हिंमत असेल तर समोरून लढा, संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंना थेट आव्हान
“हिंमत असेल तर समोरून लढा,” अशा शब्दांत राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलं असून, पोलिसांच्या भूमिकेबाबतही सवाल उपस्थित केलाय.


Published : January 5, 2026 at 12:14 PM IST
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तयारीचा जोर संपूर्ण राज्यात वाढला असून, मुंबईमध्ये वेगवेगळ्या विषयांवरून वातावरण तापत असल्याचं पाहायला मिळतंय. ठाण्यातील उमेदवार पळवल्याच्या प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आज टीका केलीय. “हिंमत असेल तर समोरून लढा,” अशा शब्दांत राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलं असून, पोलिसांच्या भूमिकेबाबतही सवाल उपस्थित केलाय. संजय राऊत यांनी मुंबईत माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
मनसे उमेदवाराच्या व्हिडिओमुळे राजकीय वातावरण तापलंय : राज्यातील महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू असताना ठाण्यातील मनसे उमेदवाराबाबत समोर आलेल्या व्हिडिओमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. या प्रकरणावर संजय राऊतांनी विशेष भाष्य करत म्हटले की, एकनाथ शिंदेंमध्ये हिंमत आणि मर्दानगी असेल, तर त्यांनी पाठीमागून खंजीर खुपसण्याचे उद्योग थांबवून समोरून लढावे, असे खुले आव्हान संजय राऊत यांनी दिलंय. संजय राऊतांनी गलिच्छ राजकारणाबद्दल चीड व्यक्त करत तुम्ही आमचा पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, तरी आम्ही खंबीरपणे लढतोय. पण आता तुम्हाला मशाल आणि इंजिनची इतकी भीती वाटू लागली आहे की, समोरच्या उमेदवाराने निवडणूक लढवूच नये, यासाठी तुम्ही प्रयत्न करीत आहात. हा सर्व प्रकार तुम्ही घाबरला आहात हेच सिद्ध करतो, असंही संजय राऊत म्हणाले.
लोकांच्या मनात या गलिच्छ राजकारणाबद्दल प्रचंड चीड : तसेच 10-15 हजार रुपये वाटून किंवा उमेदवार पळवून मुंबई-ठाण्यातील मतदारांचं मत परिवर्तन होईल हा सत्ताधाऱ्यांचा भ्रम आहे. लोकांच्या मनात या गलिच्छ राजकारणाबद्दल प्रचंड चीड आहे आणि ही चीड मतपेटीतून नक्कीच बाहेर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. दरम्यान, मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा झाकल्याच्या मुद्द्यावर संजय राऊतांनी निवडणूक आयोगाला 'मूर्ख' म्हटलंय. ते म्हणाले, "बाळासाहेब ठाकरे हे राष्ट्रपुरुष आहेत. जर त्यांचा पुतळा झाकला जात असेल, तर मुंबईतील अटल बिहारी वाजपेयींचे पुतळे का झाकले जात नाहीत? बाळासाहेबांची भीती शिंदे आणि फडणवीस यांच्या मनात आहे. पण एक पुतळा झाकून काय होणार? आज सर्वच पक्ष त्यांचे फोटो वापरत आहेत."
काम करण्यासाठी पोलिसांवर नक्कीच दबाव : त्याचबरोबर त्यांनी मनसे नेते अविनाश जाधव यांनी प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओचा संदर्भ दिलाय. संजय राऊत म्हणाले की, हा प्रकार लोकशाहीसाठी घातक आहे. पोलीस उमेदवारांच्या घरात जातात, त्यांना गाडीत टाकतात आणि थेट उपमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी घेऊन येतात. हे काम करण्यासाठी पोलिसांवर नक्कीच दबाव किंवा धमक्या असाव्यात. पोलिसांनी त्यांचे काम इमानदारीने केले असले तरी हे चित्र संतापजनक आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. या प्रकरणावर निवडणूक आयोग काहीही ठोस कारवाई करणार नाही. आयोग फक्त अहवाल मागवेल आणि चौकशीचे आश्वासन देऊन वेळ काढेल. त्यामुळे अन्यायाविरुद्ध न्यायालयात जाणे हाच योग्य मार्ग उरला आहे, असा दावा त्यांनी केला.

