ETV Bharat / state

चाकणमधील उद्योजकांनंतर हिंजवडीमधील अभियंते रस्त्यांच्या प्रश्नांवरून येणार रस्त्यावर, 6 सप्टेंबरला दिली आंदोलनाची हाक

पुण्याच्या हिंजवडी आयटी पार्क (Hinjawadi IT Park) मधील खड्डे आणि खराब पायाभूत सुविधांमुळे आयटी अभियंते आणि स्थानिक नागरिक अत्यंत आक्रमक झाले आहेत.

Hinjawadi IT Park
हिंजवडी परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : August 27, 2026 at 5:19 PM IST

3 Min Read
Choose ETV Bharat

पुणे : चाकण एमआयडीसीमधील (MIDC) 20 लघुउद्योजकांनी कंपन्या बंद करून स्थलांतर करण्याचा इशारा दिल्यानंतर सरकार आणि प्रशासनाची झोप उडाली. मात्र, आता चाकणनंतर हिंजवडीतील आयटी अभियंत्यांनीही आक्रमक पवित्रा घेतला. जगाच्या नकाशावर महत्त्वाचं आयटी हब (IT Hub) म्हणून ओळख असलेल्या हिंजवडीत मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाल्याचा आयटी अभियंत्यांनी थेट आंदोलनाची हाक दिली आहे. येत्या 6 सप्टेंबरला हिंजवडीत आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आयटी संघर्ष मंचचे अध्यक्ष पवनजीत माने यांनी दिली.



खड्ड्यांनी व्यापलेले रस्ते, वाहतूक कोंडी : हिंजवडी म्हटलं की, डोळ्यासमोर येतात मोठमोठ्या आयटी कंपन्या, आलिशान कार्यालयं आणि देश-विदेशातील लाखो कोटींची होणारी उलाढाल असते. विप्रो, इन्फोसिस, कॉग्निझंटसह अनेक नामांकित कंपन्यांचं मोठं जाळं या परिसरात आहे. मात्र, या कंपन्यांच्या भव्य कार्यालयाबाहेर पडताच कर्मचाऱ्यांना वेगळंच वास्तव पाहायला मिळतं. खड्ड्यांनी व्यापलेले रस्ते, वाहतूक कोंडी, अपुरी सार्वजनिक वाहतूक आणि अपघातांचा धोका यामुळं आयटी अभियंते त्रस्त झाले आहेत, अशी माहिती आयटी अभियंते पुष्पराज निंबाळकर यांनी दिली.

प्रतिक्रिया देताना IT इंजीनियर (ETV Bharat Reporter)



मानसिक ताण आणि वेळेचं मोठं नुकसान : दररोज सकाळी कामावर जाण्यासाठी आणि संध्याकाळी घरी परतताना हिंजवडी परिसरात प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. काही किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी तासन्‌तास रस्त्यावर अडकून पडावं लागतं. कामाच्या वेळेवर परिणाम होतोच, पण या वाहतूक कोंडीमुळे मानसिक ताण आणि वेळेचं मोठं नुकसान होत असल्याचं आयटी अभियंते, रहिवासी ज्ञानेंद्र हुलसुरे सांगतात.


हिंजवडी परिसरात 37 नागरिकांचा मृत्यू : पावसाळ्यात रस्त्यांची अवस्था स्थिती आणखीनं बिघडते. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानं दुचाकीस्वारांना त्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळं अपघातांचा धोका वाढला आहे. गेल्या दीड वर्षात हिंजवडी परिसरात 37 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा आयटी अभियंत्यांकडून करण्यात आला आहे. त्यामुळं आता प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.



आमच्या जीवाची किंमत किती? : हिंजवडीतील समस्यांबाबत आयटी अभियंते आणि नागरिकांनी यापूर्वीही प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र, आश्वासनांपलीकडं ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप आहे. त्यामुळं आता संयमाचा बांध फुटला असून, ‘आमच्या जीवाची किंमत किती आहे?’ असा संतप्त सवाल आशिष बेग यांनी उपस्थित केलाय.



हिंजवडीतील कर्मचाऱ्यांच्या वाट्याला खड्डे का? : हिंजवडी परिसरात सुमारे 800 कंपन्या आणि तब्बल 5 लाख आयटी अभियंते असल्याचा दावा करण्यात येतो. या IT क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात कर महसूल सरकारला मिळतो. आयटी क्षेत्रामुळं पुणे आणि पिंपरी-चिंचवडची आर्थिक ओळखही मजबूत झाली आहे. मात्र, एवढा मोठा कर महसूल देऊनही हिंजवडीतील कर्मचाऱ्यांच्या वाट्याला खड्डे, कोंडी आणि असुरक्षित रस्तेच का?, असा प्रश्न रहिवाशी हर्षल विराग यांनी विचारला आहे.



कंपन्या सोडून जाण्याची वेळ : याच पार्श्वभूमीवर चाकण एमआयडीसीचा मुद्दाही महत्त्वाचा ठरत आहे. चाकणमधील उद्योजकांनी उद्योग बंद करण्याचा किंवा स्थलांतर करण्याचा इशारा दिल्यानंतर प्रशासनानं तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. ‘उद्योग आणि कंपन्या सोडून जाण्याची वेळ येईपर्यंत सरकार वाट पाहणार आहे का?’, असा आयटी अभियंत्यांचा सवाल आहे. आयटी अभियंत्यांच्या आंदोलनामुळं प्रशासनासमोर आता मोठं आव्हान उभं राहिलं आहे. हिंजवडीच्या रस्त्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती, वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय, अपघातप्रवण ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि विविध शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय या प्रमुख मागण्या आंदोलनाच्या केंद्रस्थानी राहणार आहेत, अशी माहिती अतुल भिंगे यांनी दिली.

6 सप्टेंबरला होणार आंदोलन : चाकणमधील उद्योजकांचा इशारा असो किंवा हिंजवडीतील आयटी अभियंत्यांचा संताप दोन्ही घटनांमधून एकच प्रश्न समोर येतोय. उद्योग आणि रोजगार निर्माण करणाऱ्या या परिसरांना मूलभूत सुविधा देण्यासाठी सरकार आणखी किती काळ वाट पाहणार? 6 सप्टेंबरला हिंजवडीत होणाऱ्या आंदोलनातून आयटी अभियंते प्रशासनाला आपला संताप दाखवणार आहेत. त्यामुळं या आंदोलनानंतर तरी सरकार आणि प्रशासनाला जाग येईल का, हिंजवडीच्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढणार का, की पुन्हा एकदा आश्वासनांचीच खैरात वाटली जाणार, याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.


हेही वाचा -

  1. 'चाकण एमआयडीसीतील रस्त्यांची 31 तारखेपर्यंत तात्पुरती डागडुजी पूर्ण करण्यात येईल'-उदय सामंत
  2. 35 हजार उद्योग महाराष्ट्राबाहेर; चाकण MIDC मध्ये कंपन्यांच्या वासाऐवजी कचऱ्याचा वास, आदित्य ठाकरेंचा सरकारवर घणाघात
  3. चाकण MIDC मधून 20 कंपन्या गाशा गुंडाळणार?; 4 हजार कर्मचाऱ्यांचा रोजगार संकटात, कारण काय?