इराण-इस्रायल संघर्ष : जालन्याचे खासदार कल्याण काळे यांच्यासह 7 जण दुबईत अडकले, सुरक्षित असल्याची दिली माहिती
खासदार डॉ. कल्याण काळे दुबईत अडकले आहेत. ते कौटुंबिक कामानिमित्त दुबईला गेले आहेत. ते सुरक्षित असल्याची माहिती त्यांच्या स्वीय सहाय्यकानं दिली आहे.

Published : March 3, 2026 at 7:36 AM IST
जालना : मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील नागरिकांसह खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या सुरक्षिततेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जालन्याचे खासदार डॉ. कल्याण काळे हे नियोजित कौटुंबिक दौऱ्यानिमित्त दुबईला गेले असून ते परिवारासह पूर्णपणे सुखरूप आहेत, अशी अधिकृत माहिती त्यांच्या स्वीय सहाय्यकांकडून देण्यात आली आहे. ते सातत्यानं संपर्कात असून त्यांच्या प्रकृती किंवा सुरक्षिततेबाबत कोणतीच चिंता करण्याचं कारण नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
सोबतच, खासदारांचे स्वीय सहाय्यक प्रविण थाले यांनी कार्यकर्ते, नागरिक आणि हितचिंतकांनी सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन केलं आहे.
जालन्याचे 7 जण UAE मध्ये अडकले : दरम्यान, मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जालना शहरातील एकूण 7 नागरिक संयुक्त अरब अमिरातीमध्ये अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी 5 जण दुबईत, तर 2 जण अबूधाबी इथं आहेत. संबंधितांनी दिलेल्या माहितीनुसार ते सर्वजण सुरक्षित असून हल्लाग्रस्त भागांपासून दूर आहेत.
जिल्हा प्रशासनाकडून सतत संपर्कात राहण्याच्या सूचना : शिक्षण, नोकरी आणि पर्यटनासाठी गेलेल्या या नागरिकांनी कुटुंबीयांना आपण सुखरूप असल्याचा निरोप दिला आहे. मात्र, सध्या विमानसेवा बंद असल्यामुळे मायदेशी परतण्यास विलंब होत आहे. विमानसेवा पूर्ववत सुरू झाल्यानंतर ते भारतात परतणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. जिल्हा प्रशासनानं संबंधित नागरिकांशी संपर्क साधून त्यांच्या सुरक्षिततेची माहिती घेतली असून सतत संपर्कात राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, भारत सरकारच्या दूतावासांकडून मध्यपूर्वेतील विविध देशांमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा अॅडव्हायझरी जारी करण्यात आली आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, स्थानिक प्रशासन व भारतीय दूतावासांच्या सूचनांचे पालन करावं, तसेच आपत्कालीन परिस्थितीत हेल्पलाईनशी संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.
अबुधाबी येथे कार्यरत असलेल्या जालना येथील अभियंता उत्कर्षा इंगळे यांच्या कुटुंबीयांनीही त्या सुरक्षित असल्याची माहिती दिली आहे. स्थानिक प्रशासन आणि संबंधित कंपनीकडून खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या असून नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

