ETV Bharat / state

गोव्यातील ऐतिहासिक महत्त्व असलेले मंगेशी मंदिर आणि शांतादुर्गा मंदिर; मंगेशकर कुटुंबीयांसोबत देखील आहे खास नातं!

मंगेशी गावातील भगवान शिवाच्या मंगेश रूपाला समर्पित असलेलं मंगेशी मंदिर आणि फोंडा तालुक्यातील कवळे येथील शांतादुर्गा देवीचं मंदिर विशेष महत्त्वाचं मानलं जातं.

Mangeshi Temple
मंगेशी मंदिर (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : February 20, 2026 at 7:19 PM IST

|

Updated : February 20, 2026 at 9:03 PM IST

3 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : गोव्याचे नाव घेताच समुद्रकिनारे आणि पर्यटन डोळ्यांसमोर येते; मात्र याच गोव्यात हिंदूंच्या श्रद्धेची प्राचीन आणि ऐतिहासिक केंद्रेही मोठ्या प्रमाणात आहेत. त्यात मंगेशी गावातील भगवान शिवाच्या मंगेश रूपाला समर्पित असलेलं मंगेशी मंदिर आणि फोंडा तालुक्यातील कवळे येथील शांतादुर्गा देवीचं मंदिर विशेष महत्त्वाचं मानलं जातं. यातील मंगेशी या मंदिराचे भारताच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या कुटुंबाशीही अतूट नातं आहे.

Mangeshi Temple
मंगेशी मंदिर (ETV Bharat Reporter)

मंगेशकर कुटुंबाचा मंदिराशी ऐतिहासिक संबंध : लता मंगेशकर यांचे आजोबा गणेश भट्ट नवाथे हर्डीकर हे मंगेशी मंदिरात पुजारी होते. त्यामुळेच त्यांच्या कुटुंबाचा या देवस्थानाशी दीर्घकाळ संबंध राहिला. तसंच, लता मंगेशकर यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर यांचा जन्मही मंगेशी गावात झाला होता. त्यांचे मूळ आडनाव 'हर्डीकर' होते; मात्र मंगेशी गावाशी ओळख जोडण्यासाठी त्यांनी 'मंगेशकर' हे आडनाव धारण केलं. याचा अर्थ 'मंगेशी गावचे' असा होतो. अशा प्रकारे या मंदिरातूनच 'मंगेशकर' हे प्रसिद्ध आडनाव निर्माण झाले.

लता मंगेशकर यांचे श्रद्धास्थान : लता मंगेशकर आजारी असताना देशभरातील मंदिरांमध्ये त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आल्या होत्या. मंगेशी मंदिरातही विशेष धार्मिक अनुष्ठान करण्यात आलं होतं. त्यामुळं भक्तांच्या दृष्टीने हे मंदिर लता मंगेशकर यांच्याशी भावनिक नात्यानं जोडलं गेलं आहे.

पुजारी महेश कारंडे यांची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter)


मंदिराचा इतिहास : हे मंदिर सुमारे 450 वर्षांहून जुनं असून ते मूळतः कुशास्थळी (आजचे कोर्टालिम) इथं जुआरी नदीकिनारी होतं. 16 व्या शतकात पोर्तुगीजांनी धर्मांतर सुरू केल्यामुळं मंदिरातील शिवलिंग सुरक्षिततेसाठी प्रियोल येथील सध्याच्या स्थळी हलवण्यात आलं. मराठा काळात मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला, तसंच 1890 आणि 1973 मध्येही पुनर्बांधणी झाली. आज हे मंदिर गोव्यातील सर्वात श्रीमंत आणि प्रमुख हिंदू देवस्थानांपैकी एक मानलं जातं.


पौराणिक कथा : लोकप्रिय आख्यायिकेनुसार, भगवान शिवांनी पार्वतीला घाबरवण्यासाठी वाघाचे रूप धारण केलं होतं. घाबरलेल्या पार्वतीने "त्राहि माम गिरिशा" अशी हाक मारली. हीच हाक कालांतराने "मम गिरिशा" झाली. यानंतर या "मम गिरिशा" शब्दाचे रूपांतर 'मंगिरीश' आणि पुढे 'मंगेश' असे झाले.

Mangeshi Temple
मंगेशी मंदिर (ETV Bharat Reporter)


मंदिराची वैशिष्ट्ये : मंदिर परिसरात सात मजली दीपस्तंभ, प्राचीन जलकुंड, नंदी मूर्ती आणि विविध देवतांची मंदिरे आहेत. माघ पौर्णिमेला होणारी रथयात्रा हा येथे प्रमुख उत्सव मानला जातो. दरम्यान, मंगेशी मंदिराची माहिती देताना पुजारी महेश कारंडे यांनी सांगितलं की, "मंगेशी हे मंदिर भगवान शिवाच्या रुपाला समर्पित आहे. संस्कृत शब्द मांग म्हणजे पर्वत आणि ईश म्हणजे देव या शब्दापासून मंगेश शब्दाची निर्मिती झाली असून याला माता पार्वतीने उच्चारलेल्या "त्राहि माम गिरिशा" या शब्दाचा देखील दाखला दिला जातो. तसंच गोवा ही परशुराम भूमी म्हणून ओळखली जाते. अनेक वर्ष गोव्यावर राज्य केलेल्या राज्यकर्त्यांमुळं मंदिराच्या बांधकामात हिंदू स्थापत्यशास्त्राबरोबरच मुस्लीम आणि पोर्तुगीज स्थापत्यशास्त्राची झलक पाहायला मिळते," असं महेश कारंडे यांनी सांगितले. याचबरोबर, "रोम ऑफ द ईस्ट म्हणून ओळख असलेले गोवा हे राज्य नेहमीच सर्व गोष्टींमधील सर्वोत्कृष्ट गोष्टी स्वीकारत असल्याने सर्व स्थापत्यशास्त्राच्या संगमातून मंगेशी मंदिर आणि परिसरातील तळे, दीपस्तंभ इत्यादींचे बांधकाम साकारलं आहे.देशातील कोणत्याही मंदिरामध्ये शिवाला दाढी असल्याचं उदाहरण तुम्ही पाहिलं नसेल पण इथं शिवाला दाढी आहे. याचा अर्थ या अतिशय सुंदर परिसरात शिवाला मानवी गुणांसह वावरायला आवडत होतं, हेच दिसून येतं," असं मंगेश कारंडे यांनी स्पष्ट केलं.

फोंडा तालुक्यातील शांतादुर्गा देवीचं मंदिर : दुसरीकडे, गोव्यात फोंडा तालुक्यातील कवळे येथे वसलेले शांतादुर्गा मंदिर हे आई जगदंबेच्या शांतादुर्गा रूपाचे अत्यंत प्राचीन, जागृत आणि प्रसिद्ध देवस्थान म्हणून ओळखलं जातं. पौराणिक कथेनुसार, एकावेळी भगवान शिव आणि भगवान विष्णू यांच्यात तीव्र युद्ध झाले आणि त्यामुळं सृष्टीवर संकट ओढवले. देव, ऋषी आणि मानव यांच्या प्रार्थनेनंतर जगदंबा महाकाय रूपात प्रकट झाली. तिने हरिहरांना शांत करून दोघांना आपल्या हातात धरले. क्रोधाविष्ट हरिहरांना शांत करणारी देवी म्हणून तिला 'शांतादुर्गा' हे नाव मिळाले.

Shantadurga Temple
शांतादुर्गा देवीचं मंदिर (ETV Bharat Reporter)


शांतादुर्गा देवीचं मूळ स्थान आणि स्थापना : आजचे सासष्टी तालुक्यातील केळशी परिसर हे शांतादुर्गा देवीचं मूळस्थान मानलं जातं. परशुरामकाळात गोमंतकात आलेल्या ब्राह्मणांतील कौशिक गोत्री लोमशर्मा यांना कर्दलीपूर गाव अग्रहार मिळाला होता. त्यांनीच इथं देवीची स्थापना केल्याचा उल्लेख पौराणिक ग्रंथांत आढळतो.

Shantadurga Temple
शांतादुर्गा देवीचं मंदिर (ETV Bharat Reporter)


शांतादुर्गा देवी मंदिराचा इतिहास : केळशी इथं असलेले मूळ मंदिर सोळाव्या शतकाच्या मध्यापर्यंत अस्तित्वात होते. पोर्तुगीज आक्रमणानंतर देवीची मूर्ती सुरक्षिततेसाठी फोंडा तालुक्यातील कवळे इथं हलवण्यात आली. त्यानंतर इथं भव्य मंदिर उभारलं गेलं आणि आज ते गोव्याच्या प्रमुख श्रद्धास्थानांपैकी एक मानलं जाते.

Shantadurga Temple
शांतादुर्गा देवीचं मंदिर (ETV Bharat Reporter)

धार्मिक महत्त्व : शांतादुर्गा ही शिव आणि विष्णू यांच्यात समन्वय घडवणारी शक्ती मानली जाते. त्यामुळं या देवस्थानाला हरिहर ऐक्याचे प्रतीक म्हणून विशेष मान दिला जातो. देशभरातून भाविक इथं दर्शनासाठी येतात.

हेही वाचा :

  1. एसआयआरचे स्वागत, मतदारयादीतील दुबार-तिबार नावे वगळणार, मतदारांना शुद्ध मतदार यादी मिळणार- बावनकुळे
  2. शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; शाळेच्या टेरेसवर मंडप टाकून दहावीचे पेपर घेण्याची आली वेळ
  3. सामाजिक न्याय विभागाचे 98 कोटी पुन्हा लाडकी बहीण योजनेसाठी वळवले
Last Updated : February 20, 2026 at 9:03 PM IST