस्ता ओलांडताना जखमी : कुडाळ वनक्षेत्रपाल संदीप कुंभार यांनी सांगितले की, ही सुमारे दोन वर्षे वयाची मादी आहे. काटेरी कुंपणातून रस्ता ओलांडताना तिच्या मानेवर गंभीर जखम झाली होती. ही जखम चिघळल्याने आणि अन्नावाचून तिला प्रचंड अशक्तपणा आला होता. सुरक्षित आश्रय शोधण्यासाठी ही मादी घरात शिरली होती. तिने कोणावरही हल्ला केला नाही.
बिबट्या प्रथम आपल्या बागेत आणि नंतर गोठ्यात दिसला : बागायतदार विवेक जोशी यांना हा बिबट्या प्रथम आपल्या बागेत आणि नंतर गोठ्यात दिसला. ग्रामस्थांनी त्याला हाकलण्याचा प्रयत्न करताच बिथरलेला बिबट्या थेट जोशी यांच्या स्वयंपाकघरात घुसला आणि तिथेच ठाण मांडून बसला. एरवी बिबट्याचे नाव काढले तरी अंगावर काटा येतो, पण या घटनेने सर्वांच्या डोळ्यांत पाणी आणले. मानेवर झालेली खोल जखम आणि मृत्यूच्या दारातील वेदना सहन न झाल्यानेच या बिबट्यानं माणसांच्या वस्तीत धाव घेतली. तिथे गर्दी होती, गोंगाट होता, तरीही तो शांत राहिला
उपचार करून मादी बिबट्याला अधिवासात सोडणार : सहायक वनसंरक्षक डॉ. सुनील लाड यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव पथकाने या बिबट्याला जेरबंद केले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शरद जाधव आणि टीमने उपचार केल्यानंतर मादी बिबट्याची प्रकृती आता स्थिर असल्याचं सांगितलंय.
हेही वाचाः

