ETV Bharat / state

वन्यप्राणी-मानवामधील संघर्ष शिगेला! हल्ला करणाऱ्या बिबट्यासह शेतकऱ्याचा विहिरीत पडल्यानंतर मृत्यू

सिन्नर तालुक्यातील शिवडी गावात शेतात जेवण करत बसलेल्या तरुणावर बिबट्यानं हल्ला केला. तो धावताना थेट विहिरीत पडला. त्याच्यापाठोपाठ बिबट्यादेखील विहिरीत पडल्यानंतर दोघांचाही पाण्यात मृत्यू झाला.

human leopard conflict
संग्रहित-बिबट्या (Source- ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 5, 2026 at 9:39 AM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

नाशिक- बिबट्या आणि मानव यांच्यातील जगण्याचा संघर्ष नाशिक जिल्ह्यात शिगेला पोहोचला आहे. शेतात काबाडकष्ट करून दुपारचं जेवण करणाऱ्या तरुण शेतकऱ्यावर बिबट्यानं अचानक हल्ला केला. या हल्ल्यानंतर जीव वाचविताना शेतकरी जवळील विहिरीत पडला. तर बिबट्यादेखील शेतकऱ्याचा पाठलाग करताना विहिरीत पडला. दोघांचाही विहिरीत पडून मृत्यू झाला.


मिळालेल्या माहितीनुसार सिन्नर तालुक्यातील शिवडी गावात गोरख जाधव हा तरुण शेतकरी शेतात काम करण्यासाठी गेला होता. 4 जानेवारी रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास विहिरी जवळ जेवण करण्यासाठी बसला असता अचानक बिबटयानं त्याच्यावर हल्ला केला. त्यावेळी घाबरलेल्या गोरखनं स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचवेळी स्वत:चा जीव वाचविण्याची धडपड करताना तो शेतातील विहिरीत पडला. तरुणाचा पाठलाग करताना बिबट्यानं पाठोपाठ विहीरीत उडी घेतली. दोन ते तीन तास पाण्यात राहिल्यानं बिबट्याचाही मृत्यू झाला.

बिबट्याचाही मृत्यू- वन विभागानं जीवरक्षकांच्या माध्यमातून गोरखचा विहिरीत शोध घेतला असता त्याचा मृत्यू झाल्याचं लक्षात आले. त्यानंतर त्याचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. त्यावेळी,गावातील तरुणाचा मृत्यू झाल्यानं ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत बिबट्याला बाहेर काढण्यास विरोध केला.मात्र, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, 2 ते 3 तास पाण्यात असल्यानं बिबट्याचाही मृत्यू झाला. बिबट्या कमी उंचीवर असलेल्या प्राण्यावर अथवा व्यक्तीवर हल्ला करतो. तरुण जेवण करत असताना बसल्यामुळे बिबट्यानं हल्ला केला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे.


मुख्यतः रात्री शिकार करतात- बिबटे हे मार्जार कुळातील प्राणी आहे. मोठ्या जंगली जातींच्या मांजरांमध्ये परिस्थितीनुसार सर्वाधिक प्रमाणात जुळवून घेणारा हा प्राणी आहे. विविध अधिवसांमध्ये ते आढळतात. अभयारण्यांमध्ये तसेच मानवी वस्तीच्या आसपासही ते राहतात. बिबटे हे निशाचर प्राणी आहेत ते मुख्यतः रात्री शिकार करतात आणि दिवसभर विश्रांती घेतात. माणूस हा बिबट्यांच्या नैसर्गिक आहारात समाविष्ट नाही. मात्र, अनेकदा बिबट्या माणसांवर हल्ले करत असल्याचं दिसून आलेलं आहे.

हेही वाचा-