ETV Bharat / state

हिंजवडीत ड्रग्ज नेटवर्क उद्ध्वस्त; 10 किलो अफूसह राजस्थानचा तस्कर जेरबंद

पुण्याच्या हिंजवडी आयटी हब परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत 10 किलो अफू जप्त केली. या प्रकरणी राजस्थानच्या पुष्पेन्द्र सिंग या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

HINJEWADI IT PARK DRUG BUST
हिंजवडीत ड्रग्ज नेटवर्क उद्ध्वस्त (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : June 4, 2026 at 1:48 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

पिंपरी चिंचवड : पुण्यातील 'आयटी हब' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरात अमली पदार्थांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी तब्बल दहा किलो अफूच्या बोंडांचा चुरा आणि बोंडं जप्त केलीत. या कारवाईत पुष्पेन्द्र सिंग किरपाराम या आरोपीला अटक केली असून, तो मूळ राजस्थानचा रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. आयटी कंपन्यांचं प्रमुख केंद्र असलेल्या हिंजवडीत अशा प्रकारे अमली पदार्थांची विक्री करण्याचा प्रयत्न होत असल्यामुळं पुन्हा एकदा परिसरातील वाढत्या ड्रग्ज नेटवर्कचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

सापळा रचत पोलिसांनी केली कारवाई : हिंजवडी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. संबंधित आरोपी हा अफूच्या बोंडांची विक्री करण्यासाठी परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत संशयितावर लक्ष ठेवत योग्य वेळी कारवाई करून त्याला ताब्यात घेतलं. तपासादरम्यान आरोपीकडून मोठ्या प्रमाणात अफूच्या बोंडांचा चुरा आणि बोंडं हस्तगत करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाचं वजन सुमारे दहा किलो आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

प्रतिक्रिया देताना पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (ETV Bharat Reporter)

प्राथमिक चौकशीत धक्कादायक बाब समोर : अफूच्या बोंडांचा चुरा सिगारेटमध्ये मिसळून किंवा चहा, कॉफीमध्ये टाकून त्याचं सेवन केलं जात असल्याचं समोर आलं आहे. यामुळं नशा लवकर चढते आणि त्याचा वापर विशेषतः तरुणांमध्ये वाढत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांपर्यंतही अशा प्रकारचे अमली पदार्थ पोहोचत असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. या प्रकरणी अटक केलेल्या आरोपीचा पूर्वेतिहास तपासण्याचं काम सुरू असून, त्याच्यावर यापूर्वी अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत का? याचा शोध घेतला जात आहे. तसंच या प्रकरणाचा संबंध इतर राज्यांमधील अमली पदार्थ तस्करीशी आहे का? याचाही तपास सुरू आहे. आरोपी एकटाच कार्यरत होता की त्यामागं मोठं रॅकेट आहे? याबाबतही पोलीस सखोल चौकशी करत आहेत.

... ही चिंतेची बाब : हिंजवडीसारख्या आयटी हबमध्ये अशा प्रकारे अमली पदार्थांची घुसखोरी होणं ही चिंतेची बाब मानली जात आहे. पोलिसांनी वेळेवर कारवाई करत मोठा साठा जप्त केला असला, तरी या प्रकरणामागील संपूर्ण साखळी उघड करणं. हे आता मोठं आव्हान ठरणार आहे. या कारवाईमुळं परिसरात अमली पदार्थांविरोधात पोलिसांचा दबदबा कायम असल्याचा संदेशही देण्यात आला आहे.

हेही वाचा :

  1. पुणे विधान परिषदेचे उमेदवार विक्रम काकडेंनी जय पवारांना दिलं 10 कोटींचं कर्ज; नेमकं प्रकरण काय?
  2. विधान परिषद निवडणुकीत मंत्री गिरीश महाजनांच्या मध्यस्थीनंतर गणेश गीते यांची माघार; बंधू गोपाळ लढण्यावर ठाम
  3. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रथमच Su-30MKI ची ऐतिहासिक लँडिंग; वायुसेनेनं रचला नवा इतिहास