ETV Bharat / state

मुसळधार पावसाचा फटका; सर्वाधिक पर्यटनस्थळं असणाऱ्या जिल्ह्यातच पर्यटनावर निर्बंध

मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे भूस्खलन, दरडी कोसळण्याच्या धोका लक्षात घेऊन पर्यटनस्थळांवर बंदीचा आदेश प्रशासनाकडून पारित करण्यात आला आहे.

Satara rain news
मुसळधार पावसामुळे नदीला पूर (Source- ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : July 7, 2026 at 7:32 AM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

सातारा - भारतीय हवामान विभागाकडून सातारा जिल्ह्याला ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे भूस्खलन, दरडी कोसळण्याच्या धोका लक्षात घेऊन सातारा जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळांवर बंदी घालण्यात आली आहे. पूर आलेल्या ओढे, नदीवरील पूल, तलाव, धबधबे, सेल्फी पॉईंट परिसरात जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी सायंकाळी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलमान्वये यासंदर्भातील आदेश पारित केला आहे. सातारा जिल्ह्यासाठी हवामान विभागानं ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी केला आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता पावसामुळे दरडी कोसळणे, भूस्खलन आणि संपर्क यंत्रणा विस्कळीत होऊ शकते. त्यामुळे धरण क्षेत्रातील विसर्ग आणि नदीकाठच्या गावांना वेळेत सुरक्षित ठिकाणी हलवणे आव्हानात्मक ठरते. या पार्श्वभूमीवर, मान्सून कालावधीत धरणे, धबधबे, नदीपात्र व पर्यटन स्थळांवर संभाव्य जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश पारित करण्यात येत असल्याचं त्यांनी आदेशात नमूद केलं आहे.

collector order
पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी (Source- ETV Bharat Reporter)

चोख बंदोबस्त तैनात करावा- सातारा जिल्ह्यातील धोकादायक पर्यटनस्थळे, धबधबे, तलाव याठिकाणी पर्यटकांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत. अपघातप्रवण आणि सेल्फी पॉइंट्सच्या ठिकाणी तात्काळ 'धोकादायक क्षेत्र' व 'प्रवेश निषिद्ध' दर्शवणारे फलक लावण्यात यावेत. पावसाळी पर्यटनाच्या ठिकाणी गर्दी नियंत्रित करण्यासाठी आणि अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त तैनात करावा. भूस्खलन, दरडप्रवण क्षेत्रातील नागरिकांचे स्थलांतर करावे. मोडकळीस आलेल्या घरांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना तात्काळ सतर्क करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

collector order
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश (Source- ETV Bharat Reporter)

घाट परिसरात वाहने थांबवण्यास सक्त मनाई- स्थलांतरित कुटुंबांसाठी स्थानिक शाळा, महाविद्यालये, समाजमंदिरे किंवा निश्चित केलेल्या तात्पुरत्या पुनर्वसन केंद्रांमध्ये राहण्याची, पिण्याच्या पाण्याची आणि वैद्यकीय सुविधेची चोख व्यवस्था स्थानिक प्रशासनानं करावी. अतिवृष्टीच्या काळात घाटरस्ते आणि कडा कोसळण्याच्या संभाव्य क्षेत्रांतून प्रवास टाळावा. घाट परिसरात वाहने थांबवण्यास सक्त मनाई करण्यात यावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात म्हटलं आहे.


आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष 24 तास सुरू ठेवा- ओढे, नाले आणि नद्यांना पूर आला असल्यास अथवा पुलावरून पाणी वाहत असल्यास तो मार्ग वाहतुकीसाठी तात्काळ बंद करण्यात यावा. त्या ठिकाणी बॅरिकेटिंग करून पोलीस किंवा होमगार्ड तैनात करावेत. नदीकाठच्या आणि दरडप्रवण क्षेत्रातील नागरिकांना सतत हवामान अंदाज आणि पाण्याच्या पातळीबाबत माहिती देऊन सतर्क करावे. तहसील कार्यालये, नगरपरिषदा आणि पंचायत समित्यांनी आपले आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत ठेवावेत. तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियमातील तरतुदींनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारादेखील त्यांनी दिला आहे.

Satara rain news
जिल्ह्यातील धबधब्याचे दृश्य (Source-ETV Bharat Reporter)

हेही वाचा-