ETV Bharat / state

मुंबईत होळीचा उत्साह शिगेला; सर्वत्र संगीत, मस्ती आणि तगडा पोलीस बंदोबस्त

मुंबईतील दादर शिवाजी पार्क आणि गिरगाव, दादर, लालबाग, घाटकोपर यांसारख्या भागांत पारंपरिक पद्धतीने रंगपंचमी साजरी करताना लोक गल्लोगल्ली पाहायला मिळत होती.

Holi celebration in mumbai
मुंबईत होळीचा उत्साह शिगेला (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : March 3, 2026 at 2:20 PM IST

|

Updated : March 3, 2026 at 5:15 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : मुंबईसह उपनगरात रंगपंचमीचा उत्साह दरवर्षीप्रमाणेच यंदाही शिगेला पोहोचलेला पाहायला मिळालाय. होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी येणाऱ्या या सणानं मुंबईतील वातावरणात एक वेगळंच चैतन्य पसरलेलं पाहायला मिळतंय.

मुंबईत होळीचा उत्साह शिगेला (Source- ETV Bharat)

शिवाजी पार्कात तरुणाईचा उत्साह : दादर शिवाजी पार्क आणि मुंबईत गिरगाव, दादर, लालबाग आणि घाटकोपर यांसारख्या भागांत पारंपरिक पद्धतीने रंगपंचमी साजरी करताना लोक गल्लोगल्ली पाहायला मिळत होती. अनेक सोसायट्यांमध्ये 'रेन डान्स' आणि संगीताच्या कार्यक्रमांचं आयोजन केल्याचंही पाहायला मिळालंय. तर या सणाला एका इव्हेंटच रूप देत काही पंचतारांकित हॉटेल्समध्ये मोठ्या संगीत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. 'द ललित' हॉटेलमध्ये 'सनबर्न होळी x रंग उत्सव' हा मोठा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही पार पडला. ज्यामध्ये जगप्रसिद्ध डीजेनी आपल्या संगीतानं उपस्थितांना संगीताच्या तालावर झिंगायला लावलं. तर पश्चिम उपनगरांत गोरेगाव येथे 'रंगओव्हर 2026' सारखे कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. तर जोगेश्वरीच्या करकरे उद्यानात ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या उत्साहात होळी साजरी केली. जोगेश्वरीतील करकरे गार्डन कट्टा ग्रुपमध्ये जवळपास 70 जण सहभागी आहेत. ग्रुपच्या माध्यमातून ते प्रत्येकाचे वाढदिवस आणि इतर सण आनंदानं साजरे करतात. त्याच पद्धतीनं आज करकरे गार्डनमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी धुळवड साजरी करून आनंद व्यक्त केलाय.

महापालिका प्रशासनाकडून पर्यावरणपूरक होळीचं आवाहन : मुंबई महानगरपालिकेनं यंदाही पाणी वाचवत सुकी आणि नैसर्गिक रंगांचा वापर करत पर्यावरणस्नेही होळी खेळण्याचं आवाहन मुंबईकरांना केलंय. गेल्या काही वर्षांपासून मुंबईकरांचा कलही हरबल कलर्सकडे जास्त असून, आता रासायनिक रंगांऐवजी गुलाल आणि फुलांच्या पाकळ्यांचा वापर करण्यास लोक जास्त पसंती देत आहेत. रंगपंचमीच्या निमित्तानं मुंबईकर पुरणपोळी, श्रीखंड आणि थंडाईचा आस्वाद घेतानाही पाहायला मिळालेत.

मुंबईत रंगपंचमीनिमित्त तगडा पोलीस बंदोबस्त : मुंबईत होळी, धुळवड आणि रंगपंचमीनिमित्त कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुंबई पोलिसांनी ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात केलाय. 10000 हून अधिक पोलीस कर्मचारी, SRPF, दंगल नियंत्रण पथक आणि साध्या वेशातील पोलीस रस्त्यावर गस्त घालताना पाहायला मिळाले. ड्रिंक अँड ड्राईव्ह, मद्यपान करून धिंगाणा घालणाऱ्यांविरोधात पोलीस कारवाई करीत आहेत. नागरिकांनी कायदा पाळून सुरक्षित रंगपंचमी साजरी करावी, असे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आलंय.

Last Updated : March 3, 2026 at 5:15 PM IST