ETV Bharat / state

कागल सीमा तपासणी नाका अपघाताचे केंद्र, दोन दिवसात दोन बळी; प्रादेशिक परिवहन अधिकारी ॲक्शन मोडवर!

कागल येथील सीमा तपासणी नाक्यावरील चुकीच्या नियोजनामुळं सतत अपघात होत असल्यानं वाहनधारकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

Kagal border check point accident epicentre, two victims in two days
कागल सीमा तपासणी नाका अपघाताचे केंद्र, दोन दिवसात दोन बळी; प्रादेशिक परिवहन अधिकारी ॲक्शन मोडवर! (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : February 26, 2026 at 5:46 PM IST

|

Updated : February 26, 2026 at 8:06 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

कोल्हापूर : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कागल येथील सीमा तपासणी नाक्यावरील चुकीच्या नियोजनामुळं सतत अपघात होत असल्यानं वाहनधारकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. हा सीमा तपासणी नाका जणू मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या वर्षभरात पाच जणांचा या ठिकाणी मृत्यू, त्यातच गेल्या दोन दिवसात या ठिकाणी अपघात होऊन दुचाकी दोन दुचाकी चालकांना प्राण गमवावे लागले. दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी प्रशासनाला सक्त सूचना दिल्या आहेत.

वाहनधारकांचा दररोज उडतो गोंधळ : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील कागल येथील सीमा तपासणी नाक्यावर वाहनं महामार्गावरून वळविण्यासाठी उभारलेले झिगझॅग अडथळे आणि लेन व्यवस्था चुकीची असल्यानं वाहनधारकांचा दररोज गोंधळ उडतो. निपाणीकडे जाणाऱ्या दुचाकी वाहनांना मालवाहतुकीसाठी वेगळी लेन सोडावी लागते, तर प्रवासी वाहनांना थेट पुढं जावं लागतं. यामुळं दुचाकीस्वारांना मागच्या वाहनांची खात्री करून वळण घ्यावं लागतं, ज्यामुळं गाफिलपणा होऊन अपघात घडतात. तसंच, नाक्यातून बाहेर पडणारी मालवाहने वेगानं महामार्गावर धावतात. ज्यामुळं प्रवासी वाहनांना धडक बसते.

कागल सीमा तपासणी नाका अपघाताचे केंद्र, दोन दिवसात दोन बळी; प्रादेशिक परिवहन अधिकारी ॲक्शन मोडवर! (ETV Bharat Reporter)


ठेकेदार कंपनीची उदासीनता, लाखोंची उलाढाल : 10 डिसेंबर 2024 रोजी अदानी समूहाशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र बॉर्डर चेक पोस्ट नेटवर्क लिमिटेड या कंपनीकडे वर्ग झालेल्या या एकात्मिक नाक्यावर हलके वाहनांसाठी 53, मध्यमसाठी 112 आणि जड वाहनांसाठी 212 रुपये आकारले जातात. हजारो वाहनांची ये-जा होत असल्याने यातून रोज लाखो रुपयांची उलाढाल होते, तरी कंपनीनं सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केलं आहे. केंद्र सरकारच्या धोरणानुसार हा नाका बंद होणार असला तरी महाराष्ट्र शासनानं गुंतवलेली रक्कम आणि नुकसान भरपाई न दिल्यानं तो सुरुच आहे. आरटीओ अधिकारी आणि वाहतूक पोलीस फक्त औपचारिक कार्य पार पाडत असल्याचं दिसतं.


स्थानिकांच्या मागण्या तातडीच्या : या अपघातांमुळे स्थानिकांना मोठा त्रास होत असून, वाहतूक शिस्त लावणे, अडथळे हटवणे आणि योग्य लेन व्यवस्था करणे, यासाठी तातडीनं उपाययोजना व्हाव्यात, अशी मागणी वाढली आहे. तसंच शब्बीर देसाई यांच्या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी नाक्यावर मोठं जनआंदोलन उभं राहील, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे. "हा तपासणी नाका सुरुवातीपासूनच वादात आहे. या राष्ट्रीय महामार्गावर कंपनीकडून दिशादर्शक फलक देखील लावले नाही आहेत. या ठिकाणी होणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढले असून त्याची पर्वा कंपनीला नाही आहे. यावर ठोस कारवाई करून उपाययोजना न केल्यास हा तपासणी नाका कायमस्वरूपी बंद करु," अशी प्रतिक्रिया कागल येथील किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि रहिवासी असलेले सागर कोंडेकर यांनी दिली आहे. तर "कागल या ठिकाणी असलेल्या तपासणी नाक्यामुळं सामान्य माणसांचे बळी जात आहेत आणि याला प्रशासन जबाबदार आहे. या ठिकाणी कारवाई करण्यासाठी प्रशासन अजून किती नागरिकांचा बळी घेणार?," असा सवाल करनूर येथील ग्रामस्थ अजित कदम यांनी उपस्थित केला आहे.

Regional Transport in Kolhapur
प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर (ETV Bharat Reporter)


सीमा तपासणी नाक्यावर असे होणार बदल : पुणे-बंगळुरू व राष्ट्रीय महामार्गावरील कागल तपासणी नाक्यावर कर्नाटकातून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या वाहनांची तपासणी होत असते. हा तपासणी नाका खासगी तत्वावर अदानी समूहाकडे आहे, आधुनिकीकरण झाल्यानंतर हा सीमा तपासणी नाका असुविधेच्या गर्देत अडकला आहे. वारंवार अपघात घडत असल्यामुळं प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन प्रशासनाला सूचना दिले आहेत. यामध्ये तात्काळ रोड सेफ्टी मेजर्स घेण्यात येणार आहेत तर भरधाव येणाऱ्या वाहनांना दिशादर्शक फलक, तात्काळ लावण्यात येणारे आधुनिक गतिरोधक यासह सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


हेही वाचा :

  1. मरिन ड्राईव्हनंतर बारामती पोलिसांकडूनही एफआयआर नाही; रोहित पवार म्हणाले,'पोलिसांचे चेहरे पाहूनही दबाव जाणवतो'
  2. टिपू सुलतान आणि शिवाजी महाराज तुलना वादग्रस्त; इतिहासाच्या मांडणीवरून विधानसभेत खळबळ
  3. फळबाग कशी जोपासायची? कीटकनाशकांच्या फवारणीनं मधमाशांचा मृत्यू; डाळिंब उत्पादक शेतकरी संकटात
Last Updated : February 26, 2026 at 8:06 PM IST