दौंड तालुक्यातील हॉटेल्समध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा बेकायदेशीर वापर, तक्रार करुनही कारवाई न झाल्याचा आरोप
दौंड तालुक्यातील अनेक हॉटेल्समध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा वापर हा अन्नपदार्थ शिजवण्यासाठी होत असल्याचं समोर आलं आहे.

Published : January 8, 2026 at 7:55 PM IST
पुणे(दौंड) - दौंड तालुक्यातील हॉटेल्समध्ये घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचा सर्रास वापर केला जात असल्याचं समोर आलं आहे. व्यावसायिक कारणासाठी नियमबाह्य पद्धतीनं वापरण्यात येणाऱ्या घरगुती गॅस सिलेंडरचा दौंड- पाटस रोडवरील हॉटेल जगदंबामध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्याची गंभीर घटना घडली आहे. यामध्ये दहा कामगार गंभीररित्या जखमी झाले होते. यामुळे घरगुती गॅस सिलेंडर वापराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. यामुळं अशा हॉटेल्सवरती प्रशासनाकडून कारवाई करण्यात येणार का? अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
कारवाई कधी होणार? - दौंड तालुक्यातील अनेक हॉटेल्समध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा वापर हा अन्नपदार्थ शिजवण्यासाठी होत असल्याचं समोर आलं आहे. अनेक ठिकाणी सर्रास घरगुती गॅस सिलेंडरचा वापर होत आहे. जगदंबा हॉटेलमध्ये झालेल्या स्फोटानंतर हा विषय प्रशासनानं गंभीररित्या घेतल्याचं दिसत आहे. मात्र, आतापर्यंत अशा रीतीनं व्यावसायिक कारणासाठी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करणाऱ्या हॉटेल्सवरती प्रशासनाकडून कारवाई का करण्यात आली नाही? याबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू असल्याचं दिसून येत आहे.
नागरिकांच्या जीविताशी खेळ - जगदंबा हॉटेलमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झाला त्यावेळी हॉटेलमध्ये ग्राहक नव्हते, अन्यथा जेवण करण्यासाठी आलेल्या नागरिकांना देखील मोठ्या जीवघेण्या घटनेला सामोरं जावं लागलं असतं. यामुळं जीवितहानी होण्याची शक्यता देखील निर्माण झाली असती. यामुळं घरगुती गॅस सिलेंडर वापर करणारे हॉटेल्स हे नागरिकांच्या जीविताशी खेळ करत असल्याचे दिसून येत आहे.
तक्रारीची घेतली नाही दखल - दौंड शहर व परिसरात हॉटेल, ढाबे, बेकरी, चायनीज सेंटर आदी व्यावसायिक ठिकाणी व्यावसायिक गॅस सिलेंडर ऐवजी घरगुती LPG सिलेंडरचा सर्रास बेकायदेशीर वापर सुरू असल्याबाबत 3 सप्टेंबर 2024 रोजी “आपले सरकार” पोर्टलवर तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, कोणतीही प्रत्यक्ष चौकशी किंवा कारवाई न करता सदर तक्रार Auto Closed करण्यात आली असल्याचं तक्रारदार गणेश जगताप यांनी सांगितलं.
संगनमतानं हा गैरप्रकार सुरू? - अनेक हॉटेल, ढाबे व खानावळींमध्ये सर्रास घरगुती सिलेंडरचा बेकायदेशीर व्यावसायिक वापर सुरू आहे. प्रशासनातील काही अधिकारी व गॅस एजन्सींच्या संगनमतानं हा गैरप्रकार सुरू आहे, हे अत्यंत गंभीर व संतापजनक आहे, असा आरोप नागरिकांनी केला.
"विशेष बाब म्हणजे, या बोगस वापरासाठी ओटीपी, केवायसी किंवा कोणतीही पडताळणी लागत नाही, तर दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांना मात्र ओटीपी-केवायसी बंधनकारक केली आहे. ओटीपी न मिळाल्यास किंवा केवायसी अपूर्ण असल्यास घरगुती गॅसच दिला जात नाही. हा दुहेरी निकष कोणासाठी?" असा प्रश्न अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे दौंड शहर अध्यक्ष गणेश जगताप यांनी उपस्थित केला.
सदर गॅस एजन्सीवर कारवाई करणार - जगदंबा हॉटेलमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा वापर केल्याचं दिसून येत आहे. हा सिलेंडर नेमका कोणत्या वितरकाकडून हॉटेलला देण्यात आला याबाबत चौकशी करून संबंधित गॅस एजन्सीवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पुरवठा अधिकारी सपन गड्डमवार यांनी दिली.
हेही वाचा - दौंडच्या हॉटेलमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट, 10 कामगार गंभीर जखमी

