युद्धजन्य परिस्थितीचा कांदा निर्यातीवर परिणाम; कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत
आखाती भागातील अमेरिका इराण युद्धजन्य परिस्थितीचा कांदा निर्यातीवर परिणाम झाला आहे. अनेक कंटेनर अडकले आहेत. कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आलेत.

Published : March 2, 2026 at 7:34 PM IST
|Updated : March 2, 2026 at 8:33 PM IST
नाशिक - इराणमध्ये युद्धजन्य परिस्थिती असल्यानं त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय पातळीवर दिसू लागला आहे. याचा फटका नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांसह द्राक्ष आणि केळी उत्पादकांनाही बसला आहे. शनिवारपासून दुबईत होणारी निर्यात ठप्प असल्यानं कांदा उत्पादक शेतकरी अडचणी सापडला आहे.
नाशिक जिल्ह्यात कांद्याची मोठी बाजारपेठ आहे, दरवर्षी लाखो टन कांदा या भागातून निर्यात होत असतो. अशात अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे याचा फटका नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. दुबईत होणारी निर्यात शनिवारपासून ठप्प झाली आहे. नाशिक जिल्ह्यातून कांदा, केळी आणि द्राक्षाचे कंटेनर दुबईच्या पोर्टवर उभे आहेत. तसंच काही कंटेनर हे मुंबईच्या जेएनपीए बंदरावर उभे आहेत. केंद्र सरकारनं यावर लवकर तोडगा काढावा अन्यथा शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होऊन आधीच अडचणीत सापडलेला कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या आणखी वाढू शकतात.
प्रतिक्विंटल 1500 रुपयांच्या अनुदान द्यावे - युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतीय कांद्याची निर्यात रखडली आहे. केंद्र तसंच राज्य सरकारनं तत्काळ शेतकऱ्यांना दीड हजार रुपयांचं प्रतिक्विंटल अनुदान घोषित करावं अन्यथा राज्यात तीव्र आंदोलन केलं जाईल, असं महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी म्हटलं आहे.
सरकारने तोडगा काढावा - शनिवारी रात्रीपासून दुबईचा पोर्ट शटडाऊन लोडमध्ये आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यातील बहुतांश कंटेनर ज्यात कांदा द्राक्ष केळी आहेत. विशेष म्हणजे दुबई मधून बहुतांश कंटेनर वेगवेगळ्या देशात जात असतात, त्यात ओमान, कतार या देशांचा समावेश आहे. सर्व निर्यात ठप्प झाली आहे. आम्ही असोसिएशनच्या माध्यमातून अपेडा आणि कॉमर्स विभागाला विनंती केली आहे की यातून काहीतरी मार्ग काढावा. त्यांनी माल काढून देण्याचं आश्वासन दिलं आहे. सध्या वेट अँड वॉच मोडमध्ये आहोत असं निर्यादर संघटनेचे उपाध्यक्ष विकास सिंग यांनी म्हटलं आहे.
मंत्री भुजबळांचे मुख्यमंत्र्यांना पत्र - महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचे कांदा हे एक नगदी पीक आहे. कांद्याच्या भावाचा परिणाम हा शेतकऱ्यांच्या जीवन मरणाशी निगडीत असल्यानं नेहमीच त्याचे राजकीय पडसाद दिसून येतात. वेळोवेळी कांद्याच्या किमान निर्यात दरातील वाढीचा किंवा निर्यातबंदीचा कांदा निर्यातीवर विपरीत परिणाम होत असतो. देशातील एकूण उत्पादनाच्या 60 टक्के कांदा एकट्या महाराष्ट्रात पिकतो तर राज्याच्या एकूण उत्पादनाच्या तुलनेत 60 टक्के कांद्याचे उत्पादन नाशिक जिल्ह्यात होते. नाशिक जिल्ह्यासह राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या अत्यंत बिकट परिस्थितीचा सामना करत आहेत. जानेवारी महिन्यापासून कांद्याचे बाजारभाव प्रतिक्विंटल सुमारे 1000 रुपयांच्या आसपास स्थिरावलेले होते. कालपासून तर अनेक बाजार समित्यांमध्ये प्रतिक्विंटल 500 रुपये आणि त्यापेक्षाही कमी दर मिळत असल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
हेही वाचा...

