ETV Bharat / state

साखरेचे भाव कमी होणार? व्यापाऱ्यांकडील साखर साठ्यांवर मर्यादा, जाणकारांनी दिली 'ही' माहिती

येत्या काही दिवसांत साखरेचे भाव कमी होतील, असा अंदाज कागल येथील छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.

Sugar Prices Drop in India
साखरेचे दर स्थिरावणार (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : August 25, 2026 at 6:10 PM IST

|

Updated : August 26, 2026 at 2:52 PM IST

4 Min Read
Choose ETV Bharat

कोल्हापूर : देशात साखरेचा मुबलक साठा असूनही गेल्या आठवड्यात साखरेच्या दरानं उच्चांक गाठला. यामुळे सर्वसामान्यांचं आर्थिक बजेट कोलमडणार की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, केंद्र सरकारनं घेतलेल्या काही निर्णयांनंतर येत्या काही दिवसांत साखरेचे भाव स्थिरावतील, असं मत साखर उद्योगातील तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. केंद्र सरकारकडून केली जाणारी कच्ची साखरेची आयात, व्यापाऱ्यांकडील साखर साठ्यांवरील मर्यादा आणि खासगी व सहकारी साखर कारखान्यांमधील साठ्यांची तपासणी यामुळे साखरेच्या दरातील अवास्तव वाढ रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याचा थेट परिणाम साखरेच्या बाजारभावावर होणार असून, येत्या काही दिवसांत साखर स्वस्त होऊन भाव स्थिरावेल, असा अंदाज कागल येथील छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आणि साखर उद्योगातील तज्ज्ञ जितेंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.

देशाची साखरेची गरज 270 लाख टन : तीन महिन्यांपूर्वी साखरेचा प्रति क्विंटल दर 3 हजार 800 रुपये होता. तो गेल्या चार दिवसांत अचानक उसळी घेत ७ हजारांच्या पार पोहोचला. ऐन सणासुदीच्या दिवसांत साखरेची झालेली ही भाववाढ कोणालाही परवडणारी नाही. यामुळे साखरेचे भाव कमी व्हावेत, यासाठी केंद्र सरकारनं जाणीवपूर्वक प्रयत्न केले. साखरेच्या दरात वाढ झाल्यानं चहा, मिठाई, पेढे यांसारख्या गोड पदार्थांच्या विक्री दरातही वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून साखरेच्या दरांमध्ये घट होत असल्याचं चित्र बाजारपेठेत पाहायला मिळत आहे. यंदाच्या हंगामात देशांतर्गत 280 लाख टन साखरेचे उत्पादन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, तर देशाची साखरेची गरज 270 लाख टन इतकी असल्यानं यंदाही दहा लाख टन साखर शिल्लक राहील. असं असताना, साठा आणि भाववाढ यांच्यातील तफावत दूर करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असल्याचं जितेंद्र चव्हाण यांनी सांगितले.

माहिती देताना श्री छत्रपती शाहू साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण (ETV Bharat)

येत्या काळात साखरेचे दर कमी होणार : श्रावण महिन्यात प्रति क्विंटल 7 हजारांच्या पार गेलेला साखरेचा दर आज कोल्हापुरात ६ हजारांच्या आसपास पोहोचला आहे. किरकोळ बाजारातही साखरेचा दर 55 रुपयांपर्यंत असल्याने, भविष्यकाळात साखरेचे दर आणखी कमी होणार असल्याचं या उद्योगातील जाणकार सांगतात. बाजारातील दरवाढीसाठी साखर कारखाने जबाबदार नसून, मागणी व पुरवठ्यातील तफावत आणि व्यापाऱ्यांकडून होणारी साठेबाजी यामुळे याचा थेट परिणाम साखरेच्या बाजारावर होतो. आता केंद्र सरकारनं घातलेल्या नियमांच्या अधीन राहूनच साखर विक्री करावी लागणार आहे. यामुळे साखरेच्या दरात झालेला फुगवटा कमी होणार असून, परिणामी घाऊक बाजारातील साखरेचे दर खाली येणार आहेत.

30 लाख टन साखर इथेनॉल निर्मितीकडे : खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांमध्ये तीन प्रकारे इथेनॉल निर्मिती केली जाते. उसाचा रस तसेच साखर निर्मिती प्रक्रियेदरम्यान 'बी हेवी मोलासेस' (B-Heavy Molasses) आणि 'सी हेवी मोलासेस' (C-Heavy Molasses) पासून इथेनॉल तयार केले जाते. केंद्र सरकारनं पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या गाळप हंगामाच्या सुरुवातीला 53 लाख टन साखरेचा साठा शिल्लक असेल असा अंदाज आल्यामुळे, सुरुवातीला 15 लाख टन साखर निर्यात करण्याचा निर्णय घेतला गेला. पुढे यात पाच लाख टनांची वाढ करण्यात आली, तर 30 लाख टन साखर इथेनॉल निर्मितीसाठी वापरण्यात आली. मात्र, इथेनॉल निर्मितीमुळे साखरेचे दर वाढले, हे मत संयुक्तिक नाही. राज्यातील प्रत्येक खासगी आणि सहकारी कारखान्याने मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणूक करून उपपदार्थ निर्मितीचे प्रकल्प राबवले असून, यामध्ये इथेनॉल निर्मितीचाही समावेश असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं.

Sugar Prices Drop in India
साखरेची सद्यस्थिती (ETV Bharat)

साखरेच्या दरवाढीचा मिठाई आणि चहावर परिणाम ? : साखरेच्या दरवाढीचा थेट परिणाम मिठाई आणि चहा विक्री करणाऱ्या दुकानांवर होत असतो मात्र कोल्हापुरातील प्रसिद्ध जसवंत स्वीट या दुकानाचे मॅनेजर हरीश चौधरी यांनी सांगितलं की गेल्या चार ते पाच दिवसापासून साखरेच्या दरात उच्चांकी वाढ झालेली आहे परंतु आम्ही आमच्याकडे मिळणाऱ्या मिठाईच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही. येत्या काही काळात साखरेचे भाव कमी होतील याचा कोणताही परिणाम आमच्याकडे येणाऱ्या ग्राहकांवर होणार नाही याची आम्ही काळजी घेतली आहे. मिठाई बनवण्यासाठी प्राथमिक स्तरावर साखरेची नितांत गरज असते गेल्या तीन महिन्यात 45 रुपये असणारी साखर आज 70 ते 75 रुपये किलो दराने विकली जात आहे मात्र व्यवस्थापनाने मिठाईच्या दरात कोणतीही दरवाढ न करण्याचा निर्णय घेतला असल्याचं चौधरी यांनी ईटीव्ही भारत शी बोलताना सांगितले.

चहाच्या विक्री दरात एक सप्टेंबर पासून होणार वाढ : साखरेचा वापर करून सर्वाधिक बनणारा पदार्थ आणि प्रत्येकाला दिवसाची सुरुवात करण्यासाठी लागणारं पेय म्हणजे चहा. साखरेच्या दरात वाढ झाल्यामुळे दररोज चहा घेणाऱ्या चहाप्रेमींमध्ये दर वाढेल का ? अशी चिंता व्यक्त केली जात आहे. कोल्हापुरातील शाहू टोलनाका परिसरात गेली आठ वर्षांपासून चहा विक्री करणारे अशोक गायकवाड सांगतात, "आत्तापर्यंत साखरेच्या किमतीत उच्चांकित पद्धतीनं वाढ झालेली आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून ग्राहकांची चहा घेण्यासाठी होणारी गर्दी अंशतः कमी झाली. मात्र ग्राहकांना चहा गरजेचा असल्यामुळे आतापर्यंत आम्ही प्रत्येकी चहाच्या कपाला दहा रुपये प्रमाणं दर घेतो. आता साखरेचा दर वाढल्यामुळे एक सप्टेंबरपासून कोल्हापुरात 13 रुपये प्रतीकप चहा विक्री करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती चहा विक्रेते अशोक गायकवाड यांनी दिली.

Sugar Prices Drop in India
मिठाईचे दर (ETV Bharat)

कोल्हापुरातील मिठाईचे दर खालील प्रमाणे :

जिलेबी प्रति किलो : 280

ड्रायफूट मिठाई प्रति किलो : 1800

मलाई मिक्स मिठाई : 800

गुलाबजामून रेगुलर : 400

ड्राय गुलाब जामून : 440

अंगूरी गुलाब जामून : 440

काला जामुन : 460

रसगुल्ला : 320

रबडी : 440

रसमलाई : 520

काय आहे साखरेची सद्यस्थिती :

  • ऑक्टोंबर 2025 अखेर सरकारने जाहीर केलेला साखरेचा साठा : 47 लाख टन
  • हंगाम 2025-26 मधील उत्पादित झालेली साखर : 291 लाख टन
  • एकुण शिल्लक साखर : 338 लाख टन
  • हंगाम 2025-26 मध्ये निर्यात झालेला साखर : 8 लाख टन
  • 1 नोव्हेंबर ते 30 सप्टेंबर पर्यंत सरकारनं साखर विक्री करण्यास दिलेली परवानगी : 247 लाख टन
  • 30 ऑगस्ट पर्यंत शिल्लक साखर साठा : 83 लाख टन
  • अन्न नागरी पुरवठा मंत्रालयाच्या दाव्यानुसार सप्टेंबर अखेर शिल्लक साखर साठा : 35 लाख टन

माहिती स्रोत: अन्न व नागरी पुरवठा मंत्रालय, भारत सरकार.

हेही वाचाः

  1. राम रहीमची 17 व्यांदा तुरुंगातून सुटका; 21 दिवसांच्या पॅरोलदरम्यान सिरसा येथील डेरा सच्चा सौदा आश्रमात राहणार
  2. अमरावतीतील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आगीत तीन बालकांचा मृत्यू, आतापर्यंत कुठे कुठे घडल्या आगीच्या घटना; जाणून घ्या घटनाक्रम
Last Updated : August 26, 2026 at 2:52 PM IST