शतकोत्तर परंपरा : ऐतिहासिक 'राजवाडी होळी'तून घडतेय आदिवासी संस्कृतीचं दर्शन
नंदुरबारमध्ये होणारी राजवाडी होळी पाहण्यासाठी जिल्ह्यासह गुजरात आणि मध्य प्रदेशमधील भाविक सातपुड्यात दाखल होत असतात. ही शतकोत्तर परंपरा ग्रामस्थ आणि संस्थानांच्या वारसदारांनी जपली आहे.

Published : March 3, 2026 at 6:50 PM IST
नंदुरबार : सातपुड्याच्या पर्वत रांगेत शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या सातपुड्यातील राज संस्थांनची काठीच्या 'राजवाडी होळी'ची ओळख आहे. या राजवाडी होळीसाठी लागणारा बांबू गुजरात राज्यातील डेडीयापाडा तालुक्यातील 'नामगी' गावाच्या जंगलातून आणला जातो. या राजवाडी होळीतून रात्रभर कलापथकांच्या कलाविष्कारातून आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडणार आहे.
काठीच्या राजवाडी होळीला सुमारे 779 वर्ष पूर्ण झालेत. ही शतकोत्तर परंपरा ग्रामस्थ आणि संस्थानांच्या वारसदारांनी टिकवली आहे. यंदा राजवाडी होळी पाहण्यासाठी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्यासह नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचे खासदार ॲड. गोवाल पाडवी जिल्ह्यातील आमदार उपस्थित राहिले.

काठी संस्थांच्या ऐतिहासिक 'राजवाडी होळी'चा इतिहास : नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याचे वैभव असलेले अक्कलकुवा तालुक्यातील काठी संस्थांच्या राजवाडी होळीला ऐतिहासिक महत्त्व आहे. या राजवाडी होळीचा इतिहास 779 वर्षांपूर्वीचा असल्याचं काठी संस्थांच्या वारसांकडून सांगितलं जातं. काठी संस्थानिकचे राजे उमेदजी लक्ष्मण, राजे रोतुजी उमेद, राजे चंद्रसिंह रोतुजी, राजे सुरजसिंह रोतुजी, राजे रणजितसिंह सुरजसिंह, राजे रघुवीरसिंह रणजितसिंह, राजे मानपसिंह सुरजसिंह, काठी राजवाडीचे वंशज पृथ्वीसिंह पाडवी, मोहनसिंग पाडवी, महेंद्रसिंह पाडवी, राजेंद्रसिंग पाडवी, शेरसिंग पाडवी, सागरसिंह सरवरसिंह पाडवी, गणपतसिग नटवरसिंह पाडवी, बहादुरसिंग नटवरसिंह पाडवी, करणसिंह नटवरसिंह पाडवी, अॅड.हिरेसिंह पाडवी, सरदारसिंग सुरुपसिंग पाडवी व काठी येथील ग्रामस्थांनी ही परंपरा अविरतपणे जोपासली आहे. या होळीच्या नियोजनासाठी काठी गावातील ग्रामस्थ हे परिश्रम घेत आहेत. आदिवासी बांधवांचे कुलदैवत राजापांठा आणि गांडा ठाकुर यांनी एकत्र येत उत्सवाला सुरुवात केल्याचं सांगितलं जातं.

बांबू आणण्याचा मान काही कुटुंबांना : सुमारे 1246 साली काठी संस्थांनचे पहिले राजे उमेदसिंह सरकार यांनी या होलिकोत्सवाला 'राजवाडी होलिकोत्सव' म्हणून प्रारंभ केला. ती परंपरा आजही काठीचे ग्रामस्थ आणि वारसदारांकडून जोपासली जात आहे. काठी येथील परंपरागत होळीसाठी लागणारा सुमारे 50 ते 60 फूट पेक्षाही अधिक लांबीचा बांबू ग्रामस्थ गुजरातमधील राजपिपलाच्या नामगिर जंगलातून पायपीट करत आणतात. हा बांबू आणण्याचा मान परंपरागत काठीतील काही कुटुंबांना दिला आहे. त्या कुटुंबातील व्यक्तींकडून ही सेवा 779 वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे. 60 फूट पेक्षाही जास्त लांबीचा हा बांबू होळीच्या दिवशी मध्यरात्रीनंतर गावात आणला जातो. होळीचा दांडा आणल्यानंतर सर्वप्रथम राजघराण्यातील सदस्य त्याची विधिवत पूजा अर्चा करतात. त्यानंतर हा पवित्र दांडा पहाटेच्या सुमारास कोणत्याही प्रकारच्या हत्याराचा वापर न करता हातानं खणलेल्या खड्ड्यात उभा केला जातो. त्याला गुळ, हार, कंगण, दाळ्या आणि खजूर आदी पदार्थांचे नैवद्य दाखवला जातो.

आदिवासी बांधवांच्या वेशभूषेची भूरळ : "भाविक ढोल ताशांच्या गजरात रात्रभर बेधुंद होऊन काठी येथील होळी मैदानावर नाचतात. पहाटे सुमारे पाच ते सहाच्या रम्यान होळी मातेला प्रज्वलित केलं जातं. होळी प्रज्वलित घेताच मोरवीबाबा, बुध्या, धानका, दोडे आदी हे सर्वजण रामढोलच्या तालावर विशिष्ट ठेका घेत फेर धरतात. सातपुड्यातील डोंगर रागांमधील काठीच्या राजवाडी होळीचा मोठ्या उत्साहात साजरा होतो. ढोल, बासरी, शिट्यांचा सुमधुर आवाज आणि आदिवासी बांधवांचा पारंपारिक पेहराव इथं येणाऱ्या प्रत्येकाला भुरळ घालतो. स्थानिक वाद्यांच्या तालावर आणि पारंपारिक गीतांच्या सुरावर रात्रभर नृत्य करणाऱ्या आदिवासी बांधवांनी होळी पेटवली," अशी माहिती राजवाडी होळीचे आयोजक सी. के. पाडवी यांनी दिली.

होळी उत्सवात आदिवासी बांधव रमला : होळी साजरी करताना आदिवासी संकृतीत पुरुष महिला असा भेदाभेद नाही. गरीब - श्रीमंतीची आडकाठी तर मुळीच नाही. मुक्त आणि प्रसन्न वातावरणात सातपुड्यातील होळी साजरी करण्यात येते. सातपुड्यातील डोंगर रांगांमध्ये राजावाडी होळी म्हणून लौकिक असलेल्या 'काठी' संस्थांची होळी सालाबादाप्रमाणं मोठ्या धूम धडाक्यात साजरी होते. होळी साजरी करताना आदिवासी संकृतीत पुरुष महिला असा भेदाभेद राहत नाही. गरी -श्रीमंतीची आडकाठी तर मुळीच नसते. मुक्त आणि प्रसन्न वातावरणात सातपुड्यातील होळी साजरी करण्यात येते. होळी उत्सवाला हजारो आदिवासी बांधव पारंपारिक वेशभूषेत काठीच्या होळी उत्सवात सामील झाले होते. संपूर्ण रात्रभर बेधुंद होऊन नाचणारे आदिवासी बांधव आणि त्यांच्यातली ऊर्जा पाहिल्यावर इथं येणारा प्रत्येक जण भारावून जातो. सामाजिक एकोपा आणि एकमेकांप्रती असलेला आदर भाव हा या समाजाला अजूनही एकत्र ठेवून आहे, त्याचे प्रमुख कारण ठरले आहे काठीची ही राजवाडी होळी!.
राजकीय नेत्यांची राजवाडी होळीला हजेरी : राजवाडी होळीत आदिवासी समाज मोठ्या उत्साहाने सामील होत असतो. यात राजकीय व सामाजिक नेते मंडळी सहभागी होत असतात. राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, खासदार ॲड. गोवाल पाडवी, माजी आदिवासी विकास मंत्री ॲड. के. सी. पाडवी, आ.आमश्या पाडवी, आ.राजेश पाडवी यांच्यासह अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नेते मंडळांनी होळी उत्सवात सहभाग नोंदविला.
काठीच्या होळीला अनन्य साधारण महत्त्व : "सन 1246 पासून सातपुड्यातील आदिवासी बांधवांचा अविरतपणे सुरू असलेला होळी हा एक महत्त्वाचा सण आहे. आमच्या पूर्वजांनी सुरू केलेली ही सांस्कृतिक परंपरा आम्ही आणि सातपुडावासी मोठ्या श्रद्धेनं जपत आहेत. वैभवशाली संस्कृतीचं संवर्धन करण्याचा सातपुडा वासियांचा आणि संस्थानिकांचे वारसदार म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत. होळी माता संपूर्ण मानव जातीचं कल्याण करते. मानव जातीवर येणारी संकट ती दूर करते, अशी सातपुडा वासीयांची श्रद्धा आहे. पारंपारिक संकेत पाळून होळी मातेची पूजा केली जाते. गरजू आणि श्रद्धाळू होळी मातेला नवस करत असतात. होळी मातादेखील आपल्या भाविकांची प्रार्थना पूर्ण करते. त्यामुळं सातपुडयाच्या कुशीत होळी सणाला अनन्य साधारण महत्त्व आहे", अशी माहिती काठी संस्थानचे वारसदार पृथ्वीसिंह पाडवी यांनी दिली.
हेही वाचा :

