मावळच्या जंगलात आशादायी नोंद; व्याघ्र सर्वेक्षणादरम्यान आढळला शेकरू
लोणावळा येथील प्रसिद्ध टायगर पॉईंट परिसरात महाराष्ट्राचा राज्य प्राणी असलेल्या ‘शेकरू’चे (Indian Giant Squirrel) दर्शन झाल्याने वन्यजीव अभ्यासक, वनाधिकारी आणि निसर्गप्रेमींमध्ये समाधान व्यक्त केलं जातंय.

Published : January 6, 2026 at 1:43 PM IST
पुणे (लोणावळा): अखिल भारतीय व्याघ्र अंदाज 2026 अंतर्गत सुरू असलेल्या वन्यजीव सर्वेक्षणादरम्यान पुणे वनविभागाच्या मावळ वनपरिक्षेत्रात एक अत्यंत आनंददायी आणि आशादायी नोंद झालीय. लोणावळा येथील प्रसिद्ध टायगर पॉईंट परिसरात महाराष्ट्राचा राज्य प्राणी असलेल्या ‘शेकरू’चे (Indian Giant Squirrel) दर्शन झाल्याने वन्यजीव अभ्यासक, वनाधिकारी आणि निसर्गप्रेमींमध्ये समाधान व्यक्त केलं जातंय. हे दर्शन म्हणजे संबंधित जंगल परिसरातील परिसंस्था सुदृढ, संतुलित आणि जैवविविधतेने समृद्ध असल्याचा ठोस पुरावा मानला जातोय.
राज्यातील सर्व वनपरिक्षेत्रांमध्ये व्यापक सर्वेक्षण सुरू : 1 जानेवारी 2026 पासून अखिल भारतीय व्याघ्र अंदाज अंतर्गत राज्यातील सर्व वनपरिक्षेत्रांमध्ये व्यापक सर्वेक्षण सुरू आहे. या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश वाघ, बिबट्या, तरस, माऊस डियर यांसह इतर वन्यजीवांच्या पाऊलवाटा, खुणा आणि प्रत्यक्ष दर्शनाच्या आधारे त्यांच्या अंदाजित संख्येचा वैज्ञानिक पद्धतीने आढावा घेणे हा आहे. याच पार्श्वभूमीवर 5 जानेवारीला सकाळी लोणावळा टायगर पॉईंटच्या आतवन परिसरात ट्रान्झेक्ट लाईनवर गणना सुरू असताना सर्वेक्षण पथकाला उंच झाडांच्या शेंड्यावर शेकरू निदर्शनास आला.
शेकरू हा वन परिसंस्थेचा महत्त्वाचा निर्देशक प्राणी मानला जातो : या महत्त्वपूर्ण नोंदीची अधिकृत नोंद लोणावळा वनपाल गणेश म्हेत्रे आणि वनरक्षक कृष्णा देठे यांनी केलीय. सामान्यतः घनदाट, जुनी आणि जैवविविधतेने परिपूर्ण जंगलात आढळणारा शेकरू हा वन परिसंस्थेचा महत्त्वाचा निर्देशक प्राणी मानला जातो. तो बीजप्रसाराच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेत असल्याने जंगलाच्या पुनरुत्पादनात त्याची भूमिका अत्यंत मोलाची असते. त्यामुळे एखाद्या परिसरात शेकरूची उपस्थिती म्हणजे त्या ठिकाणचा अधिवास निरोगी असून, मानवी हस्तक्षेप तुलनेने कमी असल्याचे संकेत मिळतात.

मावळ वनविभागातील जैवविविधतेचे उत्साहवर्धक चित्र समोर : व्याघ्र अंदाज 2026 अंतर्गत वाघ आणि बिबट्यांच्या खुणांचे निरीक्षण सुरू असतानाच शेकरूसारख्या संवेदनशील प्रजातीची नोंद होणे, मावळ वनविभागातील जैवविविधतेचे उत्साहवर्धक चित्र समोर आणते. यामुळे लोणावळा परिसर केवळ पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा नसून, वन्यजीवांसाठीही अत्यंत महत्त्वाचे अधिवासक्षेत्र असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना मावळ-वडगाव वनविभागाचे वनाधिकारी प्रकाश शिंदे यांनी सांगितले की, “शेकरूचे दर्शन ही जंगल परिसंस्थेच्या सुदृढतेची सकारात्मक नोंद आहे. व्याघ्र अंदाज सर्वेक्षणाच्या पुढील टप्प्यांत आणखी महत्त्वपूर्ण माहिती समोर येईल, असा आम्हाला विश्वास आहे.” वनविभागाकडून सुरू असलेल्या या सर्वेक्षणामुळे मावळ तालुक्यातील जंगलसंपदेचे शास्त्रीय मूल्यांकन होण्यास मदत होणार असून, भविष्यातील संवर्धनात्मक धोरणांसाठी ही माहिती अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
हेही वाचाः
निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचा एजंट बनलाय, संजय राऊतांचं पुन्हा 'रोखठोक'
'हुरडा पार्टी'तून शेतकऱ्यांची आर्थिक क्रांती! 4 महिन्यांत 7 लाखांची कमाई; ग्रामीण पर्यटनालाही चालना

