शिर्डीत भररस्त्यात टांगा पलटी; साईदर्शनासाठी आंध्र प्रदेशातून आलेले भाविक जखमी
अपघाताची माहिती मिळताच इतर भाविकांनी तत्काळ धाव घेत मदतकार्य सुरू केलं. नागरिकांनी पलटी झालेला टांगा उभा करून त्यामधील जखमी भाविकांना बाहेर काढलं.

Published : June 30, 2026 at 10:50 AM IST
शिर्डी : साईबाबांच्या पवित्र नगरीत देशभरातून लाखो भाविक साईदर्शनासाठी येत असतात. शिर्डीत आल्यानंतर अनेक साईभक्तांना येथील पारंपरिक घोडागाडीतून प्रवास करण्याचा अनुभव घ्यायचा असतो. पूर्वीपासून सुरू असलेली ही घोडागाडी सेवा आजही भाविकांमध्ये लोकप्रिय आहे. मात्र बदलत्या काळानुसार या टांग्यांमध्येही बदल झाला असून आधुनिक पद्धतीनं पुढे घोडा आणि मागील बाजूस टायर असलेल्या टांग्यांमधून भाविकांची प्रवासी वाहतूक केली जाते.
अचानक घोडा आणि टांग्याचा समतोल बिघडला : सोमवारी (29 जून) रात्री शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी आंध्रप्रदेश येथून आलेले काही भाविक एका टांग्यातून प्रवास करत होते. साई दर्शनानंतर ते शहरातील रस्त्यावरून जात असताना शिर्डी नगरपरिषद समोर अचानक घोडा आणि टांग्याचा समतोल बिघडला. काही क्षणातच टांगा भर रस्त्यात भाविकांसह पलटी झाला. या अचानक घडलेल्या अपघातामुळे परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. टांग्यात बसलेले काही भाविक रस्त्यावर पडले. या अपघातात तीन ते चार भाविक जखमी झाले असून यामध्ये महिला भाविकांचाही समावेश आहे. जखमी भाविकांमध्ये सुरेश साधू (वय 42 वर्ष, खंडावी साधू (वय 40 वर्ष), जया साधू (वय 17 वर्ष) यांचा समावेश आहे. सर्वजण आंध्रप्रदेश गुंटूर येथील रहिवासी आहेत.
भाविकांना किरकोळ दुखापत : अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी उपस्थित नागरिक आणि इतर भाविकांनी तत्काळ धाव घेत मदतकार्य सुरू केलं. नागरिकांनी पलटी झालेला टांगा उभा करून त्यामधील जखमी भाविकांना बाहेर काढलं. त्यानंतर जखमींना तातडीने उपचारासाठी साईबाबा संस्थानच्या श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. जखमी भाविकांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती असून वेळेत मदत मिळाल्यानं मोठी दुर्घटना टळली. या घटनेनंतर शिर्डीतील टांगा वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
हेही वाचा
- नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यावेळी भाविकांना एकाच दिवसात तीन ज्योतिर्लिंग, शिर्डी साईबाबांचं घेता येणार दर्शन
- ईटीव्ही भारत Exclusive : शिर्डीत अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; दोन लाखांचे भेसळयुक्त पेढे डंपिंग, 700 किलो पेढे जप्त
- झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी घेतलं शिर्डी साईबाबांचं दर्शन, म्हणाले 'दर्शनानं संकटांशी लढण्याचा आत्मविश्वास येतो'

