ETV Bharat / state

15 दिवसांत तोडगा काढण्याचं आश्वासन; जैन मुनींनी सकाळी सुरू केलेलं उपोषण संध्याकाळी घेतलं मागे!

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पंधरा दिवसात तोडगा काढण्याचं आश्वासन दिल्यानंतर जैन मुनी निलेशचंद्र यांनी उपोषण मागे घेतलं आहे.

Jain monk Nileshchandra stages protest against closure of Dadar Kabutarkhana in Mumbai
15 दिवसांत तोडगा काढण्याचं आश्वासन; जैन मुनींनी सकाळी सुरू केलेलं उपोषण संध्याकाळी घेतलं मागे! (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : November 3, 2025 at 8:51 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : दादर येथील कबुतरखाना पुन्हा सुरू करण्यात यावा, या मागणीसाठी जैन मुनी निलेशचंद्र यांनी आज (3 नोव्हेंबर) आझाद मैदान इथं सकाळी सुरू केलेले उपोषण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या आश्वासनानंतर मागे घेतलं आहे. दरम्यान, दादर येथील कबुतरखाना जोपर्यंत पुन्हा सुरू होत नाही, तोपर्यंत अनिश्चितकाळासाठी उपोषण करणार, असं जैन मुनी निलेशचंद्र यांनी म्हटलं होतं. त्यांच्या मागणीवर सरकारचे प्रतिनिधी म्हणून राहुल नार्वेकर आणि मंगलप्रभात लोढा यांनी आझाद मैदानात येऊन पंधरा दिवसात तोडगा काढण्याचं आश्वासन दिल्यानंतर जैन मुनी निलेशचंद्र यांनी उपोषण मागे घेतलं आहे.

दादर कबुतरखाना पुन्हा उघडण्यात यावा : मुंबईत एकूण 52 कबूतरखाने असून, त्यापैकी चार कबुतरांना खाद्य टाकण्याची वेळ निर्धारित करून तात्पुरत्या स्वरूपात पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. जैन मुनी निलेशचंद्र यांची मागणी आहे की, "दादर कबुतरखाना देखील शक्य तितक्या लवकर जनतेसाठी आणि कबुतरांसाठी पुन्हा उघडण्यात यावा. कबुतरांना खाद्य टाकण्यासाठी पालिकेनं ज्या जागा सुचित केल्या आहेत, त्या जागा दादर कबुतरखान्यांपासून चार ते पाच आणि काही जागा या सुमारे नऊ किलोमीटर अंतरावर आहेत. तसंच कबुतर इतके दूर उडतील का? नवीन जागा सध्याच्या कबुतरखान्यांपासून दोन किलोमीटर अंतरावर असावी," अशी मागणी जैन मुनींची आहे.

तीन मागण्यांसाठी आजचं उपोषण : जैन मुनी निलेशचंद्र यांनी उपोषण सुरू केल्यानंतर राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी निलेशचंद्र यांची आझाद मैदान इथं उपोषणस्थळी भेट घेतली. नार्वेकर आणि लोढा यांच्याकडून आश्वासन मिळाल्यानंतर माध्यमांशी बोलताना जैन मुनी निलेशचंद्र यांनी म्हणाले की, "पालिकेनं बंद केलेले 52 कबूतरखाने पुन्हा सुरू करण्यात यावेत, गोरक्षकांवरील हल्ले आणि मंदिर सुरक्षा या तीन मागण्यांसाठी आमचं आजचं उपोषण होतं. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी इथं येऊन सरकारसोबत चर्चा करून पंधरा दिवसात तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं आहे. या पंधरा दिवसात त्यांनी आश्वासन पूर्ण केलं नाही, तर पुढील आंदोलन तीव्र करण्यात येईल," असा इशारा जैन मुनी निलेशचंद्र यांनी दिला आहे.

सर्वांची काळजी घेण्याची सरकारची जबाबदारी : दरम्यान, दादर येथील कबूतरखान्याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना विचारण्यात आले असता, त्यांनी सांगितलं की, "इथं असलेल्या प्रत्येक जीवित घटकाची... त्यात माणूस, पशुपक्षी, प्राणी सर्वच आले. या सर्वांची काळजी घेण्याची सरकारची जबाबदारी आहे. याविषयी सरकार गांभीर्यानं काम करत असून, याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन सरकार योग्य तो निर्णय देईल," असे नार्वेकर यांनी म्हटलं आहे. तर, दादर येथील कबूतरखाना लवकरात लवकर पुन्हा सुरू करण्यात यावा, यासाठी पालिकेसोबत आपण पत्रव्यवहार करणार असल्याचं मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा :

  1. मजुराचा मुलगा ते 40 जणांना रोजगार देणाऱ्या कंपनीचे मालक; बीडच्या तरुणानं कसं मिळविलं यश?
  2. "पक्ष्यांच्या वारसासह अधिवासाच्या संरक्षणासाठी व्हावेत प्रयत्न" -प्रवीण परदेशी
  3. रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यासाठी सर्वपक्षीय महिला आक्रमक, पुण्यात जोडेमारो आंदोलन