राहुरी-शनिशिंगणापूर रोडवर भीषण अपघात; नाशिकातील तिघे तरुण ठार
6 जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास तीनचाकी रिक्षा आणि ट्रॅव्हल्स बस यांचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.


Published : January 7, 2026 at 10:16 AM IST
अहिल्यानगर - राहुरी-शनिशिंगणापूर रोडवरील उंबरे शिवारात असलेल्या तांबे पेट्रोल पंपासमोर ट्रॅव्हल्स आणि रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात नाशिक येथील तिघे तरुण जागीच ठार झाले असून, दोघे गंभीर जखमी झालेत. 6 जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास तीनचाकी रिक्षा आणि ट्रॅव्हल्स बस यांचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली असून, या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडालीय.
तीनचाकी रिक्षा आणि ट्रॅव्हल्स बस यांच्यात समोरासमोर जोरदार धडक : राहुरी तालुक्यातील उंबरे परिसरात असलेल्या तांबे पेट्रोल पंपाजवळ आज 6 जानेवारीला सायंकाळी सुमारे 5 वाजता नाशिक येथील काही तरुण तीनचाकी रिक्षामधून शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी जात होते. त्याच वेळी एक खासगी ट्रॅव्हल्स बस शनिशिंगणापूरहून राहुरीकडे येत होती. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात तीनचाकी रिक्षा आणि ट्रॅव्हल्स बस यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेनंतर ट्रॅव्हल्स बस रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली. या अपघातात रिक्षामधील तीन तरुण जागीच ठार झाल्याची माहिती आहे. तसेच रिक्षामधील इतर तरुण आणि ट्रॅव्हल्समधील काही भाविक असे अनेक जण गंभीर जखमी झालेत.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तीन तरुणांना मृत घोषित केले : परिसरातील काही तरुणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. राहुरी येथील भागवत वराळे, बाळासाहेब वराळे, प्रथमेश वराळे, आकाश लहानगे, सचिन जाधव आदींनी रुग्णवाहिकांच्या सहाय्याने जखमींना तातडीने राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलेत. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तीन तरुणांना मृत घोषित केले. तर गंभीर जखमी झालेल्या अनेक जणांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आलंय. अपघातस्थळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रक्त सांडलं होतं. या अपघातात मृत्युमुखी पडलेले तरुण हे इगतपुरी तालुक्यातील गिरणारे येथील रहिवासी असून, दीपक जगन डावखर (वय 22), आकाश मनोज डावखर (वय 22) आणि दीप विजय जाधव (वय 20) यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय.
हेही वाचाः

