ETV Bharat / state

विद्यार्थ्यांच्या हातात आता ‘जीवन वाचवण्याचं कौशल्य’; शाळांमध्ये विद्यार्थ्यांसह पालकांनाही CPR प्रशिक्षण

भूलतज्ज्ञ संघटनेनं विद्यार्थ्यांसह पालकांना 'CPR' प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सुरू केलाय. याबाबत 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी धनंजय टिपले यांनी केलेला ही विशेष बातमी खास आमच्या वाचकांसाठी. .

CPR Training
शाळांमध्ये विद्यार्थ्यांसह पालकांनाही CPR प्रशिक्षण (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : September 3, 2026 at 12:08 PM IST

3 Min Read
Choose ETV Bharat

नागपूर : एखादी व्यक्ती अचानक बेशुद्ध पडली, प्रतिसाद देत नसेल आणि तिचा श्वास सामान्यपणे सुरू नसेल, तर तातडीनं आपत्कालीन वैद्यकीय मदत बोलावणं अत्यंत आवश्यक आहे. मात्र, वैद्यकीय मदत पोहोचेपर्यंत प्रशिक्षित व्यक्तीनं सीपीआर (CPR) प्रक्रिया सुरू करणंही तितकेच महत्त्वाचं आहे. दुर्दैवानं, आपल्या देशात सीपीआरचं महत्त्व अजूनही सर्वसामान्य नागरिकांना कळलं नाही. किंबहुना या विषयाबाबत जनजागृती करण्यात शासन आणि प्रशासन कमी पडत असल्याचं चित्र आहे. एखाद्या व्यक्तीचं प्राण वाचवण्यासाठी प्रत्यक्षात वैद्यकीय मदत पोहोचेपर्यंत सीपीआर सुरू ठेवल्यास त्या व्यक्तीचा जीव वाचण्याची शक्यता वाढते.

CPR Training for School Students
CPR प्रशिक्षण (ETV Bharat Reporter)

विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनाही सीपीआरचं प्रशिक्षण : आपल्याकडं सीपीआर देण्यासाठी प्रशिक्षित लोकांची संख्या फार कमी आहे. हे तंत्र प्रामुख्यानं वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींनाच अवगत असल्याचा सर्वसाधारण समज आहे. त्यामुळंच हृदय विकाराच्या तीव्र झटक्यानं मृत्यू होणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यावर प्रभावी तोडगा काढण्याच्या उद्देशानं 'इंडियन सोसायटी ऑफ अनेस्थेसियॉलॉजिस्ट्स'च्या डॉक्टरांनी शाळकरी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनाही सीपीआरचं प्रशिक्षण देण्याची मोहीम हाती घेतली आहे.

माहिती देताना शिक्षक (ETV Bharat Reporter)

प्रशिक्षित विद्यार्थी मदत करू शकतो : या मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांनी सीपीआरचं कौशल्य आत्मसात केल्यास, ते अचानक हृदयक्रिया बंद पडलेल्या व्यक्तीचे प्राण वाचवण्यात महत्त्वाचं योगदान देऊ शकतात. शाळेत एखादा विद्यार्थी, शिक्षक किंवा कर्मचारी अचानक कोसळल्यास, क्रीडांगणावर एखाद्याला आपत्कालीन हृदयविषयक समस्या उद्भवल्यास किंवा सार्वजनिक ठिकाणी अशी घटना घडल्यास प्रशिक्षित विद्यार्थी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून तातडीनं मदत करू शकतो.

CPR Training for School Students
शाळकरी विद्यार्थ्यांना CPR प्रशिक्षण देण्याचा उपक्रम (ETV Bharat Reporter)

भूलतज्ज्ञ संघटनेचा CPR प्रशिक्षणासाठी पुढाकार : जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालानुसार, 2022 मध्ये हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारानं संपूर्ण जगभरात 19.8 दशलक्ष मृत्यू झाले आहेत. म्हणजे जगातील सुमारे 32 टक्के मृत्यू हे हृदय विकाराच्या आजारानं झाले आहेत. भारतातही हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार मोठे आव्हान बनले आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांना हृदयविषयक आपत्कालीन परिस्थितीत प्राथमिक मदत करता यावी, यासाठी भूलतज्ज्ञांच्या संघटनेने सीपीआर प्रशिक्षणाचा उपक्रम सुरू केलाय. या उपक्रमामुळं विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञानच नव्हे, तर गरजेच्या वेळी एखाद्याचा जीव वाचवण्याचं कौशल्यही मिळणार आहे. विशेष म्हणजे, सीपीआरचं प्रशिक्षण केवळ काही विद्यार्थ्यांपुरतं मर्यादित न ठेवता प्रत्येक शाळेत मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना हे कौशल्य शिकवलं, तर समाजात हजारो प्रशिक्षित ‘फर्स्ट रिस्पॉन्डर्स’ तयार होऊ शकतात.

CPR Training for School Students
विद्यार्थ्यांना CPR प्रशिक्षण (ETV Bharat Reporter)

शाळांमध्ये CPR प्रशिक्षण का आवश्यक? : शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सीपीआरचे प्राथमिक प्रशिक्षण दिल्यास त्याचा फायदा केवळ शाळेपुरता मर्यादित राहणार नाही. विद्यार्थी हे प्रशिक्षण घरात, कुटुंबात आणि समाजातही देऊ शकतात. दुर्दैवानं घरातील एखाद्या सदस्याचं अचानक हृदयक्रिया बंद पडण्याची घटना घडली किंवा रस्त्यावर, मैदानात, कार्यालयात अथवा सार्वजनिक ठिकाणी अशी आपत्कालीन घटना घडू शकते. अशावेळी प्रशिक्षित विद्यार्थी सीपीआर देऊन त्या व्यक्तीचा जीव वाचवू शकतात. विशेष म्हणजे, अशा घटनांमध्ये रुग्णाजवळ असलेली व्यक्तीच सर्वप्रथम मदत करू शकते. त्यामुळं डॉक्टर किंवा रुग्णवाहिका पोहोचेपर्यंतचा वेळ वाया न घालवता CPR सुरू करण्याचं प्रशिक्षण समाजातील ‘पहिल्या प्रतिसाद देणाऱ्यांची’ संख्या मोठ्या प्रमाणात वाढवू शकतं.

CPR Training for School Students
शाळांमध्ये CPR प्रशिक्षण (ETV Bharat Reporter)

'हा' गैरसमज दूर करणं आवश्यक : सीपीआर म्हणजे केवळ डॉक्टर किंवा वैद्यकीय कर्मचाऱ्यांनीच करायची प्रक्रिया, असा अनेकांचा समज आहे. मात्र, आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाजवळ सर्वप्रथम कोण पोहोचेल, हे सांगता येत नाही. त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांसोबतच शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही सीपीआरचं मूलभूत प्रशिक्षण देणं महत्त्वाचं ठरतं.

हृदयविकाराचा झटका आणि Cardiac Arrest यांतील फरक : हृदयविकाराचा झटका म्हणजे हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीत अडथळा निर्माण होणं. तर Cardiac Arrest म्हणजे हृदयाची पंपिंग क्रिया अचानक थांबणं. हृदयविकाराचा झटका काही वेळा Cardiac Arrest ला कारणीभूत ठरू शकतो, मात्र या दोन्ही परिस्थिती समान नाहीत. Cardiac Arrest झाल्यास व्यक्ती अचानक बेशुद्ध पडू शकते आणि तिचा सामान्य श्वास थांबू शकतो. अशावेळी तातडीने आपत्कालीन वैद्यकीय मदत मागवणं आणि आणि CPR सुरू करणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं.

‘गोल्डन टाइम’ म्हणजे जीवन-मरणाचा फरक : Cardiac Arrest च्या परिस्थितीत वेळेला अत्यंत महत्त्व असते. सीपीआर सुरू करण्यात होणारा विलंब रुग्णाच्या जगण्याची शक्यता कमी करू शकतो. त्यामुळं वैद्यकीय मदत पोहोचेपर्यंत तातडीनं CPR दिल्यास जगण्याची शक्यता किमान दोन ते तीन पटींनी वाढू शकते. म्हणूनच रुग्णालयात पोहोचेपर्यंतचा प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असतो. ‘गोल्डन अवर’ हा शब्द अनेक आपत्कालीन परिस्थितींमध्ये वापरला जातो.

हेही वाचा -

  1. डॉक्टरांनी 11 वर्षाच्या मुलाला 100 मिनिटांपेक्षा अधिक वेळ दिला सीपीआर; मृत्यूच्या दाढेतून आणलं बाहेर
  2. 9 महिन्यांच्या गर्भवती महिलेवर एकाच दिवशी दोन शस्त्रक्रिया, सीपीआर रुग्णालयामुळे मातेसह बाळाला मिळालं जीवनदान
  3. Woman Gives Mouth CPR: पतीला आला हृदयविकाराचा झटका, पत्नीने तोंडाने श्वास देत वाचवला जीव