ETV Bharat / state

रत्नागिरीच्या खेडमध्ये मुसळधार पावसानं हाहाकार; भीषण भूस्खलन, एक सुखरूप, दोघं अद्याप बेपत्ता

खेड तालुक्यातील दहिवलीत सोमवारी रात्री भूस्खलन होऊन एका घरावर दरड कोसळली. 75 वर्षीय महिलेची सुखरूप सुटका झाली असून अन्य दोघांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.

KHED LANDSLIDE
रत्नागिरीच्या खेडमध्ये भूस्खलन (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : July 7, 2026 at 2:21 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

रत्नागिरी : जून महिल्यात दडी मारलेल्या पावसानं मागील काही दिवसांपासून दमदार हजेरी लावली आहे. यामुळं राज्यात अनेक ठिकाणी नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. तर काही ठिकाण भूस्खलन आणि दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. सोमवारी (दि. 6) रात्री रात्री सव्वानऊच्या सुमारास खेड तालुक्यातील दहिवली येथील शेलारवाडीमध्ये भूस्खलन झालं. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळं डोंगराचा भाग अचानक एका घरावर कोसळला. एका वृद्ध महिलेची सुटका केली असून अन्य दोघांचा शोध अद्याप सुरू आहे.

एकाची सुटका; दोघांचा अद्याप शोध सुरू : सोमवारी रात्री अचानक डोंगरावरून माती आणि दगडांचा मोठा ढिगारा शेलार कुटुंबाच्या घरावर आला. त्यामुळं घराचा काही भाग जमीनदोस्त झाला. यात घरातील तीन सदस्य ढिगाऱ्याखाली अडकले. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं. स्थानिकांच्या मदतीमुळं 75 वर्षीय कल्पना शेलार यांना ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. यानंतर त्यांना उपचारासाठी कळबणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं आहे. 85 वर्षीय शांताराम बाळा शेलार आणि 35 वर्षीय सतीश शेलार यांचा शोध घेण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

रत्नागिरीच्या खेडमध्ये भूस्खलन (ETV Bharat Reporter)

युद्धपातळीवर बचावकार्य : या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रांताधिकारी, तहसीलदार, खेड पोलीस, महसूल विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झालं. आपत्ती व्यवस्थापन युद्धपातळीवर बचावकार्य करत आहे. सध्या परिसरात मुसळधार पाऊस आणि डोंगराळ भागातील माती सैल झाल्यामुळं बचावकार्यात अडथळे येत आहेत. प्रशासनानं शेलारवाडीतील काही घरं धोकादायक असल्याचं जाहीर केलं असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. पावसाचा असा रौद्र अवतार आयुष्यात पहिल्यांदाच पाहिल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत होत आहे. बेपत्ता दोघांचा शोध लागेपर्यंत बचावकार्य सुरूच राहणार असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं.

परिसरातील कुटुंबांना स्थलांतरित करण्याचे आदेश : दुर्घटनेची माहिती समजल्यानंतर सकाळीच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसंच या ठिकाणी आणि आजूबाजूच्या परिसरातील कुटुंबांना स्थलांतरित करण्याचे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. एनडीआरएफ पथक दाखल झालं असून ढिगारा बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

हेही वाचा :

  1. नाशिकमधील ढगफुटीचा धोका टळला; संततधार पावसामुळे वाढली गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी
  2. महाराष्ट्रातील 'हे' 8 जिल्हे भूस्खलनाच्या उंबरठ्यावर! 'जीएसआय'च्या अहवालातून धक्कादायक आकडेवारी समोर
  3. कृष्णा नदीच्या वाढत्या पाण्यामुळे नृसिंहवाडीत पहिला दक्षिण द्वार सोहळा संपन्न; दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी