प्रतिस्पर्धेतून नव्हे, परस्पर सहकार्यातून भारत मेरिटाईम क्षेत्रात अव्वल स्थान मिळवणार - अमित शाह
अमित शाह यांनी भारताच्या सागरी क्षेत्रातील प्रगती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोनावर प्रकाश टाकला.

Published : October 27, 2025 at 2:39 PM IST
मुंबई : "भारतीय जलव्यापार क्षेत्राला 5 हजार वर्षांहून अधिक काळाचा समृद्ध इतिहास आहे. प्राचीन काळापासून भारतीय समुद्री परंपरा जागतिक व्यापार साखळीचा केंद्रबिंदू राहिली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत नव्या सागरी इतिहासाची निर्मिती करत आहे. प्रतिस्पर्धेतून नव्हे, परस्पर सहकार्यातून भारत मेरिटाइम क्षेत्रात अव्वल स्थान मिळवण्यासाठी सज्ज आहे," असं प्रतिपादन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी सोमवारी (27 ऑक्टोबर) व्यक्त केलं. गोरेगावच्या नेस्को संकुलात 'इंडिया मेरिटाइम वीक 2025' या जागतिक सागरी मेळाव्यात ते बोलत होते.
नव्या सागरी इतिहासाची निर्मिती : अमित शाह यांनी भारताच्या सागरी क्षेत्रातील प्रगती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोनावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, "आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत नव्या सागरी इतिहासाची निर्मिती करत आहे. 'इंडिया मेरिटाइम वीक 2025' मध्ये 100 हून अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले असून, यामुळं भारताच्या सागरी परंपरेचे जागतिक महत्त्व आणि क्षेत्रीय सामर्थ्य अधोरेखित झालं आहे. 2047 पर्यंत भारताला मेरिटाइम क्षेत्रात अग्रेसर बनवण्यासाठी ही परिषद महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यात 10 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार होण्याची अपेक्षा आहे."

मोदींचे मेरिटाइम व्हिजन : सुरक्षा, स्थिरता, आत्मनिर्भरता : अमित शाह म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मेरिटाइम व्हिजन हे सुरक्षा, स्थिरता आणि आत्मनिर्भरता या त्रिसूत्रीवर आधारित आहे. शिप बिल्डिंग क्षेत्रात भारताला जगातील पहिल्या पाच देशांमध्ये स्थान मिळवायचं आहे. यासाठी मेगा आणि डीप पोर्ट प्रकल्पांची उभारणी केली जात आहे. पोर्ट ट्रान्सपोर्ट पूर्णतः डिजिटल झाले असून, भारत-मध्य पूर्व-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर, ईस्टर्न मेरिटाइम कॉरिडॉर आणि नॉर्थ-साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर यासारख्या कनेक्टिव्हिटी प्रकल्पांनी बंदरांना जोडले जात आहे. मुंबईजवळील वाढवण बंदर कार्यान्वित झाल्यावर पहिल्याच दिवशी जगातील टॉप 10 बंदरांमध्ये स्थान मिळवेल. याशिवाय, देशात 106 नवे जलमार्ग विकसित होत आहेत. तसंच हरित, समृद्ध आणि सशक्त मेरिटाइम क्षेत्राच्या माध्यमातून भारताला शक्तीशाली बनवण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे," असं आवाहन अमित शाह यांनी केलं.
वाढवण बंदरामुळं महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला बूस्टर - मुख्यमंत्री : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या आर्थिक राजधानीच्या स्थानाला बळकटी देण्यात मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि जेएनपीटी बंदरांचा महत्त्वाचा वाटा असल्याचं सांगितलं. वाढवण बंदरामुळं भारताची व्यापारी क्षमता अनेक पटींनी वाढणार असून, हे बंदर जगातील पहिल्या पाच बंदरांमध्ये स्थान मिळवेल. यामुळं महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. तसंच, पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रानं जाहीर केलेल्या शिप बिल्डिंग धोरणामुळं या क्षेत्रात देशाला आणि महाराष्ट्राला मोठी संधी उपलब्ध होणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

'इंडिया मेरिटाइम वीक 2025' मध्ये नेमकं काय आहे? : 27 ते 31 ऑक्टोबर 2025 या कालावधीत गोरेगावच्या नेस्को संकुलात 'इंडिया मेरिटाइम वीक 2025' या जागतिक स्तरावरील सागरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. 'महासागरांची एकजूट, समान सागरी दृष्टिकोन' या संकल्पनेवर आधारित या मेळाव्यात भारताच्या सागरी धोरणाचा आणि नील अर्थव्यवस्थेतील योगदानाचा आढावा घेतला जाईल. यात 85 हून अधिक देशांचे 1 लाखाहून अधिक प्रतिनिधी, जागतिक सागरी उद्योगातील दिग्गज, आंतरराष्ट्रीय संस्था आणि धोरण तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. 11 देशांचे परराष्ट्र मंत्री, विविध राज्यांचे मंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल उपस्थित राहणार आहेत.

29 ऑक्टोबरला पंतप्रधान मोदी सहभागी होणार : 29 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी या सागरी मेळाव्यातून देशवासीयांना आणि सागरी क्षेत्रातील मान्यवरांना संबोधित करतील. 350 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय वक्ते, 400 हून अधिक प्रदर्शक या मेळाव्यात असतील. या मेळाव्यात 10 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीसाठी 600 पेक्षा अधिक सामंजस्य करार होणार आहेत. नॉर्वे, नेदरलँड्स, डेन्मार्क आणि स्वीडन यांच्यासह 11 भारतीय राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची विशेष सत्रे आयोजित केली जाणार आहेत.
हेही वाचा :

