ETV Bharat / state

एमआयएम रॅलीमध्ये इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला, सत्ताधारी पक्षाचे काम असल्याचा आरोप

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Imtiaz Jaleel Car Attack
इम्तियाज जलील यांच्या कारवर हल्ला (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 7, 2026 at 10:41 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिका निवडणूक प्रचार सुरू असताना एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पक्षानं उमेदवारी नाकारलेल्या उमेदवारांनी हल्ला केल्याचा आरोप होत असताना सदरील कृत्य सत्ताधारी पक्षाच्या लोकांच्या सांगण्यावरून केल्याचा आरोप जलील यांनी केला. "आमची पदयात्रा थांबवण्यासाठी केलेला हा प्रयत्न असून आम्ही थांबणार नाही. त्या ठिकाणचे सीसीटीव्ही पाहून पोलिसांनी कारवाई करावी. आम्ही शांततेत निवडणुका पार पाडाव्या यासाठी आग्रही आहोत, मात्र कोणी जर मुद्दाम असं करत असेल तर आम्हीही उत्तर देऊ शकतो," असा इशारा जलील यांनी दिलाय.



दुपारी झाला हल्ला : महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार जोर धरत असताना उमेदवारी नाकारलेल्या उमेदवारांची नाराजी कमी होताना दिसत नाही. एमआयएम पक्षात देखील नाराज गटाने चक्क पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्या गाडीवर हल्ला केलाय. प्रभाग क्रमांक 13 आणि 14 मध्ये दुपारी एकच्या सुमारास पक्षातर्फे पदयात्रा सुरू असताना, पक्षाचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या गाडीवर काही युवकांनी हल्ला चढवला. त्यातून जलील यांनी कारमध्ये बसून निघून जाण्याचा मार्ग अवलंबला, मात्र काही युवकांनी थेट कारवर हल्ला केला. या प्रकरणी जलील यांनी दिलेल्या माहितीनुसार, "25 ते 30 जणांनी हल्ला केला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही पाहून कारवाई करावी," अशी मागणी जलील यांनी केली आहे.

प्रतिक्रिया देताना इम्तियाज जलील (ETV Bharat Reporter)



प्रचार थांबवण्यासाठी प्रयत्न : "आमचा प्रचार थांबवण्यासाठी हा प्रयत्न केल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केला. सलीम कुरेशी नावाच्या व्यक्तीने हे काम केलं असावं. सत्ताधारी असलेल्या नेत्यांसोबत त्यांचं काम चालतं. त्यांच्या सांगण्यावरून हल्ला झाला असावा. पोलीस देखील तिथे होते, त्यांच्यावर देखील हल्ला झाला आहे. आम्ही प्रसिद्धीसाठी असं काम करणारे नाहीत, आम्हाला जनतेचा जनाधार मिळत आहे. माझ्यावर काहीजण आरोप करत आहेत, मात्र पक्षाचे प्रमुख ओवैसी यांचा माझ्यावर विश्वास असल्यानं मी घाबरत नाही. आमच्याकडं नाराज असणारे लोक ओवेसींच्या सभेत दिसतील," असा विश्वास जलील यांनी व्यक्त केला.



जलील यांना दाखवले काळे झेंडे : इम्तियाज जलील बायजीपुरा भागात प्रचार करत असताना काही नागरिकांनी त्यांना काळे झेंडे दाखवत त्यांनी दिलेल्या उमेदवारीचा निषेध व्यक्त केला. काळे झेंडे दाखवत नागरिकांचा जलील यांच्या विरोधात घोषणाबाजी करून पैसे घेऊन तिकीट दिल्याचा आरोप त्यांच्यावर केला. नाराज उमेदवार सलीम पटेल यांनी यावेळी नाराजी व्यक्त करत, "वॉर्डमध्ये मी 20 वर्षांपासून काम करतो, वार्डामधील उमेदवार न देता पॅरॅशूट उमेदवार म्हणजेच बाहेरून आलेला उमेदवार इम्तियाज जलील यांनी दिला. अनेक प्रश्न वार्डामध्ये असतात तर त्यांना वार्डातलाच उमेदवार हवा असतो, मात्र त्यांनी दुसरीकडचा उमेदवार देऊन आमच्यावर अन्याय केला. त्यामुळं स्थानिक नागरिकांनी त्यांना गो बॅकचे नारे देत काळे झेंडे दाखवले," अशी प्रतिक्रिया एमआयएम बंडखोर उमेदवार सलीम पटेल बोरगावकर यांनी दिली.

हेही वाचा -

  1. एमआयएम फक्त हैदराबादपुरतं मर्यादित नाही, हे दाखवून देणार; इम्तियाज जलील यांनी सांगितला निवडणुकांचा प्लॅन
  2. इम्तियाज जलील यांच्यासोबत फ्रीस्टाईल होणार? आमदार संजय गायकवाड यांनी स्टॅम्प पेपरवर केला करारनामा
  3. ज्या उमेदवाराच्या पाठिशी महिला, त्याचा मतपेटीत नंबर पहिला : एकनाथ शिंदे