ETV Bharat / state

साताऱ्याला पुढील पाच दिवस ऑरेंज आणि रेड अलर्ट; घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा

भारतीय हवामान विभागानं पुढील पाच दिवस घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागानं साताऱ्याला पुढील 5 दिवस ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी केला आहे.

IMD Issues Red Alert To Satara
साताऱ्यात मुसळधार पाऊस (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : July 2, 2026 at 7:56 AM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

सातारा : सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला असतानाच पुढील पाच दिवस घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान विभागानं साताऱ्याला पुढील 5 दिवस ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी केला आहे. वादळी वारे आणि ढगांच्या गडगडाटात पाऊस कोसळण्याची शक्यता असल्यानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे. दरम्यान, कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील संततधार पावसामुळे कोयना धरणातील पाण्याची आवक 5 हजार क्युसेकवर पोहोचली आहे.

राज्यात मान्सून चांगलाच सक्रिय : राज्यात मान्सून चांगलाच सक्रिय झाला आहे. 100 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झालेल्या ठिकाणी पेरण्यांना वेग आला आहे. परंतु पावसाचं प्रमाण विभागानुसार कमी जास्त आहे. अशातच हवामान विभागानं पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. घाट परिसरात वादळी पावसाचं वातावरण तयार होऊन वेगानं वारे वाहू शकतात. तसेच विजांच्या कडकडाटात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला आहे.

IMD Issues Red Alert To Satara
पावसामुळे नागरिकांचे हाल (ETV Bharat)

केरळच्या उत्तर किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा : महाराष्ट्र आणि केरळच्या उत्तर किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यानं कोकणासह मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नदी-नाले, ओढे आणि धबधब्यांच्या परिसरात जाणं टाळावं. पाणी साचलेल्या रस्त्यांवरून वाहन चालवताना तसेच वीजेचा गडगडाट होत असताना काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

IMD Issues Red Alert To Satara
कोयना धरण (ETV Bharat)

साताऱ्याला पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा : सातारा जिल्ह्याला पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार बुधवार आणि गुरूवारी घाटमाथ्यावर अतिवृष्टी होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्या सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे कोयना धरणातील पाण्याची आवक 5 हजार क्युसेकवर पोहोचली आहे. कोयनानगर, नवजा, महाबळेश्वर याठिकाणी पावसाचा जोर वाढत चालला आहे. त्यामुळे घाट मार्गांवर दरडी कोसळत आहेत. नागरीकांनी प्रवासापूर्वी संबंधित भागातील वाहतूक आणि रस्त्यांची माहिती घ्यावी, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

IMD Issues Red Alert To Satara
साताऱ्यात मुसळधार पाऊस (ETV Bharat)

नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना :

  • हवामान विभाग आणि स्थानिक प्रशासनाचे इशारे नियमितपणे तपासा
  • विजांचा कडकडाट सुरू असताना मोकळ्या मैदानात किंवा झाडाखाली थांबणं टाळा
  • पूरग्रस्त किंवा पाणी साचलेल्या रस्त्यांवरून प्रवास करताना विशेष काळजी घ्या.
  • आवश्यक असेल तरच घाट रस्त्यांवरून प्रवास करा. मात्र, वाहतूक विभागाच्या सूचनांचं पालन करा.
  • मच्छीमारांनी पुढील सूचना मिळेपर्यंत समुद्रात जाणं टाळा

हेही वाचा :

  1. 14 दिवसांच्या खंडानंतर मान्सून पुन्हा सक्रिय; पुणे, सोलापूर, धाराशीवसह अलिबागमध्ये मान्सूनचं आगमन
  2. विदर्भातील मॉन्सूनची प्रतीक्षा वाढली: भर पावसाळ्यात उन्हाचे चटके असह्य, उकाड्यानं वैदर्भीय घामाघूम
  3. पूर्व, ईशान्य आणि दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा अंदाज; IMD ची माहिती