ETV Bharat / state

‘कॉकरोच जनता पार्टी’ चर्चेत असताना पुण्यात झुरळांसाठी भारतातील पहिले डीएनए बारकोड ग्रंथालय विकसित

भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण (ZSI) च्या पश्चिम प्रादेशिक केंद्रानं भारतातील झुरळांसाठी देशातील पहिलं आणि सर्वात मोठं डीएनए बारकोड ग्रंथालय (DNA Barcode Reference Library) विकसित केलं आहे.

Indias First DNA Barcode library
झुरळांसाठी भारतातील पहिले डीएनए बारकोड ग्रंथालय विकसित (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 28, 2026 at 2:06 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

पुणे : गेल्या काही दिवसांपासून देशभरात सोशल मीडियावर सुरू करण्यात असलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ची (Cockroach Janata Party) जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण (ZSI) च्या पश्चिम प्रादेशिक केंद्राने झुरळांसाठी भारतातील सर्वात मोठं आणि पहिलं डीएनए बारकोड ग्रंथालय विकसित केलं आहे. हा अभ्यास ZSI च्या संशोधक शबनम अन्सारी, के. पी. दिनेश, चेन्नई ZSI चे एम. सेनराज आणि पुण्यातील प्रा. रामकृष्ण मोरे कॉलेजच्या रश्मी मोरे यांनी केला आहे.

भारतातील पहिले डीएनए बारकोड ग्रंथालय विकसित : झुरळ म्हटलं की, बहुतेकांच्या मनात स्वयंपाकघरातील उपद्रवी कीटकाची प्रतिमा उभी राहते. मात्र, प्रत्यक्षात झुरळ हे पृथ्वीवरील अत्यंत वैविध्यपूर्ण आणि परिसंस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि कीटकांच्या सर्वात प्राचीन गटांपैकी एक आहे. जंगलातील पालापाचोळा, गुहा आणि अजूनही विज्ञानाला अज्ञात असलेल्या ठिकाणी अनेक झुरळे राहतात. झुरळे सेंद्रिय पदार्थांचे विघटन करून पोषक द्रव्यांचा पुनर्वापर करतात आणि अन्नसाखळी टिकवून ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळं झुरळांना केवळ उपद्रवी म्हणून पाहणं ही मोठी चूक असेल. भारतीय जैवविविधतेच्या अभ्यासात एक ऐतिहासिक टप्पा गाठत भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण (ZSI) चे पश्चिम प्रादेशिक केंद्र येथील शास्त्रज्ञांनी भारतातील झुरळांसाठी पहिले आणि सर्वात मोठे डीएनए बारकोड संदर्भ ग्रंथालय विकसित केले आहे. या अभ्यासात 100 हून अधिक डीएनए बारकोड तयार करण्यात आले असून, त्यात जगात इतरत्र न आढळणाऱ्या अनेक स्थानिक भारतीय वंशांच्या झुरळांचा समावेश आहे.

पुण्यात झुरळांसाठी भारतातील पहिले डीएनए बारकोड ग्रंथालय विकसित (ETV Bharat Reporter)

बारकोड स्कॅन केल्यानंतर माहिती समोर येणार : संशोधक शबनम अन्सारी यांनी सांगितलं की, “डीएनए बारकोड म्हणजे एखाद्या वस्तूवरील बारकोडप्रमाणेच कार्य करणारी वैज्ञानिक ओळख प्रणाली आहे. सुपर मार्केटमध्ये बारकोड स्कॅन केल्यानंतर जशी वस्तूची माहिती समोर येते, त्याचप्रमाणे प्रत्येक प्रजातीची अचूक ओळख डीएनए बारकोडमधून मिळते. कारण प्रत्येक प्रजातीची एक वैशिष्ट्य आणि एक ओळख आहे."

Indias First DNA Barcode library for Cockroaches
झुरळांसाठी डीएनए बारकोड ग्रंथालय विकसित (ETV Bharat Reporter)

भारतात सध्या 191 झुरळ प्रजातींची नोंद : त्या पुढे म्हणाल्या, “आम्ही 2019 पासून झुरळांच्या डीएनए बारकोडिंगचे काम सुरू केलं. भारतात सध्या 191 झुरळ प्रजातींची नोंद आहे. त्यापैकी 119 प्रजाती म्हणजेच सुमारे 60 टक्के प्रजाती या भारतातच आढळणाऱ्या स्थानिक प्रजाती आहेत. ते जगात दुसऱ्या ठिकाणी कुठेही सापडत नाही. म्हणून त्याचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. अभ्यासादरम्यान नोंद झालेल्या प्रजातींपेक्षा अधिक प्रजाती अद्याप लपलेल्या असल्याचंही स्पष्ट झालं आहे. त्यावर अभ्यास केला पाहिजे" या संशोधनातून झुरळांची उत्क्रांती जुरासिक काळापासून सुरू असल्याचेही समोर आलं आहे. जगातील केवळ एक टक्क्यांपेक्षा कमी झुरळे ही उपद्रवी कीटकांच्या श्रेणीत येतात, तर उर्वरित 99 टक्के प्रजाती निसर्गात राहतात. आपल्याकडं झुरळ बाबत जास्त अभ्यास केला जात नाही मात्र आम्ही अभ्यासातून झुरळाबाबत अनेक गोष्टी समोर मांडल्या आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Indias First DNA Barcode library for Cockroaches
झुरळांसाठी डीएनए बारकोड ग्रंथालय (ETV Bharat Reporter)

भारतीय झुरळांमधील छुपी विविधता समोर आली : संस्थेचे प्रमुख डॉ. बसुदेव त्रिपाठी म्हणाले, “या संशोधनामुळं भारतीय झुरळांमधील प्रचंड छुपी विविधता समोर आली आहे. आण्विक तंत्रज्ञानाच्या मदतीने पूर्वी दुर्लक्षित राहिलेले उत्क्रांतीचे वंश उघडकीस आले आहेत. झुरळांच्या विविधतेबाबतची माहिती अद्याप मर्यादित आहे. झुरळांविषयी असलेले गैरसमज दूर करण्यासाठी हे संशोधन महत्त्वाचे ठरेल.” ते पुढे म्हणाले, “उपद्रवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कीटकांचा खरा चेहरा म्हणजे परिसंस्थेतील महत्त्वाचे घटक, संवेदनशील प्रजाती आणि उत्क्रांतीच्या इतिहासाचे साक्षीदार असा आहे. झुरळांची समृद्ध आणि अद्याप न उलगडलेली जैवविविधता प्रकाशझोतात आली आहे, जी भविष्यातील संशोधन आणि संवर्धनासाठी मार्गदर्शक ठरेल आणि विविध संशोधकांना येत्या काळात यातून संशोधन करता येणार आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.

Indias First DNA Barcode library for Cockroaches
झुरळांसाठी डीएनए बारकोड ग्रंथालय (ETV Bharat Reporter)
Indias First DNA Barcode library for Cockroaches
झुरळांसाठी डीएनए बारकोड ग्रंथालय (ETV Bharat Reporter)

हेही वाचा -

  1. तुमच्या घरात झुरळांचा उपद्रव झालाय? 'या' पाच रासायनिक स्प्रेमुळं मिळणार झुरळांपासून मु्क्ती - How to get rid of cockroaches
  2. Video एम्सकडून रुग्णाला देण्यात येणाऱ्या जेवणात आढळले झुरळ, सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल
  3. 'झुरळ' करणार विमानाच्या इंजिनमधील बिघाड दुरुस्त, जाणून घ्या...