मुंबईतील कोस्टल रोडवरील ‘जय हो’ ठरतेय डोकेदुखी?
गाड्या त्या भागातून जाताच जय हो वाजू लागतं. मात्र दर मिनिटाला शेकडो गाड्या जात असल्यामुळे स्थानिकांना सदासर्वकाळ ‘जय हो’ ऐकण्याची सक्ती झालीय.

Published : February 25, 2026 at 4:37 PM IST
|Updated : February 25, 2026 at 6:45 PM IST
- प्राजक्ता पोळ
मुंबई- समुद्रावरून येणारा वारा, उंचच उंच गगनचुंबी इमारती, अभियांत्रिकी आविष्कार असणारा कोस्टल रोड आणि तो पार करताना वाजणारे जय हो गाण्याचे सूर. कोस्टल रोडवर अलीकडेच सूरमयी टप्पा कार्यान्वित करण्यात आलाय. मुंबईच्या रस्त्यांवर प्रवास करत असताना ‘ट्रॅफिकची समस्या, हॉर्नचे आवाज यात गाणं ऐकत प्रवास करायला कोणाला नाही आवडणार? छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोडवरील 500 मीटरच्या या पट्ट्याची दखल ब्रिटनमधील प्रसिद्ध दैनिक ‘द गार्डियन’ने घेतली. भारतातील पहिल्या ‘म्युझिकल’ रस्त्याचे वृत्त ‘द गार्डियन’ या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर याची चर्चा जागतिक स्तरावर रंगलीय. पण तुमचा प्रवास सूरमयी करून टाकणाऱ्या या पट्ट्यांनी स्थानिकांची मात्र लयच हरपली आहे. गाड्या त्या भागातून जाताच जय हो वाजू लागतं. मात्र दर मिनिटाला शेकडो गाड्या जात असल्यामुळे स्थानिकांना सदासर्वकाळ ‘जय हो’ ऐकण्याची सक्ती झालीय.

सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंतचा ‘जय हो’चा नाद डोकेदुखी : ‘जय हो’ गाणं नक्कीच चांगलं आहे, आम्हाला ए. आर. रेहमान यांच्याविषयी आदरच आहे, पण प्रत्येक गाडी तिथून गेल्यावर ते वाजू लागलं तर आमचं आयुष्य कसं होईल, याचा विचार सरकारने करावा, असं स्थानिकांचं म्हणणं आहे. कोट्यवधी रुपये खर्चून हा सांगीतिक टप्पा उभारण्यापेक्षा शहरातल्या अन्य आवश्यक पायाभूत सुविधांकडे लक्ष द्यायला हवं होतं, याकडेही स्थानिकांनी लक्ष वेधलं. रस्ता सुरू झाल्यापासून दररोज सकाळी 6 वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत ‘जय हो’चा सततचा आवाज ऐकू येत असल्याची तक्रार स्थानिकांनी केलीय. सुमारे 650 हून अधिक कुटुंबांनी महापालिका आयुक्तांकडे औपचारिक तक्रार दाखल केली असून, त्याची प्रत मुख्यमंत्र्यांनाही पाठवण्यात आलीय.

सततचा हा आवाज त्रासदायक : तक्रारीत “उच्च वेगाच्या रस्त्यावर आवाजामुळे चालकाचे लक्ष विचलित होणे” हा संभाव्य सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित करण्यात आलाय. आठ पदरी द्रुतगती मार्गावर आधीच वेगाची मर्यादा ओलांडली जाते, अशा परिस्थितीत ‘संगीताद्वारे वेगनियंत्रण’ कितपत आवश्यक आहे, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. नागरिकांच्या मते, सततचा हा आवाज त्रासदायक आहे. त्यामुळे अनेकांना दिवसभर खिडक्या बंद ठेवाव्या लागत असल्याचे त्यांनी नमूद केलंय.

सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत मोठ्या आवाजात संगीत वाजवले : रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, मुंबई कोस्टल रोडवर दररोज सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत मोठ्या आवाजात संगीत वाजवले जाते. त्यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत होत असून, नागरिकांना खिडक्या बंद ठेवाव्या लागत आहेत. मुंबईकर आधीच प्रचंड हॉर्न आणि वाहतुकीच्या आवाजाच्या समस्येला सामोरे जात आहे, याकडे लक्ष वेधत रहिवाशांनी असा युक्तिवाद केला की, मोठ्या आवाजात संगीत वाजवणे हे ध्वनिप्रदूषण कमी करण्याच्या आणि अधिक शांत, राहण्यायोग्य शहरी वातावरण निर्माण करण्याच्या प्रयत्नांच्या विरोधात आहे.

झोप घेणे अशक्य होते : समुद्रकिनारी मार्गासमोरच फ्लॅट असलेल्या कविता चावला यांनी सांगितले की, वेगाने धावणाऱ्या गाड्यांसह वाजणारे संगीत दिवसभर इमारतींमध्ये घुमत राहते, त्यामुळे झोप घेणे अशक्य होते. “आमच्या इमारतीजवळच कोस्टल रोडचा एक्झिट असल्याने आधीच वाहतूक कोंडी आणि हॉर्नचा त्रास सहन करावा लागतो. दररोज या परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहनांची ये-जा सुरू असते. आम्हाला शांतता आणि निवांतपणा हवा आहे,” अशी मागणी त्यांनी केली. अनाहिता हवालदार या ही कोस्टल रोडच्या समोरच्या परिसरात राहतात. त्या सांगतात, “अनेकांना शांत परिसर आवडतो किंवा स्वतःच्या पसंतीचे संगीत ऐकणे पसंत असते. त्यामुळे हा उपक्रम थांबवावा, अशी आमची नम्र विनंती आहे. तसेच या कामासाठी वापरली जाणारी साधने आणि निधी रस्ते, पदपथ आणि स्वच्छता यांसारख्या मूलभूत नागरी सुविधांकडे वळवावेत.”
'जय हो' गाण्याऐवजी मराठी गाणं का नाही? : या मुंबईच्या कोस्टल रोडवर गाण्याची खरंच गरज आहे का? जर गरज आहे तर एखादं मराठी गाणं का नाही निवडलं, असा प्रश्न मनसे नेते अमित ठाकरे यांनी उपस्थित केलाय. ते म्हणतात, “मुंबई महानगरपालिकेच्या कोस्टल रोडच्या ‘म्युझिकल रोड’चा प्रयोग नक्कीच नवीन आहे, काहीतरी वेगळं आहे. तंत्रज्ञानाचा असा वापर केल्याबद्दल प्रशासनाचं अभिनंदन! पण मुंबईकरांना खरोखर ‘याची’ गरज आहे का? ही मुंबईकरांची ‘बेसिक’ मागणी तरी होती का? रस्त्यांचे इतके महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित ठेवून हा कसला अट्टहास?” पुढे बोलताना अमित ठाकरे मराठी गाणं का नाही हा प्रश्न उपस्थित करतात. “खरं तर कोस्टल रोड म्हणजे रोजच्या ट्रॅफिकच्या गोंगाटातून जरा शांतता! काही दिवस हे कुतूहल म्हणून ठीक वाटेल, पण रोजच्या प्रवासासाठी हा केवळ ‘गोंगाट’ ठरणार नाही का? तसेच गाडी चालवताना ड्रायव्हरचं लक्ष विचलित होण्याची शक्यता प्रशासनाने तपासली आहे का? आणि बरं, काही वाजवायचंच होतं, तर मग आपल्या मराठी मातीतलं गाणं का नाही? आपल्या महाराष्ट्राची ओळख सांगणारं एखादं मराठमोळं गाणं का नाही? ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ सारखं आपलं राज्यगीत किंवा स्वरसाम्राज्ञी लता दीदींच्या अजरामर स्वरातील एखादं गाणं निवडलं असतं, तर अतिशय उत्तम झालं असतं!”
‘म्युझिकल रोड’ ही संकल्पना प्रथम 2007 मध्ये राबवली : पण हेच गाणं का निवडलं हा प्रश्न अनेकांनी उपस्थित केलाय. या रस्त्यावर वाजणारे संगीत ही कुठलीही विशिष्ट निवड नसून देशभक्तीची भावना जागवणारे आणि जागतिक स्तरावर ओळख असलेले गीत म्हणून ‘जय हो’ ची निवड करण्यात आली असल्याचे मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आले. हे गीत ऑस्करविजेते संगीतकार ए.आर.रहमान यांनी ‘स्लमडॉग मिलेनिअर’साठी संगीतबद्ध केले आहे. विशेष म्हणजे, ए. आर. रहमान यांनी स्वतः या रस्त्यावरून प्रवास करत व्हिडीओ तयार केला आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपला अनुभव शेअर केला आहे. मुंबईतील हा प्रयोग भारतात पहिलाच असला, तरी जगात अशा प्रकारचे प्रयोग आधी झाले आहेत. ‘म्युझिकल रोड’ ही संकल्पना प्रथम 2007 मध्ये जपानमध्ये उदयास आली. अभियंता शिझुओ शिनोडा यांनी बुलडोझरच्या चाकांमुळे निर्माण होणाऱ्या ध्वनीलहरींचे निरीक्षण केल्यानंतर हा प्रयोग प्रत्यक्षात आणला. त्यानंतर जपान, दक्षिण कोरिया, हंगेरी, संयुक्त अरब अमिराती आणि अमेरिकेत अशा प्रकारचे रस्ते उभारले गेले.
आज जपानमध्ये 30 हून अधिक असे रस्ते : 1995 मध्ये डेन्मार्कमध्ये जगातील पहिला मेलोडी रोड ‘अस्फाल्टोफोन’ या नावाने तयार करण्यात आलाय. तर 2007 मध्ये जपानमध्ये एका बुलडोझर चालकाने चुकून खाचांवरून गाडी चालवल्यानंतर संगीतासारखा आवाज निर्माण झाला आणि या संकल्पनेचा शोध लागला. आज जपानमध्ये 30 हून अधिक असे रस्ते आहेत. दक्षिण कोरिया, हंगेरी आणि संयुक्त अरब अमिराती येथेही हे तंत्रज्ञान वापरले जाते. मुंबईतील प्रकल्प हंगेरीच्या तंत्रज्ञानावर आधारित आहे. मात्र ते बहुतेक विरळ लोकवस्तीच्या भागांत आहेत. मुंबईतील हा पट्टा नरिमन पॉइंट ते वरळी या दाट लोकवस्तीच्या भागातून जातो, हीच स्थानिकांच्या आक्षेपाची मुख्य बाब आहे.
मुंबईसारख्या शहरात ‘म्युजिकल रोड’ योग्य? : कोस्टल रोडवर सुमारे 500 मीटर अंतरावर बसवलेल्या संगीत पट्ट्यांमुळे वाहनचालकांना या नव्या संकल्पनेचा अनुभव घेता येतो. मात्र, या प्रयोगात काही त्रुटी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे ही संकल्पना राबवताना काळजीपूर्वक आणि तांत्रिक तपासणीसह अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे वाहतूक अभ्यासक सांगतात. वाहतूक तज्ज्ञ विवेक पै ईटीव्ही भारतशी बोलताना सांगतात की, “समृद्धी महामार्गावर सतत आणि मोठ्या प्रवासामुळे चालकाला थकवा येतो. या रस्त्यांवर जर असे प्रयोग केले तर ते उपयुक्त ठरतील. पण मुंबईत आधीच गर्दी आहे. त्यात उजव्या बाजूच्या लेनमध्ये गाणं वाजतं. या गाण्यासाठी डाव्या बाजूच्या गाड्या अचानक जर उजव्या बाजूला आल्या तर सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नाही.“
शहरी भारतात ध्वनिप्रदूषण ही दुर्लक्षित सार्वजनिक आरोग्य समस्या : मुंबई शहर अत्यंत ध्वनी प्रदूषित शहर असल्याचं बोललं जातंय. त्यात या प्रयोगांमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असं ‘नॉईस इन इंडिया’ या पुस्तकाच्या लेखिका आणि क्वाईट इंडियाच्या संस्थापिका सविता राव यांचं म्हणणं आहे. त्या ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाल्या की, “शहरी भारतात ध्वनिप्रदूषण ही दुर्लक्षित सार्वजनिक आरोग्य समस्या बनलीय. मुंबई आधीच अत्यंत गोंगाटी शहर आहे. आपल्या रस्त्यांवर आपल्याला अधिक शांतता हवी आहे, अधिक आवाज नाही. रस्त्यावर अशा प्रकारचे संगीत केवळ अनावश्यक नाही, तर ते वाहनचालकांसाठी तसेच त्या परिसरात राहणाऱ्या आणि काम करणाऱ्यांसाठी धोकादायक ठरू शकते. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि आरोग्यासाठी ही संगीत सुविधा तातडीने बंद करण्यात यावी.” त्यामुळे मुंबईच्या म्युझिकल कोस्टल रोडबाबत शासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.

