ETV Bharat / state

इन्स्टावरील रिल पडली महागात! संरक्षित डेव्हिल रे माशाची बेकायदेशीर विक्री उघड; वन विभागानं केली कारवाई

इन्स्टाग्रामवरून दुर्मीळ मासे विक्री करणाऱ्याला वनविभागानं अटक केली आहे. आरोपीनं व्हिडिओ हा सोशल मीडियावर पोस्ट केला होता.

Shortfin Devil ray mobula kuhlii
दुर्मीळ मासे विक्री करणाऱ्याला अटक (Source- ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : February 25, 2026 at 8:09 PM IST

|

Updated : February 25, 2026 at 8:34 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

कोल्हापूर- समुद्रातील दुर्मीळ जीव विक्रीसाठी मासे मार्केटमध्ये आणल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापुरात उघडकीस आला आहे. कोल्हापूरच्या फुलेवाडी रिंग रोडवरील फ्रेंडशिप फिश कंपनी या दुकानामध्ये वन विभागाने छापा टाकून शॉर्टफिन डेव्हिल रे (Shortfin Devil ray mobula kuhlii) नावाचा संरक्षित मासा जप्त केला आहे. हा मृत मासा विक्रीला ठेवलेला होता.

वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत गुन्हा दाखल करून संशयित विक्रेता सुनिल विनोद सातपुते याच्यावर वनविभागानं कारवाई केली आहे. ही कारवाई करवीर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.

दुर्मीळ मासे विक्री करणाऱ्याला अटक (Source- ETV Bharat Reporter)

25 फेब्रुवारी 2026 रोजी कोल्हापुरातील फुलेवाडी परिसरात असणाऱ्या फ्रेंडशिप फिश कंपनी या दुकानात समुद्रातील दुर्मिळ असा शॉर्टफिन डेव्हिल रे (Shortfin Devil ray mobula kuhlii) विक्रीसाठी ठेवणार असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. 130 किलो वजन असणारा हा मासा दुर्मीळ असल्यानं लोकांना फक्त बघण्यासाठी दुपारी एक वाजेपर्यंत दुकानात ठेवला जाणार आणि त्यानंतर 130 रुपये किलो दरानं त्या माशाची विक्रीदेखील केली जाणार असल्याचं व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं होतं.

यानंतर मिळालेल्या माहितीवरून करवीर परिमंडळ वनपरिक्षेत्रातील वनक्षेत्रपाल आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या सहभागानं फुलेवाडी येथील दुकानावर छापा टाकण्यात आला. यावेळी एक मृत (पाकट) मासा विक्रीसाठी साठवलेला आढळला. वनरक्षक करवीर यांनी WL 04/2026 गुन्हा नोंदवला आहे. संशयित आरोपी हा सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात असणाऱ्या येडेमच्छींद्र येथील रहिवासी आहे.

पुढील चौकशी सुरू; कठोर कारवाई होणार..."स्पाईन टेल डेव्हिल रे (Shortfin Devil ray mobula kuhlii) ही अति धोक्यातील प्रजाती असल्यानं कायद्यानं संरक्षित आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल. त्यासाठी संशयित सुनिल विनोद सातपुते याच्याकडून चौकशी करुन याबाबत अधिक माहिती घेतली जात आहे," असे वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे यांनी सांगितलं आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपवनसंरक्षक कोल्हापूर धैर्यशील पाटील आणि सहाय्यक वनसंरक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी नंदकुमार नलवडे, वनपाल सागर कोळी, वनरक्षक ओंकार भोसले, विकास घोलप, महादेव कुंभार, विदेश तांबारे, कंत्राटी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष वाळवेकर आणि मानद वन्यजीव रक्षक रमण कुलकर्णी हे अधिक तपास करीत आहेत.

Last Updated : February 25, 2026 at 8:34 PM IST